परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी अनुभवलेले भावक्षण !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव हृदयमंदिरात साजरा करण्याचे ठरवून त्याप्रमाणे प्रतिदिन प्रयत्न केल्यामुळे त्यांचे स्मरण आणि अस्तित्व अधिक प्रमाणात अनुभवता येणे

‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याच्या १५ दिवस आधीपासून ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्म माझ्या हृदयामध्ये झाला आहे आणि माझ्या हृदयमंदिरामध्ये त्यांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे’, असा भाव ठेवण्याचा मी प्रयत्न केला. त्या कालावधीत सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे उत्तर भारतात भाववृद्धी सत्संग घेत असत. मी त्या सत्संगात ‘ऑनलाईन’ सहभागी होत असे. सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी हा भाव त्या कालावधीतील प्रत्येक दिवशीच्या भाववृद्धी सत्संगामध्ये ठेवण्यास सांगितल्याने त्यासाठी प्रत्येक दिवशी माझ्याकडून कृतीच्या स्तरावर प्रयत्न केले जायचे. त्यामुळे गुरुदेवांचे स्मरण अणि त्यांचे अस्तित्व मला अधिक प्रमाणात अनुभवता आले.

आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे

२. जन्मोत्सवाच्या कालावधीत साधिकेचे शरीर आणि पलंग यांवर दैवी कण दिसणे

जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी आणि जन्मोत्सवाच्या दिवशी मला माझ्या पलंगावर चंदेरी अन् सोनेरी रंगाचे दैवी कण दिसले. २२ ते २९.५.२०२२ या कालावधीत मला माझे शरीर आणि पलंग यांवर दैवी कण दिसले.

३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाला वाहिलेली फुले रात्री उशिरापर्यंत ताजी रहाणे

मी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पलंगावर ठेवला आहे. मी त्याला प्रतिदिन पारिजातकाची फुले वहात असते. २१ आणि २२.५.२०२२ या दिवशी मी सकाळी वाहिलेली फुले रात्री उशिरापर्यंत ताजी राहिली होती.

४. हृदयमंदिरात परात्पर गुरु डॉक्टरांची मानसपूजा करत असतांना गुरुचरणांचे व्यापक रूपात दर्शन होऊन भावजागृती होणे

२२.५.२०२२ या जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी ‘मी माझ्या हृदयमंदिरातच प.पू. गुरुदेवांची मानसपूजा करत आहे’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मला माझ्या हृदयामध्ये गुरुचरणांचे व्यापक स्वरूपात दर्शन झाले. तेव्हा ‘गुरुचरणांनी संपूर्ण ब्रह्मांड व्यापलेले आहे आणि गुरुचरण चराचरात व्याप्त आहेत’, असे वाटून माझी भावजागृती होत होती.’

– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक. (४.६.२०२२)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाविषयीचा भावजागृतीचा प्रयोग करतांना आलेल्या अनुभूती

१. भावजागृतीचा प्रयोग करतांना प्रत्यक्ष रथोत्सव चालू असल्याचे अनुभवणे

‘जन्मोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प.पू. गुरुदेवांच्या रथोत्सवाची छायाचित्रे पहातांना माझी भावजागृती झाली. मी स्थुलातून रथोत्सवाला उपस्थित राहू शकले नाही. गुरुदेवांनी मला हृदयामध्ये मानस रथोत्सव करण्याचा विचार दिला. त्यानंतर भाववृद्धी सत्संगामध्ये आमच्याकडून प.पू. गुरुदेवांच्या रथोत्सवाविषयीचा भावजागृतीचा प्रयोग करून घेण्यात आला. भावजागृतीचा हा प्रयोग करत असतांना ‘प्रत्यक्ष रथोत्सव चालू आहे’, असे मला अनुभवता आले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी दैवी रथातून ब्रह्मांडामध्ये संचार करून हिंदु (सात्त्विक) राष्ट्र-स्थापनेमधील सर्व अडथळे दूर केले असल्याचे जाणवणे

रथोत्सवाच्या वेळी मला जाणवले, ‘श्रीमन्नारायण विष्णुस्वरूप गुरुमाऊली आणि महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी या दैवी रथामधून संपूर्ण ब्रह्मांडामध्ये संचार केला आहे. त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडामध्ये संचार करून सूक्ष्म स्तरावर हिंदु (सात्त्विक) राष्ट्र-स्थापनेमधील सर्व अडथळे दूर केले आहेत आणि हिंदु (सात्त्विक) राष्ट्र-स्थापनेची गती वाढवली आहे.’

३. प.पू. गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ब्रह्मांडात संचार करत असतांना संपूर्ण विश्वामध्ये मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित झाले अन् या माध्यमातून त्यांनी सर्व साधकांना ऊर्जा प्रदान केली.

४. त्या वेळी ‘संपूर्ण ब्रह्मांडामध्ये गुरुदेवांचा जयघोष होत आहे’, असे मला जाणवले.

५. ‘या रथोत्सवाच्या वेळी देवतांनी सूक्ष्मातून प.पू. गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर पुष्पवृष्टी केली’, असे मला जाणवले.

मला ही भावस्थिती पुष्कळ वेळ अनुभवता आली.

‘प.पू. गुरुदेवांच्याच कृपेने मला हे सर्व भावक्षण अनुभवता आले आणि त्यांचे अस्तित्व अनुभवायला मिळाले’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक.

(४.६.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • दैवी कण :  सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन  हे  घटक  असल्याचे  सिद्ध  झाले.  या  घटकांच्या  मूलद्रव्यांच्या  प्रमाणावरून शोधलेले  त्यांचे  ‘फॉर्म्युले’  सध्या  अस्तित्वात  असलेल्या  कोणत्याही  कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक