एका दिवसात जमला ८.५० टन प्लास्टिक कचरा
रत्नागिरी – जिल्ह्यात जागतिक पर्यावरणदिनानिमित्त गावागावांत श्रमदानातून प्लास्टिक संकलन मोहीम आयोजित केली होती. प्लास्टिकमुक्तीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एका दिवसात साडेआठ टन प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला आहे. जिल्हा परिषद पाणी स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने ५ जून या दिवशी १ सहस्र ५३२ गावांमध्ये प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवण्यात आली. गावामध्ये सार्वजनिक ठिकाणावर उघड्यावर कचरा टाकण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या एकत्र करून त्या ग्रामपंचायत कार्यालयात गोळा करण्यात आल्या. या माध्यमातून गावांमधील कचरा टाकण्यात येणार्या जागांची स्वच्छता करण्यात आली.
गोळा केलेला प्लास्टिक कचरा पिशव्यांमध्ये संकलित करून ९ जूनपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी आणून ठेवायचा आहे. गावामध्ये किती कचरा गोळा केला याची माहिती ग्रामसेवकांकडून ‘ॲप’द्वारे जिल्हास्तरावर नोंदवायची होती. जिल्ह्यात ८ सहस्र ६३२ टन कचरा गोळा झाला असून, सर्वाधिक कचरा राजापूर तालुक्यात १ सहस्र ४३७ किलो जमा झाला. एक सहस्र किलोपेक्षा अधिक कचरा ५ तालुक्यांत जमा करण्यात आला. उत्तर रत्नागिरी मधील कचरा खडपोली येथील अमर इंडस्ट्रीजला दिला जाईल, तसेच दक्षिण रत्नागिरीतील कचरा पुनःप्रक्रियेसाठी झाडगाव येथे पाठवण्यात येणार आहे. जमा केलेल्या प्लास्टिक कचर्याचे पैसे ग्रामपंचायतीला देण्यात येणार आहेत.