राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज होणे आवश्यक ! – डॉ. समीर घोरपडे, हिंदु जनजागृती समिती

लांजा येथे बजरंग दल आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी

राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी

लांजा, १२ जून (वार्ता.) – जगात अशी एकच माता होऊन गेली की, तिने स्वराज्याच्या दोन – दोन छत्रपतींचे संगोपन केले. शहाजीराजे कर्नाटकमधील कारभार बघत असतांना महाराष्ट्रातील कारभार धाडसाने राजमाता जिजाऊ यांनी सांभाळला. त्याचसमवेत सईबाईंच्या निधनानंतर छोट्या शंभूराजांचाही त्यांनी तितक्याच समर्थपणे सांभाळ केला. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर असतांना सिद्धी जोहरचा वेढा  तोडण्यासाठी वयाच्या ६० व्यावर्षी जिजाऊंनी हातात शस्त्रे घेतली आणि प्रत्यक्ष रणांगणावर जाण्याची सिद्धताही केली. हाच विचार प्रत्येकाने आज लक्षात घेण्यासारखा आहे. आपल्याला राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज होणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. समीर घोरपडे यांनी केले.

येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ येथे बजरंग दल आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने १२ जून या दिवशी राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रमात सर्वप्रथम सामूहिकपणे ध्येयमंत्र म्हणण्यात आला आणि शेवटी सामूहिक शिवसूर्यहृदय मंत्र म्हणून झाल्यावर सगळ्यांनी जिजाऊमातेच्या प्रतिमेची पूजा केली.