मंदिराला वाचवण्यासाठी नव्हे, तर स्वत:ला वाचवण्यासाठीच खासदार इम्तियाज जलील मंदिरात आले !

  • छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीचे प्रकरण

  • सकल हिंदु एकीकरण समितीचा दावा !

  • दंगलप्रकरणी ४०० हून अधिक जणांवर गुन्हे नोंद !

छत्रपती संभाजीनगर – ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील हे त्या रात्री श्रीराममंदिर वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा चुकीचा असून ते स्वत:ला वाचवण्यासाठी मंदिरात गेले होते. श्रीरामनवमीच्या आदल्या दिवशी किराडपुरा भागात झालेला वाद हा २ गटांतील लोकांमुळे झाला होता. त्यामुळे याला हिंदु-मुसलमान वाद म्हणता येणार नाही, असे शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले. सकल हिंदु एकीकरण समितीच्या वतीने ४ एप्रिल या दिवशी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, भाजपचे नगरसेवक शिवाजी दांडगे, मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर आदींची उपस्थिती होती.

राजेंद्र जंजाळ म्हणाले की, २९ मार्चच्या रात्री किराडपुरा येथे झालेला वाद आपसातील २ गटांतील लोकांमुळे झाला होता. प्रथम झालेला वाद तात्काळ मिटवला गेला होता, तर त्या वेळी तिथे उपस्थित असलेले खासदार जलील यांना त्यांचाच जमाव दगड मारायला लागला. त्यामुळे ते श्रीराममंदिर परिसरातील पोलीस चौकीत पळाले होते, तसेच श्रीराममंदिर पोलिसांनी वाचवले, जलील यांनी नाही. वाद चालू असतांना आपण जलील यांना भ्रमणभाष करून ‘तुम्ही मंदिरात काय करताय ? तिथे काय झाले आहे ?’ हे मी विचारले तर, ते म्हणाले, ‘मंदिराला धक्का नाही; मात्र बाहेर वाद चालू आहे’, असे जलील यांनी उत्तर दिले होते.

दंगलप्रकरणी ४०० हून अधिक जणांवर गुन्हा नोंद !

किराडपुरा भागात झालेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी ४०० हून अधिक लोकांवर गुन्हा नोंद केला आहे, तर आतापर्यंत ८० हून अधिक लोकांची ओळख पटली आहे. ४२ आक्रमणकर्त्यांना कह्यात घेण्यात आले आहे. इतर आरोपींच्या शोधात तब्बल २२ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचे काम चालू असून त्यानुसार आरोपींना अटक करण्यात येत आहे. अनेक आरोपी भूमिगत झाले आहेत; परंतु जिल्ह्याबाहेर गेलेल्या आरोपींनाही शोधून बेड्या ठोकण्याचे काम पोलीस पथकाकडून चालू आहे. लवकरच मोठ्या प्रमाणावर आरोपी कह्यात घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.