आतंकवाद मोडून काढण्यासाठी योग्य पद्धतीने लढावे लागेल !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेच्या संसदेत प्रतिपादन !

वॉशिंग्टन (अमेरिका) – आतंकवाद हा माणुसकीचा शत्रू आहे. आतंकवाद मोडून काढण्यासाठी योग्य पद्धतीने लढावे लागेल. आपल्या देशांची एकजूट या आतंकवादाचा सामना करू शकते. मुंबईवर झालेल्या आतंकवादी आकमणानंतरही आतंकवादाचा धोका अजून आहेच. त्याचा बीमोड करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या संसदेत खासदारांना संबोधित करतांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौर्‍यावर आहेत.

सौजन्य: Hindustan Times

युक्रेन आणि रशिया युद्धाच्या प्रकरणी चर्चा केल्याने मार्ग निघू शकतो !

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात रशिया आणि युक्रेन युद्धाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, ही वेळ युद्धाची नाही. युक्रेनमध्ये चालू असलेला रक्तपात थांबणे आवश्यक आहे. युद्धामुळे लोकांना प्रचंड त्रास होतो. चर्चा केल्याने अनेक गोष्टींमधून मार्ग निघू शकतो.

वर्ष २०२५ पर्यंत भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल !

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आधी भारत हा जगातील १० व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश होता; मात्र आता भारत जगातली ५ व्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. वर्ष २०२५ पर्यंत भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश बनेल.

भारतात विकासाला प्रचंड मोठी गती मिळाली आहे. भारत एखादी गोष्ट कशी करतो ? कोणत्या गोष्टीला कसे तोंड देतो? यांकडे जगाचे लक्ष असते. आज जगाला भारताविषयी माहिती हवी आहे. भारतात काय चालू आहे ? याची जिज्ञासा जगभरात अनेकांना असते. मी या सदनातही ती जिज्ञासा अनुभवत आहे.