बंगालमध्ये पोलिसांनी बलात्कारित तरुणीचा मृतदेह रस्त्यावरून फरफटत नेला !

  • पोलीस गुन्ह्याचे पुरावे नष्ट करत असल्याचा भाजपचा आरोप !

  • भाजपची सीबीआय चौकशीची मागणी

  • मुलीवर बलात्कार झाला नसल्याचा पोलिसांचा शवविच्छेदनाद्वारे दावा

पोलिसांनी मृत पीडितेचा मृतदेह फरफटत नेला

उत्तर दिनाजपूर (बंगाल) – येथे एका अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर येथे हिंसाचार झाला. मृत पीडितेचा मृतदेह नेत असतांना गावकर्‍यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या वेळी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांकडून मृत पीडितेचा मृतदेह फरफटत नेला जात असल्याचा व्हिडिओ २२ एप्रिल या दिवशी प्रसारित झाला होता. भाजपचे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला होता.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार मुलीच्या शवविच्छेदनानुसार तिने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जावेद नावाच्या तरुणाला अटक केली आहे. मुलगी आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. भाजपच्या स्थानिक खासदार देबाश्री चौधरी यांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे राज्याच्या महिला आणि बाल विकास अन् समाज कल्याण मंत्री डॉ. शशि पंजा यांनी आरोप केला की, भाजपचे नेते जनतेला भ्रमित करून चिथावणी देत आहेत.

१. पोलिसांचे म्हणणे आहे की, मुलगी बेपत्ता होती; मात्र तिच्या कुटुंबियांनी याविषयी कोणतीही तक्रार केली नव्हती. त्यानंतर या मुलीचा मृतदेह कालव्यामध्ये सापडला. पोलीस जेव्हा मृतदेह घेण्यास गेले असता त्यांच्यावर लोकांकडून दगडफेक करण्यात आली.

२. बंगालमधील भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी म्हटले की, आम्हाला पीडितेच्या कुटुंबियांना भेटू दिले नाही. आम्हाला पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले.

सरकारकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही ! – राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो

प्रियंक कानूनगो

या संदर्भात राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी ट्वीट करून म्हटले की, मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी पीडितेचा मृतदेहाचा अवमान केला आहे. राज्य सरकारला या संदर्भात सूचित केल्यानंतर सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

संपादकीय भूमिका

  • असे संवेदनशून्य पोलीस जनतेचे रक्षण करण्यास लायक आहेत का ?
  • बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा कधीच वाजले आहेत. तेथे राष्ट्रपती राजवट लावण्याला पर्याय नाही. त्यामुळे ज्या काही घटना घडत आहेत, त्या म्हणजे ‘तृणमूलला निवडून दिलेल्या लोकांना शिक्षाच आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
  • महिला मुख्यमंत्र्याच्या राज्यात मुली, तरुणी असुरक्षित रहाणे, हे लज्जास्पद !