पुणे मेट्रोच्या कामात अनेक त्रुटी !

पुणे – मेट्रो स्थानकांच्या उभारणीत अनेक त्रुटी असल्याचे शहरातील ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणल्याने मेट्रोस्थानकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. अभियंत्यांनी या संदर्भात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना पत्र पाठवले होते. महामेट्रोनेही काही त्रुटी मान्य केल्या आहेत. स्ट्रक्चरल अभियंता नारायण कोचक, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सिव्हिल अभियंता शिरीष खासबारदार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले, हैदराबाद मेट्रो रेलचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक घाडगे यांनी ही गोष्ट उघडकीस आणली आहे.

यासंदर्भात महामेट्रोला पाठवलेल्या पत्राला उत्तर देतांना मेट्रोने स्थानकांची संरचना पूर्णपणे सुरक्षित आहे. काही ठिकाणी कौशल्यासंबंधित त्रुटी आढळल्या आहेत. अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे चालू असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून ती प्रमाणित करून घेत असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणी नारायण कोचक आणि शिरीष खासबारदार यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. मेट्रोस्थानकांचे बांधकाम सुमार दर्जाचे असून त्याने सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी समिती नेमावी अशी मागणीही त्यांनी केली असून यावर १७ एप्रिल या दिवशी सुनावणी होईल.

संपादकीय भूमिका

मेट्रो कामांमध्ये त्रुटी आढळणे म्हणजे नागरिकांच्या जिवाशीच खेळण्याचा प्रकार आहे. चुकीवर पांघरूण घालण्यापेक्षा त्या कुणामुळे झाल्या, याचाही शोध घेणे आवश्यक आहे.