अमेरिकेचा पुढील राष्ट्रपती निवडण्याची शक्ती येथील हिंदूंकडे ! – खासदार रिचर्ड मॅककॉर्मिक

अमेरिकेच्या संसदेत वेदिक मंत्रोच्चारात पार पडली पहिली हिंदु-अमेरिकी परिषद

अमेरिकेचे खासदार रिचर्ड मॅककॉर्मिक

वॉशिंग्टन (अमेरिका) – पुढील राष्ट्रपती निवडण्याची शक्ती अमेरिकेतील हिंदूंकडे आहे. मी हे केवळ म्हणत नाही, तर मला वाटते की, तुमच्यात ती क्षमता आहे. एकदा तुम्ही योग्य नेत्यांशी जुळवून घेतले की, तुम्हाला तुमच्या शक्तीची कल्पना येईल. तुम्ही अमेरिकेसाठी कायदा लिहाल, जो आपल्या देशाला अनेक दशके प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल, असे कौतुकोद्गार अमेरिकेचे खासदार रिचर्ड मॅककॉर्मिक यांनी येथे काढले. अमेरिकेच्या ‘कॅपिटल हिल’ या संसदेत १४ जून या दिवशी पहिली हिंदु-अमेरिकी परिषद आयोजित करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या परिषदेला ‘अमेरिकन्स फॉर हिंदू’ असे नाव देण्यात आले होते. १३० भारतीय अमेरिकी नेते यात सहभागी झाले होते. या परिषदेचा प्रारंभ वेदिक मंत्रोच्चार आणि प्रार्थना यांद्वारे करण्यात आली. २० हिंदु संघटनांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. अमेरिकेत रहाणार्‍या हिंदूंच्या समस्यांकडे अमेरिकेतील कायदा निर्मात्यांचे लक्ष वेधून घेणे हा त्याचा उद्देश होता.

या परिषदेचे आयोजक रोमेश जाप्रा म्हणाले की, हिंदु समाजाने प्रत्येक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. तरीही आपण राजकीयदृष्ट्या मागासलेले आहोत. अमेरिकेत हिंदूंशी भेदभाव केला जातो, असे आम्हाला वाटते. या परिषदेच्या माध्यमातून सर्व संस्थांना एकत्र आणायचे आहे.

अमेरिकेच्या संसदेत हिंदु खासदारांचा गट बनवणार ! – खासदार श्रीनिवास ठाणेदार

अमेरिकेतील खासदार श्रीनिवास ठाणेदार परिषदेत बोलताना

या परिषदेमध्ये भारतीय वंशाचे अमेरिकेतील खासदार श्रीनिवास ठाणेदार यांनी अमेरिकेतील संसदेत ‘हिंदू कॉक्स’ बनवण्याची घोषणा केली आहे. (कॉक्स म्हणजे अमेरिकेच्या संसदेत समान उद्देश असणार्‍या खासदारांचा गट. या गटाचे प्रशासन संसदेच्या नियमांनुसार असते.) याचा उद्देश अमेरिकेत हिंदुद्वेष आणि तेथे हिंदूंना देण्यात येणारी भेदभावाची वागणुकीवर च्या विरोधात द्वेष आणि भेदभाव रोखणे, हा आहे. श्रीनिवास ठाणेदार हे मूळचे बेळगावचे आहेत. ते संसदेत ‘सामोसा कॉक्स’चे सदस्य आहेत. हा गट भारतीय वंशाच्या खासदारांचा आहे. हे खासदार भारताशी संबंधित सूत्रे संसदेत उपस्थित करतात.

श्रीनिवास ठाणेदार म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला त्याचा धर्म निवडण्याचा अधिकार असला पाहिजे. कोणत्याही भीती किंवा भेदभाव यांच्याविना देवाला प्रार्थना करू शकणे, हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. आम्ही कुणाच्या विरोधात नाही.