नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – बांगलादेशी घुसखोरांना स्थानबद्ध करण्यासाठी मुंबईत स्थानबद्धता केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली.
राज्यात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार बांगलादेशी बंदीवानांना नियमितच्या कारागृहात ठेवता येत नाही. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांना कुठे ठेवावे ? याविषयी पोलिसांसमोर प्रश्न असतो. अशा प्रकारे स्थानबद्धता केंद्र बांधण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जागा दिली आहे; मात्र ही जागा या निकषात बसत नाही. या स्थानबद्धता केंद्रासाठी मुंबई महानगरपालिकेकडून दुसरी जागा दिली जाणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र कारागृहे आणि सुधार सेवा विधेयकावरील चर्चेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.