‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या ६ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले !

  • नवी मुंबई येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा धर्मद्रोही प्रकार !

  • हिंदूंंच्या आंदोलनानंतर शाळेच्या प्रशासनाकडून क्षमायाचना !

आंदोलन करताना राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ

नवी मुंबई – वाशी येथील सेंट लॉरेन्स या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याच्या प्रकरणी ६ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. शाळेच्या प्रशासनाने ही कारवाई केली.

वरील प्रकाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह (‘मनविसे’सह) अन्य राजकीय पक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन केले. या वेळी  पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकल्यावर कारवाईच्या भीतीने कुणीही विद्यार्थी किंवा पालक पुढे येऊन बोलण्यास सिद्ध नव्हते; मात्र हा विषय सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाल्यावर संतापाचे वातावरण निर्माण झाले. १४ जून या दिवशी सकाळीच मनविसे, भाजप, सकल हिंदु समाज, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शाळेसमोरच ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या प्रकरणी ‘शाळेने तात्काळ क्षमा मागून या ६ विद्यार्थ्यांना शाळेत परत घ्यावे’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. आंदोलकांची आक्रमकता पाहून शाळेच्या प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत तात्काळ लेखी क्षमा मागितली. (हा आहे हिंदूंच्या संघटितपणाचा परिणाम ! – संपादक) या क्षमापत्रात म्हटले आहे की, मधल्या सुट्टीत गोंधळ निर्माण करणार्‍या विद्यार्थ्यांना समज देण्यात आली आहे. याविषयी कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. या विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होणार नाही, याची काळजी घेऊ.

संपादकीय भूमिका 

  • हिंदूबहुल भारतात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई होणे, हा हिंदूंचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न होय !
  • देशद्रोही घोषणा देणार्‍यांच्या विरोधात कधी ‘ब्र’ही काढला जात नाही, हे लक्षात घ्या !