(म्हणे) ‘भारताला वेळ आल्यावर त्याला नेहमीच आठवणीत राहील असे उत्तर देऊ !’-बिलावट भुट्टो

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावट भुट्टो यांची पोकळ दर्पोक्ती !

नवी देहली – जगातील एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन श्रीनगरमध्ये करण्यावरून भारताचा अहंकार दिसून येतो. वेळ आल्यावर आम्ही भारताला उत्तर देऊ, जे त्याच्या नेहमीच आठवणीत राहील, अशी दर्पोक्ती पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी केली.

जी-२०ची बैठक श्रीनगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्यावरून भुट्टो यांनी हे विधान केले. आता या विधानावरून पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानाकडे धमकी म्हणून पहाणे ही दायित्वशून्यता असेल. संवेदनशील आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये वार्तांकन करतांना पत्रकारितेच्या मापदंडांचा सन्मान केला पाहिजे, असेही पाकच्या मंत्रालयाकडून पत्रकारांना सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला.

संपादकीय भूमिका

  • भारताला उत्तर देण्याची भाषा करणारा पाक किती दिवस देश म्हणून तग धरून रहाणार आहे, हाच खरा प्रश्‍न आहे !
  • पाकच्या माजी सैन्यदलप्रमुखांनीच स्पष्ट केले आहे की, पाकच्या सैन्याकडे भारताशी लढण्याची क्षमता राहिलेली नाही. असे असतांना अशा प्रकारची विधाने करणे हे उसने अवसान आणण्यासारखेच होय !