सातारा, २१ डिसेंबर (वार्ता.) – गोडोली गावातील भैरवनाथ मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम २१ ते २४ डिसेंबर या कालावधीत होणार आहेत, अशी माहिती ‘श्री भैरवनाथ मंदिर संयोजन समिती’च्या वतीने देण्यात आली.
गोडोली गावातील भैरवनाथ मंदिर स्थापत्यकलेचा आविष्कार असलेले हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा सोळशी येथील प.पू. नंदगिरी महाराज यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती आहे.
२२ डिसेंबर या दिवशी सकाळी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या निमित्ताने ह.भ.प. कांचनताई शेळके यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत होणार आहे. २३ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता पुसेगाव देवस्थानाचे मठाधिपती प.पू. सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ डिसेंबर या दिवशी ह.भ.प. सावता महाराज फुले यांच्या भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. तरी समस्त गोडोली आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भाविक यांनी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.