आम्ही युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी रशियाला शस्त्रे देणार नाही ! – चीन

चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग

बीजिंग (चीन) – चीन युक्रेन-रशिया युद्धामध्ये तटस्थ रहाणार आहे. युद्धात दोन्ही देशांना शस्त्रे दिली जाणार नाहीत; मात्र या काळात रशियासमवेतचे मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवू, अशी माहिती चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग यांनी दिली. ते जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांसमवेत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

१. दुसरीकडे रशियाला युद्धासाठी शस्त्रे पाठवण्याच्या निर्णयाला चीनने मान्यता दिल्याची, तसेच पुरवठ्याची माहिती गुप्त ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

२. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी निवेदनात म्हटले की, रशियाला पाठवलेल्या त्या वस्तूंवरही बंदी घालण्यात येईल, ज्यांचा वापर नागरी आणि सैनिकी दोन्हींसाठी करता येईल. चीनला युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे. यावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी आम्ही साहाय्य करण्यास सिद्ध आहोत.

३. चीनच्या विधानावर अमेरिकेने म्हटले की, आम्ही चीनच्या निर्णयाचे स्वागत करतो. ‘रशियाला साहाय्य करणे, हे चीनच्या हिताचे नाही’, असे अमेरिका पूर्वीपासूनच सांगत आली आहे. आम्ही संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत.