परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीमुळे शिवणकलेत साधिकेला मिळालेले कौशल्य संत, सद्गुरु आणि बाहेरील शिंप्यांच्याही लक्षात येणे

‘कुटुंबियांना हातभार लावण्याच्या उद्देशाने शिकलेले शिवणकाम पुढे साधनेत उपयोगी पडले. वर्ष २०१५ पासून शिवणाशी संबंधित सेवा करतांना मला परात्पर गुरुदेवांकडून (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून) ‘शिवणकलेला अध्यात्माची जोड कशी द्यायची ?’, याची शिकवण मिळाली. त्याप्रमाणे मी संत आणि साधक यांचे कपडे शिवून देण्याची सेवा करत आहे. संत, साधक आणि बाहेरील शिंपी यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिवणकाम शिकणे आणि पुढे साधनेत आल्यावर त्याचा लाभ होणे

सौ. पार्वती जनार्दन

१ अ. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे बाहेर काम करत उरलेल्या वेळेत कपडे शिवायला शिकणे : साधनेत येण्याअगोदर घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मी एका ठिकाणी काम करत असतांना मला जेवढा वेळ मिळेल, तेवढ्या वेळेत शिवण शिकले. नंतर मी ऋण काढून एक शिवणयंत्र घेतले. मी दिवसभर एका शिंप्याच्या दुकानात काम करायचे आणि संध्याकाळी घरी परत येतांना मी काम करत असलेल्या ठिकाणच्या बाजूच्या दुकानातील शिंप्याकडून कपडे शिवायला घेऊन यायचे. रात्री घरी बसून मी ते कपडे शिवायचे आणि दुसर्‍या दिवशी कामाला जातांना त्यांना ते परत नेऊन द्यायचे. देवाने त्या वेळी परिस्थिती निर्माण करून मला शिवण शिकवले.

१ आ. शिवण शिकल्यामुळे पुढे सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना चालू केल्यावर संतांसाठी कपडे शिवून देता येणे, त्यातून संतसेवा घडून लाभ होणे : पुढे सनातन संस्थेच्या माध्यमातून मी साधना करू लागल्यावर मला शिवणकलेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली, तसेच आश्रमातून घरी गेल्यावर आणि दळणवळण बंदीच्या काळातही मला ही सेवा करता आली. कपडे शिवण्याच्या माध्यमातून मला अनेक संतांची सेवा करण्याची संधी मिळाली. हे सर्व पहाता ‘देवाने या जिवाकडून शिवणकलेच्या माध्यमातून साधना करून घेण्याचे नियोजन आधीच केले होते’, याची जाणीव होऊन मला फार कृतज्ञता वाटली.

२. संत आणि साधक यांनी केलेले कौतुक

२ अ. ‘शिवून घडी घालून दिलेल्या कपड्यांकडे पाहून छान वाटते’, असे पू. नीलेश सिंगबाळ यांनी सांगणे आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनीही ‘त्या कपड्यांकडे पाहूनच भावजागृती होते’, असे सांगून पुष्कळ कौतुक करणे : वर्ष २०१८ मध्ये मी पू. नीलेशदादांना (आताचे सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना) सदरा आणि पायजमा शिवून दिला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही शिवून घडी घालून दिलेल्या कपड्यांकडे बघूनही छान वाटते. स्थुलातूनच नाही, तर सूक्ष्मातूनही छान वाटते.’’ तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सद्गुरु बिंदाताई (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ) मला म्हणाल्या, ‘‘तू पू. दादांना शिवून दिलेल्या सदर्‍याकडे पाहूनच माझी भावजागृती झाली. भावपूर्णपणे नामजपासहित सदरा शिवल्याने सदर्‍याकडे पाहून छान वाटत आहे. तू पुरुषांचे कपडेही किती छान शिवतेस ? तू हे सर्व कुठे आणि कशी शिकलीस ?’’ त्यावर मी त्यांना म्हणाले, ‘‘हे सर्व मला परात्पर गुरुदेवांनी शिकवले आहे. त्यामुळे हे सर्व शक्य होत आहे.’’

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू पू. अनंत आठवले, त्यांच्या पत्नी आणि सनातनचे अनेक सद्गुरु अन् संत यांचे कपडे शिवणे, त्या सर्वांनीच त्यांना ‘ते पुष्कळ आवडले’, असे सांगणे : सद्गुरु अन् संत यांना मी शिवून दिलेले कपडे आवडले. त्यांनी ‘छान शिवले’, असे माझे कौतुक केले. मी पू. भाऊकाका (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू पू. अनंत आठवले) यांच्यासाठी सदरे आणि पायजमे शिवून दिले होते. तेव्हा त्यांच्या पत्नी सौ. आठवलेकाकूंनी स्वतःहून मला भ्रमणभाष करून ‘फार छान शिवले आहेस. आवडले’, असे सांगितले. एकदा मी सौ. आठवलेकाकूंनाही पंजाबी पोशाख शिवून दिला. तेव्हाही त्यांनी ‘पोषाख आवडला’, असे मला कळवले.

२ इ. मी काही साधकांनाही सदरे शिवून दिले होते. त्यांनी मला सांगितले, ‘‘बाहेरून शिवून घेतलेल्या कपड्यांपेक्षा तू शिवलेले सदरे नीट बसतात. चांगले शिवले आहेस.’’

३. परात्पर गुरु डॉक्टरांनी कपडे शिवतांना त्यात काही सुधारणा करायला शिकवल्यामुळे बाहेरच्या शिंप्यांनाही शिवणकामातील कौशल्य जाणवणे

अ. एकदा एक साधकाने गोव्यात एका शिंप्याकडे त्याचा सदरा शिवायला देतांना मी शिवून दिलेला सदरा मापाला दिला. त्या शिंप्याने त्याला विचारले, ‘‘सदरा छान शिवला आहे ? कुणाकडे शिवलास ?’’ साधकाने त्याला सांगितले, ‘‘माझ्या ताईने शिवला आहे.’’ हे ऐकल्यावर त्याला फार आश्चर्य वाटले. चित्रीकरणाच्या दृष्टीने सदर्‍याला पुढे बटनपट्टी लावतांना शिलाई दिसणार नाही, अशा पद्धतीने शिवले होते. ‘ती बटनपट्टी कशी शिवली ?’ याचे ते शिंपी निरीक्षण करत होते’, असे मला त्या साधकाने सांगितले.

आ. घरी असतांना सदरा शिवल्यावर ‘ओव्हरलॉक’ शिलाईसाठी मला तो बाहेरील शिंप्याकडे द्यावा लागायचा. माझे पती तो सदरा बाहेरील शिंप्याकडे घेऊन जायचे. ते शिंपी त्यांना विचारायचे, ‘‘तुमची पत्नी स्वतः ‘कटिंग’ करून शिवते का ? शिवणकाम फार कौशल्यपूर्ण केले आहे.’’

‘परात्पर गुरु साक्षात् परमेश्वर असल्याने ते परिपूर्ण आहेत. त्यांच्या शिकवणीचा वेगळेपणा बाहेर समाजातही सर्वांना जाणवतो’, असे माझ्या लक्षात आले.

४. पू. रमानंदअण्णा यांचे सदरे परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असे शिवता न येणे, त्याचा अभ्यास चालू असणे

परात्पर गुरु डॉक्टरांना शिवणकामातील परिपूर्णता आणि चित्रीकरण या दृष्टीने सदर्‍यावर सुरकुत्या न येणे अपेक्षित आहे. मला पू. रमानंदअण्णांचे सदरे तसे शिवता आले नाहीत. ‘त्यांच्या शरीरप्रकृतीला नीट बसणारा सदरा कसा शिवायचा ?’, याचा सध्या अभ्यास चालू आहे.

‘हे गुरुदेवा, माझा शिवणकामाचा अभ्यास फार वर्षांचा नाही, तरीही तुम्ही मला तुमचे आणि सनातनच्या संतांचे कपडे शिवण्याची संधी दिलीत. तुम्हीच माझ्याकडून हे सर्व करवून घेत आहात. यासाठी तुमच्या चरणी कृतज्ञता !’

– सौ. पार्वती जनार्दन (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ३३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.६.२०२१)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बंडी दुरुस्त करायला शिकवतांना सौ. पार्वती जनार्दन यांना सेवा परिपूर्ण करायला शिकवणे

४.१.२०२० या दिवशी शिवणाशी संबंधित सेवा करणारी साधिका सौ. पार्वती जनार्दन यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांची बंडी दुरुस्त करण्यास दिली होती. तेव्हा त्यांनी बंडीच्या गळ्याकडील थोडासा फाटलेला भाग नीट करून आणण्यास सांगितले होते. दुरुस्त केलेला भाग योग्य प्रकारे न शिवल्याने तो वाईट दिसत असल्याचे सांगून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी छोट्या छोट्या बारकाव्यानिशी अभ्यास करायला शिकवून सेवा परिपूर्ण करून घेण्यातील टप्पे येथे दिले आहेत.

शिवणकामाची सेवा भावपूर्ण करतांना सौ. पार्वती जनार्दन

१. ‘परात्पर गुरु डॉक्टरांची दुरुस्त करायला आलेली बंडी मी ठिगळ (पॅच) लावून शिवली.

२. परात्पर गुरु डॉक्टरांनी ते पाहून दुरुस्त केलेले किती वाईट दिसते, हे लक्षात आणून दिले आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी ती दुरुस्त करण्याविषयी मार्गदर्शन केले.

३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर मी दुरुस्ती केल्यावर बंडी पुन्हा नवी वाटू लागली. बंडी कुठे फाटली होती, हे लक्षातही येत नव्हते.

यातून ‘परात्पर गुरुदेव किती काटकसरीने कपडे वापरतात ?’, हे लक्षात येते. मी शिकलेल्या शिवणकामानुसार मुलींच्या पोशाखाला अशा पद्धतीने ‘गोट (गोलाकार, पायपिंग)’ लावतात. पुरुषांच्या कपड्यांना अशा पद्धतीने रुंद गोट (गोलाकार, पायपिंग) नसतो. त्यामुळे मला बुद्धीने वाटत होते की, ‘ते चांगले दिसणार नाही, तरी परात्पर गुरुदेवांनी सांगितल्यावर त्यांचे आज्ञापालन म्हणून मी तशी दुरुस्ती करून दिली.’ दुरुस्त केल्यावर ते चांगले दिसत होते आणि परात्पर गुरुदेवांनी ती बंडी वापरलीही. यातून बुद्धीने विचार करण्यापेक्षा परात्पर गुरुदेवांनी छोट्या छोट्या बारकाव्यानिशी अभ्यास करून मला सेवा परिपूर्ण करायला शिकवले.’

– सौ. पार्वती जनार्दन (१८.५.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक