वैश्‍विक हिंदु राष्‍ट्राचे बीज !

वर्ष २०१२ मध्‍ये ‘हिंदु राष्‍ट्र’ शब्‍द उच्‍चारणेही कठीण होते, त्‍या वेळी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पहिले ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ घेण्‍यात आले. ‘हिंदु’ शब्‍दातील सूक्ष्मातून कार्य करणारे दैवी चैतन्‍य आणि भारतातील अत्‍युच्‍च कोटीच्‍या संतांचा संकल्‍प यांमुळे गेल्‍या ११ वर्षांतील या अधिवेशनांची फलश्रुती म्‍हणून आज सर्वत्र ‘हिंदु राष्‍ट्रा’ची मागणी होत आहे. ही अशक्‍य वाटणारी गोष्‍ट आज शक्‍यतेच्‍या उंबरठ्यावर येऊन उभी राहिल्‍यामुळे अर्थात्‌च आज ‘एकादश अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’चे स्‍वरूप ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’त परावर्तित झाले आहे. याच धर्तीवर काही वर्षांनी विश्‍वात सनातन हिंदु संस्‍कृतीचे वारे अधिक वेगाने वाहू लागल्‍यास नवल वाटायला नको. इथे एक वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्र लक्षात घेता येईल, ते म्‍हणजे जेव्‍हा आपण ‘हिंदु राष्‍ट्र’ असे म्‍हणतो, तेव्‍हा आपसूकच (‘इन बॉर्न’ म्‍हणजे जन्‍मतः) ‘विश्‍वाचे हित आणि सुख’ चिंतीले जाते. सनातन हिंदु धर्म आणि राष्‍ट्र यांची संकल्‍पना मूलतःच वैश्‍विक आहे. त्‍यामुळे जेव्‍हा ‘हिंदु राष्‍ट्रा’चा विचार येतो, तेव्‍हा आपसूकच त्‍याच ‘विश्‍वहिता’चा विचार येतो. तसेच विश्‍वाच्‍या निर्मितीच्‍या वेळी आणि त्‍यानंतरच्‍या ३ युगांमध्‍ये संपूर्ण पृथ्‍वीवर हिंदु संस्‍कृतीच होती. सध्‍याची स्‍थुलातून स्‍थिती पाहिली, तर केवळ अमेरिका किंवा जर्मनीच नव्‍हे, तर आशिया खंडातील देशांनाही चीनपेक्षा भारताचा आधार अधिक वाटू लागला आहे. इतकेच काय आता चक्‍क इस्‍लामी राष्‍ट्रांकडूनही भारताचा गौरव होत आहे. कोरोना महामारीच्‍या काळात संपूर्ण जग हस्‍तस्‍पर्श नसणारे ‘आदाब’ही (नमस्‍काराची इस्‍लामी पद्धत) स्‍वीकारू शकले असते; पण तसे झाले नाही. विश्‍वाने ‘नमस्‍कारा’ची पद्धत स्‍वीकारली. हा केवळ योगायोग नाही. सनातन हिंदु धर्माचा (खरा मानवतावादी) विचार हा केवळ आपल्‍या राष्‍ट्रासाठी नव्‍हे, तर संपूर्ण विश्‍वासाठी कसा उपकारक आणि सर्व समाधानांचे उत्तर देणारा आहे, हे हळूहळू विश्‍वातील अधिकाधिक जनतेला कळण्‍यास प्रारंभ झाला आहे आणि तो निश्‍चितपणे वाढत जाईल. यंदाचे हिंदु राष्‍ट्र अधिवेशन हे या अनुषंगाने महत्त्वाचे आहे की, आज प्रथमच ‘हिंदु राष्‍ट्रा’च्‍या व्‍यापकतेत अधिक भर पडून हिंदुत्‍वनिष्‍ठांसमोर ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्रा’चे अत्‍यंत उदात्त ध्‍येय समोर ठेवण्‍यात आले आहे.

आज भारतात उत्तरप्रदेश किंवा आसाम येथे धर्माधिष्‍ठित राजकारणाला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. आज खलिस्‍तानवाद, आतंकवाद, नक्षलवाद, ख्रिस्‍ती मिशनरी ही शारीरिक स्‍तरावरील; साम्‍यवादी, निधर्मी, विद्रोही ही वैचारिक स्‍तरावरील; हिंदु संस्‍कृती, विवाहसंस्‍था आणि कुटुंबपद्धती यांना उद़्‍ध्‍वस्‍त करणारी सामाजिक अन् वैचारिक स्‍तरावरील अशी अनेक संकटे हिंदु धर्मियांपुढे आहेत. या सर्वांवर धर्माधिष्‍ठित ‘हिंदु राष्‍ट्र’ हेच एकमेव उत्तर आहे. या अधिवेशनाच्‍या निमित्ताने एकत्र आलेले ३५० संघटनांचे प्रतिनिधी हा संदेश शासनापर्यंत पोचवण्‍यात यशस्‍वी होऊ देत, अशी प्रार्थना करूया !

जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम् ! जयतु जयतु हिन्‍दुविश्‍वम् !