स्व:धर्माचे आचरण करत सनातन हिंदु धर्माचे प्राणपणाने रक्षण करू !
मुंबई – ज्येष्ठ शुक्ल द्वादशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्र शासनाच्या वतीने भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. वेदमंत्रांच्या मंगलमय उच्चारात छत्रपती शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीला १ सहस्र १०८ जलाशयांच्या जलाने अभिषेक करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवरायांचे वंशज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांसह अन्य शिवप्रेमी यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचा पंचामृताने अभिषेक करून विधीवत पूजा करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह उपस्थित सर्व शिवप्रेमी यांनी स्व:धर्माचे आचरण करून सनातन हिंदु धर्माचे प्राणपणाने रक्षण करण्याची शपथ घेतली. महाराष्ट्रासह देशभरातून शिवप्रेमी सोहळ्याला उपस्थित होते.
राज्याभिषेक झाल्यावर शिवरायांची महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी शिवरायांना मानवंदना दिली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करत सहस्रावधी शिवप्रेमी या सोहळ्यासाठी रायगडावर उपस्थितीत होते. पारंपरिक वाद्ये, पारंपरिक वेशभूषा करून शिवप्रेमींनी रायगडावर सहस्रावधी भगवे झेंडे फडकवले. सोहळ्याच्या ठिकाणी करण्यात आलेले मर्दानी खेळांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वेदपंडित प्रकाश जंगम यांनी पूजाविधी सांगितला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने या सोहळ्याचे आयोजन केले होते.
शिवरायांच्या राज्यकारभाराप्रमाणे राज्यशासनाचा प्रत्येक निर्णय जनहिताचा असेल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
स्वातंत्र्य केवळ भूमीचे नसते, तर माणसाचे असते. ‘जनतेच्या भाजीच्या देठलाही सैनिकांनी हात लावता कामा नये’, असे शिवरायांचे धोरण होते. साधू, संत, महिला आणि धर्म यांचे महाराजांनी रक्षण केले. शिवरायांच्या राज्यकारभाराप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा प्रत्येक निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचा असेल.
मोठ्या संख्येने जमलेल्या शिवभक्तांना संबोधित करताना ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळणे हा माझा बहुमान असल्याचे सांगत, या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. महाराजांनी आपल्याला सुराज्य कसे असावे त्याची शिकवण दिली आणि आज… pic.twitter.com/kPRSvD5cuk
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 2, 2023
३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यातून लाईव्ह | किल्ले रायगड https://t.co/2evvMDqs2o
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 2, 2023
छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या राज्यकारभारामुळे ओळखले जातात. त्यांनी निर्माण केलेले हिंदवी राज्य जनकल्याणकारी होते. छत्रपती शिवराय यांच्या कल्पनेतील सुराज्य आम्हाला आणायचे आहे. शिवरायांनी निर्माण केलेल्या गडकोट संवर्धनाला आम्ही प्राधान्य देऊ. लंडनच्या संग्रहालयातील भवानी तलवार आणि वाघनखे पुन्हा आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा !
या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘प्रतापगड प्राधिकरण’ स्थापन करत असल्याची घोषणा केली. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी उदयनराजे भोसले यांची नियुक्ती केल्याची घोषणा, तसेच रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टीसाठी ८५ एकर भूमी देण्याची घोषणा या वेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
छत्रपती शिवरायांच्या विचाराने स्वराज्याला सुराज्याकडे नेऊ ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे नवीन चलन सिद्ध केले. पूर्वीची लेखनपद्धती बंद करून हिंदूंची पद्धती चालू केली. त्यासाठी भाषाशुद्धीसाठी प्रयत्न करत महाराजांनी स्वत:चा मराठी राज्यव्यवहारकोष निर्माण केला. परकीय आक्रमकांपासून मुक्त करण्याचे कार्य शिवरायांनी केले. सज्जनांना अभय आणि दुर्जनांचा कडेलोट ही शिवयांची भूमिका होती. छत्रपती शिवरायांचा अधिकृत इतिहास आला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री पुढाकार घेतील.
The Pledge.
शपथ.🚩#shivrajyabhisheksohala #Raigad #Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #Coronation #Coronation2023 #TheKing #shivrajyabhishek350 #शिवराज्याभिषेक_सोहळा #शिवराज्याभिषेक_दिन #रायगड #महाराष्ट्र pic.twitter.com/yiQEXH08gk
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 2, 2023
रायगडाची प्रलंबित कामे पूर्ण व्हावीत, यासाठी पुरातत्व विभाग आणि केंद्रीय मंत्री यांच्याशी बैठक घेऊ. आम्ही छत्रपतींच्या नावाने राज्य करत आहोत. राज्यकारभार करत असतांना आम्हाला न्यायबुद्धी द्यावी आणि आमच्याकडून रयतेची सेवा होऊ द्या, अशी आम्ही शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो.
🕘 8:45 am | 2-06-2023 | 📍Raigad | स. ८:४५ वा. | २-०६-२०२३ 📍 रायगड
🔸 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त आयोजित भव्य सोहळा
🔸Grand ceremony on the auspicious occasion of 350th coronation year of Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort… pic.twitter.com/XMbz3rT2hj— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 2, 2023
शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार !
