रहिमतपूर (जिल्हा सातारा) येथील सोहम् संप्रदायाचे अध्वर्यु पू. स्वरूपनाथ (बाबा) महाराज यांचा देहत्याग

पू. स्वरूपनाथ (बाबा) महाराज

सातारा, ४ जून (वार्ता.) – रहिमतपूर येथील प्रथितयश आधुनिक वैद्य आणि सोहम् संप्रदायाचे अध्वर्यु पू. स्वरूपनाथ (बाबा) महाराज उपाख्य डॉ. के.एल्. कुलकर्णी (वय ९३ वर्षे) यांनी ३० मे या दिवशी देहत्याग केला.

गत २ वर्षांपासून ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवासस्थानीच असत. सोहम् संप्रदायातील अनेक साधक घरी येऊनच त्यांचे मार्गदर्शन घेत होते. शेवटचा काही काळ ते सातारा येथील त्यांचे चिरंजीव डॉ. अजित कुलकर्णी यांच्या निवासस्थानी वास्तव्यास होते. पू. स्वरूपनाथ महाराज यांचे अंत्यसंस्कार सातारा येथील संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

प्रपंच चांगला करणे म्हणजे परमार्थ, सचोटी, शुद्ध धर्माचरण आणि स्वच्छता यांविषयी ते भक्तांना शिकवण देत असत. परमार्थ ताण न घेता करणे, सतत हसतमुख रहाणे, आत्मचिंतन करणे यांविषयी साधकांना मार्गदर्शन करत. विनोदी स्वभावामुळे बालसाधकांनाही ते आपलेसे वाटत असत.

पू. स्वरूपनाथ महाराज यांचा सनातनशी असलेला परिचय !

वर्ष २००३ मध्ये पू. स्वरूपनाथ महाराज यांचा सनातनशी संपर्क आला. ते सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमास भेट दिली, तेव्हा त्यांनी सनातनचे कार्य जवळून पाहिले. तसेच त्यांनी सनातनच्या साधकांसाठी नामजपादी उपाय करण्यास प्रारंभ केला. पुढे वर्ष २००४-२००५ मध्ये सनातनच्या साधकांना अनिष्ट शक्तींचे त्रास वाढल्यानंतर पू. स्वरूपनाथ महाराज यांनी सातारा येथील साधकांवर नामजपादी उपाय केले. यामळे अनेक साधकांचे त्रास न्यून झाले होते. पू. स्वरूपनाथ महाराज हे धर्मसभा, गुरुपौर्णिमा यांनिमित्ताने सनातनचे मुखपत्र दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आशीर्वादरूपी संदेश नियमितपणे देत असत. सनातनच्या साधकांवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची विशेष कृपा असल्याचा ते आवर्जून उल्लेख करत असत. सनातनच्या साधकांचे आध्यात्मिक स्तरावरील वर्तन आणि जिज्ञासा यांमुळे पू. स्वरूपनाथ महाराज यांचेही सनातनच्या साधकांवर विशेष प्रेम आणि वात्सल्य होते.