फाल्गुन पौर्णिमेच्या कथा आणि इतिहास

आज ६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी ‘होळी पौर्णिमा’ आहे. त्या निमित्ताने…

१. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिचे दहन झाले तो दिवस ‘फाल्गुन पौर्णिमा’ !

‘प्राचीन काळी ‘हिरण्यकश्यपू’ नावाचा एक राक्षस राजा होता. हा राक्षस देवांचा मोठा वैरी होता. भगवान विष्णूचे नाव घेणे, त्याला सहन होत नसे; पण त्याचे नशीब उलटे. त्याच्याच कुळात एक देवभक्त बालक जन्मले. त्याचे नाव ‘प्रल्हाद’ ! प्रल्हाद हा अत्यंत भाविक राजपुत्र होता. तो भगवंताचा जप करी. देवाची भक्ती करण्यात त्याचा आनंद साठलेला होता. प्रल्हादाने देवाची आराधना केली की, हिरण्यकश्यपूला संताप येई. पुढे पुढे या संतापाने सीमाच ओलांडली. हिरण्यकश्यपूला प्रल्हादाचा विलक्षण द्वेष वाटू लागला आणि तो त्यालाच मारण्याचा प्रयत्न करू लागला; पण ‘देव तारी त्याला कोण मारी ?’ हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला उंच पर्वतांच्या कड्यावरून खाली लोटले; पण देवाने झेलले. राक्षसाने प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले; पण तेथेही तो वाचला.

शेवटी हिरण्यकश्यपूने आपल्या ‘होलिका’ या बहिणीला बोलावले. होलिकेला अशी शक्ती मिळाली होती की, तिला अग्नी जाळू शकत नव्हता. हिरण्यकश्यपूने एक कट रचला. तो बहिणीला म्हणाला, ‘‘प्रल्हाद देवाचा भक्त आहे. तो देवाची उपासना करतो. त्याचा नाश केला पाहिजे. तू त्याला घेऊन अग्नीवर जाऊन बस.’’ होलिका दुष्ट स्त्री होती. तिने संमती दिली. चिता रचली गेली. होलिकेने प्रल्हादाला घेतले आणि ती चितेवर जाऊन बसली. प्रल्हाद आत्याच्या मांडीवर बसला होता. शिपायांनी अग्नी पेटवला. पटापट अग्नी भडकला. होलिकेला वाटले, ‘आपण सुरक्षित राहू.’ प्रल्हाद देवाचे नाव घेत होता; पण आश्चर्य घडले. होलिकेला अग्नीचे चटके बसून तिला भाजू लागले. ती जळू लागली. प्रल्हाद आनंदात नारायणाचे नाव घेत सुखरूप राहिला. सारी प्रजा तेथे जमली. सर्वजण पहात होते. होलिका अग्नीत जळून भस्म झाली. प्रल्हाद मात्र अधिक तेजस्वी होऊन बाहेर पडला. लोकांना आनंद झाला. राज्यात आनंदोत्सव चालू झाला. हा दिवस ‘फाल्गुन पौर्णिमे’चा होता.

२. कामदेव दहनाची अद्भुत कथा

प्राचीन काळची कथा आहे. ‘तारकासुर’ नावाचा एक बलाढ्य राक्षस राजा होता. त्याला ब्रह्मदेवाचे वरदान मिळाल्यामुळे तो मदोन्मत्त झाला होता. देव, दानव आणि ऋषी यांचा तो छळ करू लागला. सर्व देव अखेर ब्रह्मदेवाकडे गेले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, ‘‘तारकासुराचा नाश भगवान शंकरांच्या ७ दिवसाच्या पुत्राकडून होईल.’’ या वेळी देवी पार्वती हिमवानाची कन्या होती. पार्वतीचा शंकराशी विवाह होणे आवश्यक होते; पण ते होणार कसे ? कारण शंकर हिमालयाच्या उंच शिखरावर कठोर तपस्या करत होते. त्यांना तपोसाधनेपासून दूर करणे कठीण होते. देवी पार्वती प्रतिदिन हिमालयावर जाऊन भगवान शंकराची पूजा करत असे; पण तपश्चर्येत मग्न असलेले महादेव डोळेसुद्धा उघडत नव्हते. देवांच्या समोर मोठा कठीण प्रसंग निर्माण झाला.

