कृष्णा नदीच्या काठावर लाखो माशांच्या मृत्यू प्रकरणी ‘दत्त इंडिया साखर कारखान्या’ला नोटीस !

सांगली – साखर कारखान्याच्या मळीच्या प्रदूषणामुळे कृष्णा नदीत १० मार्चला लाखो माशांच्या मृत्यू झाला आहे. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगलीतील ‘दत्त इंडिया साखर कारखान्या’ला नोटीस पाठवली आहे. दत्त इंडिया साखर कारखान्या’चे मळीमिश्रीत पाणी शेरीनाल्यातून कृष्णा नदीत मिसळत असून त्यामुळे ‘दत्त इंडिया कारखाना का बंद करू नये ? वीज का बंद करण्यात येऊ नये ?’, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. याच समवेत सांगली महापालिकेवर फौजदारी गुन्हा का नोंद करू नये ? अशा आशयाची नोटीसही काढण्यात आली आहे. (कारखान्याचे पाणी नदीत मिसळले जात असतांना एवढे दिवस प्रदूषण मंडळ झोपले होते का ? – संपादक)

या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर मृत मासे फेकून महापालिका आणि प्रदूषण मंडळ यांचा निषेध केला होता. रसायनमिश्रीत मळीचे दूषित पाणी सोडल्याने कृष्णा नदीच्या पाण्याला दुर्गंधी सुटली असून शिरोली तालुक्यातील, तसेच अंकली परिसरातील गावांना प्रदूषित पाणी प्यावे लागल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.