मोढा बुद्रुक येथील हिंदु जनजागरण सभेतील प्रकार
छत्रपती संभाजीनगर – सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे १३ मे या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या हिंदु जनजागरण सभेत प.पू. कालीचरण महाराज यांनी हिंदु-मुसलमान समाजात तेढ निर्माण होईल असे भाषण केल्याच्या आरोपावरून, तसेच नियम अन् अटी यांचे पालन न केल्याप्रकरणी पोलिसांनी प.पू. कालीचरण महाराज यांच्यासह सिल्लोड येथील भाजपचे शहराध्यक्ष आणि इतर ४ लोकांविरुद्ध विविध कलमांअंतर्गत सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
य सभेत रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे सभेसाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या वेळी मार्गदर्शन करतांना प.पू. कालीचरण महाराज आणि आयोजकांनी हिंदु-मुसलमान समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी स्वतः तक्रारदार होऊन ही तक्रार दिली आहे.
प.पू. कालीचरण महाराज यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक तथा सिल्लोडचे भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया, या कार्यक्रमाचे नियोजन समितीचे अध्यक्ष आणि भाजपचे कार्यकर्ते सुनील जाधव (मोढा बुद्रुक), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक जिल्हाप्रमुख केतन कल्याणकर या ४ लोकांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यतीन कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिका
|
गुन्हे मागे घेण्याची भाजपच्या पदाधिकार्यांची मागणी !
या सभेत गोंधळ झाला नाही, तसेच कुणाची मने दुखावली नाहीत किंवा कुणी नागरिकांनी यावर आक्षेप घेतलेला नाही. असे असतांना केवळ राजकीय षड्यंत्रामुळे पोलिसांनी दबावाखाली भाजपचे पदाधिकारी आणि प.पू. कालीचरण महाराज यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद केले आहेत, असा आरोप भाजपच्या पदाधिकार्यांनी केला आहे. त्यामुळे हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी भाजपच्या पदाधिकार्यांनी केली आहे.