गोविंद पानसरे यांच्या हत्येचे प्रकरण
सांगली, २४ एप्रिल (वार्ता.) – कोल्हापूर येथील कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मी आरोपींकडून अधिवक्तापत्र घेतले असून त्याकामी पोलीस संरक्षण मिळावे, अशा मागणीचे निवेदन अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी २४ एप्रिल या दिवशी येथील पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांना दिले. या वेळी सांगली येथील अधिवक्ता अमोघवर्ष खेमलापुरे, अधिवक्त्या प्रीती पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय रेठरेकर उपस्थित होते. या वेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली म्हणाले की, या निवेदनाच्या संदर्भात चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी निवेदनात म्हटले आहे की,
१. कोल्हापूर येथील अधिवक्ता गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटकेतील आरोपींच्या वतीने मी अधिवक्तापत्र घेतले असून आरोपी क्रमांक १ याला अटक झाल्यापासून म्हणजे वर्ष २०१५ पासून मी काम पहात आहे.
२. यातील आरोपी हे हिंंदुत्वनिष्ठ असल्याने त्यांनी गोविंद पानसरेंविरुद्ध आकस ठेवून त्यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे.
३. सदर कामी आरोपी क्रमांक १ याला अटक झाल्यानंतर त्याचे अधिवक्तापत्र घेण्यास कोल्हापूर अधिवक्ता संघटनेने नकार दिला होता. सर्व आरोपींच्या रिमांडच्या वेळी माझ्यावर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
४. सुनावणीस कोल्हापूर न्यायालयात गेलो असता माझ्या गाडीचा पाठलाग करणे, न्यायालयातून बाहेर येतांना जोरदार घोषणा देणे, माझ्या गाडीवर दगडफेक करणे, असे प्रकार झालेले आहेत.
५. त्या वेळी सदर प्रकार कोल्हापूर येथील पोलीस अधिकारी, तसेच न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यामुळे पुढील प्रकार थांबले; परंतु कोल्हापूर येथे सुनावनीला गेलो असता परत काहीजण संशयास्पद माझ्या मागे येत असल्याचे जाणवत आहे.
६. सदर प्रकरणाची सुनावणी नुकतीच चालू झाली असून ४ साक्षीदार पडताळले गेले आहेत. पुढील दिनांक २७ एप्रिल २०२३ हा आहे.
७. कोल्हापूर येथील पानसरे हत्या प्रकरणातील अटकेतील आरोपी यांच्यावर कर्नाटकातील गौरी लंकेश आणि डॉ. कलबुर्गी प्रकरणातही आरोपी केले आहे, तर काहींना पुणे येथील डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात आरोपी केलेले आहे.
८. एकूणच या सर्व प्रकरणात सर्व बाजूंनी माझ्यावर दबाब आहे; कारण आरोपी सर्व कामात थोड्या फार फरकाने तेच असल्याने मला कर्नाटकातील धारवाड आणि बेंगळुरू येथेही जावे लागते, तसेच पुणे येथील सुनावणींना जावे लागते.
९. अशातच गौरी लंकेश प्रकरणात मडिकेरी येथील माझे सहकारी अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्यावर गोळीबार झाला असून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला गेला आहे. सुदैवाने त्यामध्ये जीवितहानी झालेली नाही.
१०. अशा परिस्थितीत अशा प्रकारचे आक्रमण माझ्यावरही होऊ शकते, अशी मला भीती आहे; कारण वर नमूद परिस्थितीत मला प्रचंड दबावाखाली काम करावे लागत आहे, तरी मला आपल्याकडून पानसरे हत्या प्रकरण संपेपर्यंत सरकारी व्ययाने पोलीस संरक्षण मिळावे, अशी विनंती आहे.