देहली येथे छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, असे या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शिवरायांची राजनीती राज्यकारभार करण्यासाठी प्रेरणा देते ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधानांनी त्यांच्या संदेशात म्हटले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी ३५० वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याद्वारे निर्माण केलेले सुशासन आणि समृद्धी यांतून आजही प्रेरणा मिळते. राष्ट्र आणि लोककल्याण हे हिंदवी स्वराज्याचे मूलतत्त्व होते. छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकाच्या वेळी भारताची एकता आणि अखंडता यांना सर्वोच्च ठेवले.
Chhatrapati Shivaji Maharaj is a beacon of courage and bravery. His ideals are a source of great inspiration. https://t.co/eQZgsyTMm4
— Narendra Modi (@narendramodi) June 2, 2023
केंद्रशासनाच्या ‘एक भारत अभियान’ या संकल्पनेत हिंदवी स्वराज्याचेच प्रतिबिंब आहे. देशवासियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे दायित्व शासनकर्त्यांचे असते. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीमुळे जनतेचा आत्मविश्वास दुर्बल झाला असतांना शत्रूंना पराजित करून छत्रपती शिवरायांनी देशवासियांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. जनतेची गुलामगिरीची मानसिकता नष्ट करून त्यांना राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरित केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नेतृत्व अद्भुत होते. छोट्या वयातच गड-दुर्ग जिंकून त्यांनी स्वत:चे नेतृत्व सिद्ध केले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी जनतेला लोककल्याणकारी राज्य दिले. धर्म, संस्कृती आणि परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्यांना त्यांनी धडा शिकवला. शेतकर्यांचा सन्मान, महिलांचे रक्षण, गड-दुर्गांची निर्मिती, आरमाराची स्थापना आदी अनेक पैलूंनी युक्त त्यांचे जीवन प्रभावशाली होते. समुद्रीशक्तीचे महत्त्व ओळखून त्यांनी जलाशयातील शक्तीचा विस्तार केला. त्यांनी निर्माण केलेले जलदुर्ग आजही अभेद्य आहेत. शिवरायांची वीरता, विचारधारा आणि न्याय यांतून अनेक पिढाला प्रेरणा मिळत आहे. ज्यांची राजनीती आजही राज्यकारभारासाठी प्रेरणा देते. अनेक देशांमध्ये त्यांच्या नीतीचा अभ्यास केला जात आहे.’
आत्मबलीदानाचा प्रसंग आला, तरी हिंदवी स्वराज्याची परंपरा सोडणार नाही ! – समस्त शिवप्रेमींची रायगडावरील शपथ
मी हिंदवी स्वराज्याचा पाईक आहे. हिंदु धर्मावर अत्यंत श्रद्धा असलेला एक शिवभक्त म्हणून मी शपथ घेतो की, हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेल्या ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी राजगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला मी नेहमी उपस्थित राहीन. सनातन हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात घेऊन ही परंपरा मी कायम जोपासेन. हिंदवी स्वराज्याच्या परंपरेचे रक्षण करण्यासाठी आत्मबलीदान करण्याचा प्रसंग आला, तरी ही परंपरा मी सोडणार नाही. माता, भगिनी, दीनदुबळे यांच्यावर होणार्या अन्यायाच्या विरोधात मी वाचा फोडून स्वत: त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीन. गडावर कोणत्या प्रकारच्या विकृत कृत्यांना थारा देणार नाही. मी स्वधर्माचे आचरण सातत्याने करीन. शंकराचार्य, शिवाचार्य, महंताचार्य, भारती, वैष्णव, शाक्त असा कोणताही भेद न मानता ‘सनातनी हिंदु’ या भावनेने मी सर्वांशी सहिष्णुतेने वागेन. ही शपथ मी स्व:धर्म आणि राष्ट्र, कुलदैवत आणि छत्रपती शिवराय यांच्या चरणी समर्पित करतो.
ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण !
१. महाराष्ट्राच्या पोलिसांनी छत्रपती शिवरायांनी मानवंदना दिली.
२. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताचे गायन राज्याभिषेक सोहळ्याच्या ठिकाणी झाले.
३. राज्याभिषेक सोहळ्यानंतर हिंदु धर्म, परंपरा आणि संस्कृती यांच्या रक्षणाची शपथ सर्वांनी घेतली.
४. शिवरायांच्या पालखी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी खांद्यावर घेतली.
५. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.गडावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होता. ढोल-ताशा, लेझीम आदी पारंपरिक वाद्यांचे वादन युवकयुवती यांनी मोठ्या उत्साहाने केले.
६. सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे व्हिडिओद्वारे प्रक्षेपण करण्यात आले.
७. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब सोहळ्याला उपस्थित होते.
८. रायगडावरील शिवरायांच्या मेघडंबरी पुतळ्याला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. गडावर ठिकठिकाणीही फुलांची आरास करण्यात आली होती.