हिंदु धर्म स्वीकारणारे चित्रपट दिग्दर्शक अली अकबर यांनी दिले भाजपचे त्यागपत्र !

अली अकबर उपाख्य रामासिम्हन् अबुबकार

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि भाजपच्या केरळ प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अली अकबर उपाख्य रामासिम्हन् अबुबकार यांनी १६ जून या दिवशी पक्षाचे त्यागपत्र दिले. गेल्या काही आठवड्यांपासून भाजपला सोडचिठ्ठी देणारे चित्रपटदृष्टीतील ते तिसरी व्यक्ती आहेत. गेल्या वर्षी त्यांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला होता. त्यागपत्र देतांना त्यांनी म्हटले, ‘‘मी कोणत्याही राजकारणाचा गुलाम नाही. आता सर्वांपासून मुक्त झालो असून केवळ धर्मासमवेत उभा आहे !’’

१. अकबर यांनी वर्ष १९२१ च्या मलाबार बंडावर आधारीत ‘हिंदू साईड ऑफ द रिबेलियन’ या चित्रपटाची घोषणा केली होती.

२. गेल्याच आठवड्यात प्रतिष्ठित मल्ल्याळम् चित्रपट दिग्दर्शक राजासेनन् यांनीही भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे त्यागपत्र दिले होते. ‘भाजपमध्ये एक कलाकार आणि राजकारणी म्हणून मला दुर्लक्षित केले गेले. त्यामुळे मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे कलाकारांना मोकळीक देण्यात येते !’, अशी प्रतिक्रिया राजासेनन् यांनी भाजपमधून बाहेर पडल्यानंतर दिली.

३. चित्रपट अभिनेते भीमन रघू यांनीही भाजपमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.

ज्या कलाकारांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांना केरळ चित्रपटसृष्टीत बहिष्काराला सामोरे जावे लागले होते ! – भाजप

भाजपचे प्रवक्ते नारायणन् नंबूथिरी यांनी या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले, ‘‘अली अकबर हे गेल्या काही काळापासून पक्षात सक्रीय नव्हते. त्यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय वैयक्तिक स्वरूपाचा आहे. एक कलाकार म्हणून त्यांचा निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत. राजासेनन् यांना पक्षाकडून काय अपेक्षित होते, हे आम्हाला कळालेले नाही. ज्या कलाकारांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांना केरळ चित्रपटसृष्टीत बहिष्काराला सामोरे जावे लागत होते. राजासेनन् यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर हे सूत्र एकदा बोलून दाखवले होते. तसेच सुरेश गोपी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या चित्रपटाच्या विरोधातही प्रचार करण्यात आला होता !’’ (अभिव्यक्तीस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य यांच्या नावाने गळा काढणारे याविषयी का बोलत नाहीत. मल्ल्याळम् चित्रपटसृष्टीवर साम्यवाद्यांचा पगडा असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या कलाकारांवर बहिष्कार घातला जातो, हे लक्षात घ्या ! – संपादक)