आषाढी वारी मार्गावरील खासगी रुग्‍णालये चालू ठेवण्‍याच्‍या आरोग्‍यमंत्र्यांच्‍या सूचना !

प्रतिकात्मक चित्र

पंढरपूर (जिल्‍हा सोलापूर) – आषाढी एकादशीच्‍या निमित्ताने महाराष्‍ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि अन्‍य भागांतून लाखो वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येतात. वारकर्‍यांना तात्‍काळ आरोग्‍यविषयक सुविधा उपलब्‍ध होण्‍यासाठी सार्वजनिक आरोग्‍य विभागाने ‘आरोग्‍याची वारी, पंढरीच्‍या दारी’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. पालखी मार्गावर आवश्‍यक त्‍या आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यासाठी फिरत्‍या वैद्यकीय पथकाची नियुक्‍तीही करण्‍यात आली आहे. २७ जून ते २९ जून या यात्रेच्‍या कालावधीत पंढरपूर येथे ‘महाआरोग्‍य शिबिरा’चे आयोजन करण्‍यात आले आहे. शासनाच्‍या आरोग्‍य यंत्रणेसमवेत खासगी रुग्‍णालयेही चालू ठेवावीत, असे आवाहन आरोग्‍यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी उच्‍चस्‍तरीय बैठकीत केले. ठोस कारणाविना दवाखाना किंवा रुग्‍णालय बंद ठेवल्‍यास आपत्ती व्‍यवस्‍थापन कायदा २००५ अन्‍वये योग्‍य ती कारवाई करण्‍याच्‍या सूचना या वेळी देण्‍यात आल्‍या आहेत.

वारी मार्गावरील खासगी वैद्यकीय व्‍यावसायिक रुग्‍णालये बंद ठेवत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. शासकीय यंत्रणा सज्‍ज असली, तरी वारीच्‍या कालावधीत साथीची परिस्‍थिती निर्माण झाल्‍यास सरकारी यंत्रणेवर ताण येऊ शकतो. त्‍यामुळे आरोग्‍यमंत्र्यांनी वारी मार्ग, पंढरपूर शहर आणि परिसरातील खासगी रुग्‍णालये चालू ठेवण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. वैद्यकीय व्‍यावसायिकांसमवेत बैठक घेऊन रुग्‍णालये चालू ठेवण्‍याविषयी सूचित करावे, असे निर्देश त्यांनी यंत्रणांना दिले आहेत.