सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव ११ मे २०२३ या दिवशी साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले काष्ठापासून बनवलेल्या सुवर्ण रंगाच्या दिव्य रथात विराजमान झाले होते. ‘या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि साधकांना सेवा करतांना आलेल्या अडचणी, त्या अडचणींवर गुरुकृपेने केलेली मात अन् त्यांना आलेल्या बुद्धीअगम्य अनुभूती’ पुढे दिल्या आहेत. १० जून या दिवशी आपण प्रत्यक्ष रथ बनवणे आणि रथावरील नक्षीचे लाकडावर कोरीव काम करणे हे भाग पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
(भाग ६)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/690657.html
१२. रथनिर्मितीच्या विविध टप्प्यांतील सेवा करतांना साधकांना आलेल्या अडचणी
१२ अ. प्रत्येक टप्प्याला अडचणी येणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर अडचणी सुटणे : ‘रथ बनवतांना प्रत्येक टप्प्याला पुष्कळ अडचणी येत होत्या. तेव्हाच ‘या रथाचा सूक्ष्म प्रभाव (परिणाम) किती असणार आहे !’, हे आमच्या लक्षात आले. ‘रथसेवेशी संबंधित कुठलीही गोष्ट करायला आरंभ केल्यावर त्यात अडचण आली नाही’, असे झाले नाही. त्या अडचणींवर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर अडचण सुटून ते सूत्र पूर्ण होत होते.
१२ आ. रथासंबंधी चित्रांची सेवा करतांना आलेल्या अडचणी
१२ आ १. चित्र करतांना आरंभी पुष्कळ आनंद मिळणे; पण चित्र पूर्णत्वाकडे जाऊ लागल्यावर त्रास पुष्कळ वाढणे : मला ‘रथाचे चित्र कसे असायला हवे ?’, याचे दृश्य दिसायचे. रथावरील नक्षीविषयीही असेच झाले होते. रथाचे चित्र करतांना आरंभी मला आनंद मिळायचा; पण जसजसे चित्र पूर्णत्वाकडे जात गेले, तसतसा मला होणारा त्रास वाढतच चालला होता. ‘हे रथनिर्मितीतील अडथळे आहेत’, हे मला कळत होते.
१२ आ २. सेवा करतांना ‘वाईट स्वप्ने पडणे, मांसाहार करावासा वाटणे’ इत्यादी त्रास होणे आणि साधकांनी नामजप केल्यावर सेवा करता येणे : ही सेवा करतांना मला ‘वाईट स्वप्ने पडणे, मांसाहार करावासा वाटणे, सेवा करतांना काहीही न सुचणे, सातत्याने दाब आणि त्रासदायक शक्तीचे आवरण जाणवणे’, असे त्रास झाले. हे त्रास दूर होण्यासाठी साधकांनी १ आठवडा प्रतिदिन न्यूनतम २ घंटे नामजप केला. त्यानंतर माझी सेवा काही प्रमाणात पूर्ववत् चालू झाली.
१२ आ ३. स्वप्नात रथ पूर्ण झाल्याचे दृश्य दिसणे, सूक्ष्मातून रथ पूर्ण झाल्याचे जाणवणे आणि त्यानंतर त्रास न्यून होत जाणे : २३.४.२०२३ या दिवशी रात्री मला स्वप्न पडले, ‘रथ पूर्ण झाला असून मी, प्रकाश (श्री. प्रकाश सुतार) आणि अन्य काही साधक एका सोनेरी रथात आहोत.’ सकाळी जाग आल्यावर माझ्या मनात पहिला विचार आला, ‘हा रथ आता सूक्ष्मातून सिद्ध झाला आहे.’ त्या दिवसानंतर मला होणारा त्रासही हळूहळू न्यून होत गेला.’ – सौ. जान्हवी रमेश शिंदे, फोंडा, गोवा.
‘रथनिर्मितीची सेवा चालू केल्यानंतर मार्च २०२३ च्या शेवटी रथ बनवून पूर्ण होईल’, असे आम्हाला वाटत होते; पण सेवेत अनेक अडचणी आल्याने तसे झाले नाही.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ |
१२ इ. रथावर नक्षी कोरण्याची सेवा करतांना आलेल्या अडचणी
१२ इ १. रथावर नक्षी कोरण्यासाठी दोन व्यावसायिकांकडे गेल्यावर अडचणी आल्याने सेवा होऊ न शकणे : ‘रथावर नक्षी कोरण्यासाठी आम्ही गोव्यात विविध ठिकाणी गेलो होतो. पहिल्या व्यावसायिकाने २५ दिवस साहित्य ठेवून घेतले आणि सेवा करण्यास नकार दिला. दुसर्या व्यावसायिकाने रथाची नक्षी कोरायला घेतल्यावर ‘वीजपुरवठा खंडित होणे, संगणकावर धारिका न उघडणे’ इत्यादी अडचणी सातत्याने येत होत्या. त्यामुळे त्याच्याकडूनही काम करून मिळाले नाही.
