पुणे – ‘शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी’ आणि ‘पुणे पीपल्स को-ऑप बँके’च्या वतीने वै. ह.भ.प. महाराष्ट्र शाहीर जंगम स्वामी स्मरणार्थ येथील लालमहालात अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. सलग १२ घंट्यांच्या या कीर्तन सोहळ्यात महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई यांचे अभंग ऐकताना वारकरी दंग झाले. कीर्तनमालेचे उद्घाटन लाल महालचे सुरक्षारक्षक संजय आंबवले आणि स्वच्छता कर्मचारी नीता गायकवाड यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे आदी उपस्थित होते.
टाळमृदगांच्या ठेक्यावर विठ्ठलाच्या नामात तल्लीन झालेला वारकरी वर्ग अशा भक्तीमय वातावरणात हरी नामाच्या गजराने लालमहाल दुमदुमुन गेला.सलग 12 तासांच्या या कीर्तन सोहळ्यात महाराष्ट्राच्या संताचे अभंग ऐकताना वारकरी दंग झाले.#आषाढीवारी pic.twitter.com/Vye8lotBd3
— AIR News Pune (@airnews_pune) June 13, 2023
या वेळी ह.भ.प. श्रेयसबुवा बडवे म्हणाले की, पंढरपूरचा पांडुरंग आणि वारकरी यांचे अतूट नाते आहे. वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनाला न जाता पांडुरंगाला भेटायला जातात. पंढरीचा पांडुरंग हा दर्शनाचा नाही, तर भेटायचा देव आहे. मनात कोणताही हेतू न धरता एखाद्याकडे जाणे म्हणजे भेटणे. वारक-यांच्या मनात भक्तीभावा व्यतिरिक्त कोणताही हेतू नसतो. त्यामुळे ते केवळ पांडुरंगाच्या दर्शनाला नाही, त्याला भेटायला जात असतात.