पक्षांतर्गत बंडाळीची चिन्हे शमवण्यासाठी शरद पवार यांनी केलेले नाटक होते ! – संजय शिरसाट, आमदार, शिवसेना

छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत बंडाळीची जी चिन्हे दिसत होती, त्याला शमवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले हे एक प्रकारचे नाटकच आहे, असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी ५ मे या दिवशी केला. शरद पवार यांनी त्यांच्या त्यागपत्राचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर संजय शिरसाट यांनी या संपूर्ण प्रकाराला ‘राष्ट्रवादी नाट्य’ संबोधले आहे.

ते पुढे म्हणाले की, या संपूर्ण घटनेतून शरद पवार यांनी आपल्या ताकदीची परीक्षा घेतली. शरद पवार हे मोठे राजकारणी आहेत. त्यांनी योग्य वेळी टाकलेली ही गुगली होती. शरद पवार यांनी त्यागपत्र दिल्यानंतर खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या तोंडवळ्यावर तणाव दिसत नव्हता. त्याच वेळी मनात शंका नक्कीच झाली की, काहीतरी घडत आहे. शरद पवार या पक्षांतर्गत लोक आणि जे कुणी विरोध करत आहेत, त्यांचा या त्यागपत्र नाट्यात ‘योग्य’ कार्यक्रम केला. ‘आता पुन्हा अशी हिंमत कराल, तर मी माझा बडगा तुम्हाला दाखवीन’, अशी चेतावणीच शरद पवार यांनी यातून दिली आहे.