१२ इ २. नक्षी कोरण्यासाठी जातांना सर्व कागदपत्रे तयार आणि योग्य असूनही गोवा-महाराष्ट्र सीमेवर पोलिसांनी साधकांना अडवले आणि तेथून निघू दिले नाही. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना याविषयी कळवल्यावर त्यांनी उपाय केले. त्यानंतर साधकांना पुढे जाता आले.
१२ इ ३. कारवार येथे ज्या व्यक्तीला रथाचे घुमट करण्यासाठी दिले होते, ती व्यक्ती आजारी पडली. ती आजारातून उठू न शकल्याने ऐनवेळी अन्य ठिकाणांहून घुमट करून घ्यावे लागले.
१२ इ ४. ज्या व्यक्तीला रथावर बसवण्यासाठीची मारुतीची मूर्ती बनवायला दिली होती, तिचे वडील आजारी पडले. त्यांना ‘डायलिसीस’वर (टीप) ठेवावे लागले आणि पुनःपुन्हा रुग्णालयात भरती करावे लागले. त्यामुळे ती व्यक्ती मूर्ती वेळेत देऊ शकली नाही.
टीप – डायलिसिस : मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया
वरील सर्व अडचणी सुटण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय करायला सांगितले. प्रतिदिन २ संत प्रत्येकी २ घंटे नामजप करायचे. त्यानंतर अडचणी सुटू लागल्या.
१२ इ ५. सेवा करण्यासाठी कामगार न मिळणे आणि आध्यात्मिक उपाय चालू केल्यावर कामगार मिळणे : मधल्या मोठ्या कालावधीत रथाची सेवा करण्यासाठी कामगार मिळेनासे झाले होते. या संदर्भात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना कळवले. त्यांनी उपाय चालू केल्याचा निरोप दिला आणि नंतर कामगार मिळाले.
१२ इ ६. रथावर नक्षी काढण्यासाठी कारागिराकडे जातांना नक्षी काढण्याचे यंत्र बंद पडल्याचे समजणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी त्यासाठी नामजपादी उपाय करणे : ‘रथावर नक्षी काढण्यासाठी आम्ही साहित्य घेऊन दुकानात पोचलो. आम्ही गाडीतून उतरतांना नक्षी काढणार्या कारागिराचा भ्रमणभाष आला. ते आम्हाला म्हणाले, ‘‘आमचे यंत्र बिघडले आहे. यंत्र दुरुस्त होऊ शकत नाही. तुम्हाला आता नक्षीसाठी कोल्हापूरला जावे लागेल.’’ मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितले, ‘‘अशी अडचण येत आहे.’’ सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनाही अडचण सांगितली. त्यानंतर त्यांनी त्यासाठी नामजपादी उपाय करणे चालू केले.
१२ इ ७. यंत्राच्या ठिकाणी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर यंत्र दुरुस्त होणे आणि नंतर ८ दिवस कुठलीही अडचण न येणे : आम्ही दुकानात पोचलो. तेव्हा त्यांचे यंत्र दुरुस्त करण्याचे काम चालू होते. ते आम्हाला पुन्हा म्हणाले, ‘‘तुम्हाला कोल्हापूरला जावे लागेल.’’ तेव्हा मला थोडा ताण आला. ‘कोल्हापूरला गेलो, तर किती वेळ जाईल ?’, असा विचार माझ्या मनात आला. मी आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे सर्व साहित्य समवेत घेऊन गेलो होतो. मी ‘श्री विष्णवे नमः ।’ या नामजपाच्या पट्ट्या त्या यंत्राच्या चारही बाजूंनी लावल्या. नारळ घेऊन पूर्ण यंत्राची दृष्ट काढली. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने भ्रमणभाषवर लावली. उदबत्ती लावली. त्यानंतर अर्ध्या घंट्याने अडचण दूर होऊन यंत्र चालू झाले. नंतर ८ दिवस कुठलीही अडचण आली नाही.
१२ इ ८. आम्ही प्रतिदिन तिथे प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावून ठेवायचो, तरीही कधी कधी नक्षी करतांना वीजपुरवठा बंद व्हायचा. अशा अनेक अडचणी सतत येत होत्या.’
(क्रमशः)
– श्री. प्रकाश सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (सर्व सूत्रांचा दिनांक : २४.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या / साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/691460.html