कदंब महामंडळाच्या ‘इलेक्ट्रिक बस’मुळे गोव्यात कार्बन उत्सर्जनात घट ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

कदंब महामंडळाच्या ताफ्यात २० नवीन वातानुकूलित ‘इलेक्ट्रिक बस’ची भरती

पणजी, १८ मे (वार्ता.) – राज्यात आतापर्यंत कदंब महामंडळाच्या ‘इलेक्ट्रिक बस’ ५४ लक्ष कि.मी. धावल्या आहेत. वीजेवरील (इलेक्ट्रिक) बसमुळे राज्यात कार्बन उत्सर्जनात ३६ टक्के घट झाली आहे. कदंब महामंडळाच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक करण्याचे सरकारचे ध्येय असून यामुळे कार्बन उत्सर्जनात १०० टक्के घट होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. बांबोळी येथे आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते कदंब महामंडळाच्या २० नवीन वातानुकूलित ‘इलेक्ट्रिक बस’ना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या वेळी परिवहनमंत्री माविन गुदिन्हो, कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘आगामी काही मासांत राज्यातील प्रत्येक पेट्रोलपंपावर इलेक्ट्रिक वाहनासाठी ‘चार्जिंग’ची (भारित करण्याची) सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यापुढे जेव्हा दुचाकी किंवा चारचाकी वाहन घ्यायचे असेल, तेव्हा प्रत्येकाने इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा विचार करावा. यामुळे कार्बन उत्सर्जन घटणार आहे. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणार्‍यांना सरकार अनुदान देणार आहे. कदंब महामंडळाकडून मडगाव, पणजी, वास्को आणि काणकोण बस डेपो (आगार) येथे एकूण ५ चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत.’’

 नव्याने भरती केलेल्या वातानुकलित इलेक्ट्रिक बसची वैशिष्ट्ये

१. दिव्यांग (विकलांग) लोकांसाठी चढणे-उतरणे सुलभ असेल
२.बसमधील अत्याधुनिक कॅमेरे पोलीस ठाण्यांशी जोडलेले आहेत
३. बसची अचूक वेळ भ्रमणभाषवर उपलब्ध होईल आणि त्यासाठी भ्रमणभाष ॲप चालू करण्यात येणार आहे.
४. तिकिटासाठी ‘क्यू.आर्. कोड’ चालू करण्यात आला आहे.
५. एकदा ‘चार्ज’ केलेली इलेक्ट्रिक बस सलग ४ घंटे २५० कि.मी. अंतर पार करू शकेल.

चार बसस्थानके आधुनिक होणार !

वास्को, मडगाव, पणजी आणि म्हापसा या बसस्थानकांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. खासगी बस लवकरच कदंब महामंडळामध्ये समाविष्ट केल्या जाणार असून यासंबंधी निर्णय पुढील मंत्रीमंडळ बैठकीत घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

गोव्यात रात्री ८ नंतर सार्वजनिकबससेवा चालू करणार !

सरकार लवकरच पर्यटक आणि रात्रपाळी करणारे कर्मचारी यांच्यासाठी रात्रीची सार्वजनिक बससेवा चालू करणार आहे. सध्या राज्यात रात्री ८ वाजल्यानंतर सार्वजनिक बससेवा उपलब्ध नाही. रात्रीची बससेवा चालू केल्याने होणारी हानी सोसण्यासाठी सरकार सिद्ध आहे. पणजी ते म्हापसा, फोंडा, कुडचडे, शिरोडा या मार्गांवर बससेवा चालू करण्याचा सरकारचा विचार आहे. इतर राज्यांत रात्रीची बससेवा उपलब्ध आहे. ही सेवा चालू करण्यासाठी खासगी बसेसचे साहाय्य लागणार आहे. गोवा हे एक ‘आदर्श राज्य’ करण्यासाठी राज्यातील वाहतूक व्यवस्थेत कुठेही कमतरता असू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सध्या १ सहस्र ४६० खासगी बस आणि कदंबच्या इलेक्ट्रिक बस मिळून ६०० बस आहेत.