प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव स्वत:च्या दैनंदिन जीवनात करावा ! – विनायक जोशी

रत्नागिरीत पतंजलि योग समितीच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा

योग दिन कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करतांना प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा न्याय प्राधिकरणाचे चेअरमन विनायक जोशी आणि समवेत अन्य मान्यवर

रत्नागिरी, २१ जून (वार्ता.) – भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो; शिवाय योगामुळे मानसिक ताणतणाव, भावनिक चढउतार, चित्त स्थिर रहाते. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. आत्मा, परत्म्याचा योग असाही त्याचा संबंध आहे. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव स्वत:च्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा ? असे आवाहन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा न्याय प्राधिकरणाचे चेअरमन विनायक जोशी यांनी केले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश, तथा जिल्हा विधी सेवा न्याय प्राधिकरणाचे चेअरमन विनायक जोशी.

पतंजलि योग समिती आणि परिवाराच्या वतीने आयोजित नवव्या जागतिक योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. माळनाका येथील देसाई बँक्वेट्स येथे शेकडो लोकांनी यात भाग घेतला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अधिवक्ता परिषद आणि जनशिक्षण संस्थान यांनी कार्यक्रमासाठी सहयोग दिला.

प्रोटोकॉलनुसार योग, व्यायाम करतांना सहभागी नागरिक

या वेळी व्यासपिठावर जिल्हा न्यायाधीश-१, अनिल अंबाळकर, जिल्हा मुख्य न्याय दंडाधिकारी राहुल चौत्रे, दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव निखिल गोसावी मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच उद्योजक भाऊ देसाई, अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता अविनाश तथा भाऊ शेट्ये, महिला पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. रमाताई जोग, तसेच न्यायिक अधिकारी उपस्थित होते. पतंजलि योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्यानंद जोग, पतंजलि किसान सेवा समिती भारत सावंत, महिला पतंजलि योग समिती जिल्हा प्रभारी सौ. संगीता कुलकर्णी, योगशिक्षक अमृतभाई पटेल यांनी मान्यवरांचा सत्कार केला. योग शिक्षक अनंत आगाशे यांनी सूत्रसंचालन केले.

योग करतांना सहभागी रत्नागिरीकर

या वेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या बाबासाहेब नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि विविध आसनांची प्रात्यक्षिके दाखवली. त्यांना गुरुकुल प्रमुख किरण सनगरे यांचे मार्गदर्शन लाभले. जागतिक योगदिनानिमित्त विविध आसने योगशिक्षक भारत सावंत, युवा शिक्षक प्रणव जोग आणि हर्षदा दुधाळ यांनी दाखवली. सूत्रसंचालन विद्यानंद जोग यांनी केले. त्यांनी योगाचे महत्त्व सांगत, निरोगी आयुष्यासाठी, मनुष्यजन्म सार्थकी लावण्यासाठी योग अत्यावश्यक असल्याचे सांगितले.

आसन करतांना सहभागी नागरिक

याप्रसंगी रमाताई जोग म्हणाल्या, ‘‘योग करणारे कोरोना काळात वाचले. त्यामुळे योगाचे महत्त्व जगाला पटले. सहस्रो वर्षांपासून भारतात योग आहे. भारतीय संस्कार, ऋषींची मोठी परंपरा आहे, हे अनंताचे ज्ञान आहे, ते सर्वांनी आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. ब्राह्ममुहूर्तावर उठावे. त्या वेळी ऑक्सिजन पातळी अधिक असते. नियमित योग करावा, म्हणजे तंदुरुस्त रहाल. शरीर निरोगी आहे तो १८ तास काम करू शकतो. तो कधी उपाशी रहाणार नाही. पहाटे लवकर उठावे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली गीतासुद्धा आचरणात आणली पाहिजे. जेव्हा अर्जुन हताशपणे बसला होता तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की, धर्माचे रक्षण करण्यासाठी उभा रहा. समोर कोण आहे ते पाहू नकोस. केवळ तू योगी हो. योगामुळे आपण अनेक आजार, शस्त्रक्रिया टाळू शकतो. मेरुदंडाची शस्त्रक्रिया मी टाळू शकले. त्यामुळे सर्वांनी योग करून उत्तम आरोग्य लाभेल.’’

अधिवक्ता परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य अधिवक्त्या प्रिया लोवलेकर यांनी आभार मानले आणि स्वरदा लोवलेकर हिने ‘संपूर्ण वन्दे मातरम्’ म्हटल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.