अखेर देवेंद्राने एक युक्ती काढली. इंद्राने कामदेवाला बोलावले आणि इंद्र त्याला म्हणाला, ‘‘कामदेवा, तारकासुराच्या दुष्ट कृत्यामुळे सर्व देव आणि मानव हैराण झाले आहेत. या संकटाचे निवारण करण्यासाठी तुला बोलावले आहे. हे देवकार्य आहे. ‘या देवकार्यासाठी प्रसंगी आहुती पडली, तरी चालेल’, अशा प्रतिज्ञेप्रमाणे कार्य झाले पाहिजे.’’ कामदेव म्हणाला, ‘‘देवेंद्र देवकार्य करण्यास मी सिद्ध आहे.’’ इंद्राला आनंद झाला आणि तो म्हणाला, ‘‘कामराज, या वेळी भगवान शंकर हिमालयावर कठोर तप करत आहेत. देवी पार्वती आपल्या मैत्रीणींसह तेथे जाऊन त्यांची पूजा आणि सेवा करत आहे. देवी पार्वतीविषयी शंकराच्या मनात प्रेम निर्माण करण्याचे अवघड काम तुला करावे लागणार आहे. कामदेवाने व्यथित अंतःकरणाने होकार दिला; कारण त्याला ठाऊक होते की, भगवान शंकरांना तपस्येतून उठवणे, म्हणजे अग्नीच पेटवणे होय; पण ‘देवकार्यासाठी आत्माहुती देणे, हे आपले कर्तव्य आहे’, हे त्याने जाणले. कामदेव आपल्या कार्यासाठी निघाला. समवेत आपली पत्नी ‘रतीदेवी’ आणि मित्र ‘वसंतऋतू’ यांना घेतले. मदनबाण सज्ज करून तो हिमालयात गेला. भगवान शंकर ज्या तपोवनात तप करत होते, तेथे तिघेजण आले. कामदेवाने आपली माया सर्वत्र पसरवली. वसंतऋतूने सृष्टीचे रूप मोहक केले. वनस्पती फळे आणि फुले यांनी बहरून गेल्या. गिरीकंदरातून निर्झर वाहू लागले. सर्वत्र मादक फळाफुलांचा सुगंध पसरला. पक्षांचे मधुर कूंजन चालू झाले.

कामदेव रतीसह शंकरांच्या डाव्या बाजूला थोडे दूरवर उभा राहिला. मदनबाण सज्ज केला. ‘शंकराची ध्यानावस्था किंचित् विचलित झाली की, त्यांच्या हृदयावर मदनबाण टाकायचा’, असा निर्धार कामदेवाचा होता. बराच वेळ गेला. शंकरांचे मन विचलित होण्याचे चिन्ह दिसेना ! कामदेव अस्वस्थ झाला. तेवढ्यात समोरून देवी पार्वती भिल्लिणीच्या वेषात फुलांचे हार आणि गजरा यांनी सजून नृत्य करत येतांना दिसली. कामदेवाने तिच्यावर माया टाकली. पार्वतीचे रूप अधिकच लोभस दिसू लागले. ती शंकरांच्या जवळ आली. तिने पूजा केली आणि नंतर सुरेल संगीतावर तिचे भावपूर्ण नृत्य चालू झाले. शंकरांच्या कानावर मधुर गीतांचे स्वर आणि पैंजण यांचे झंकार पडले. त्यांची ध्यानावस्था भंग पावली. शंकरांनी डोळे उघडले. समोरच लावण्यवती पार्वती सुंदर नृत्य करत होती आणि कामदेवाने पुष्पबाण फेकला. शंकर आसनावरून उठले आणि पार्वतीच्या जवळ जाण्यासाठी त्यांनी भूमीवर पावले ठेवली. तेवढ्यात तपस्येचे गेलेले भान परत आले. भगवान शंकरांना समजेना की, आपला तपोभंग कसा झाला ? ते संतप्त झाले. पार्वती नृत्य थांबवून घाबरून बघत राहिली. शंकरांचे क्रुद्ध डोळे चौफेर शोध घेऊ लागले. तेवढ्यात डाव्या बाजूला थोडे दूरवर मदनबाण सज्ज ठेवलेला कामदेव दिसला. शंकरांच्या मनात क्रोधाचा अंगार भडकला. तिसरा नेत्र उघडला गेला. तेथून धगधगती अग्नीज्वाळा निघाली आणि कामदेवावर आदळली. कामदेव ज्वाळांनी लपेटला गेला आणि तेथेच जळून भस्मीभूत झाला. रती बिचारी शोक करत खालीच कोसळली. पार्वती खाली बसली आणि भगवान शंकर अंतर्धान पावले. कामदेव दहनाची ही अद्भुत घटना फाल्गुन पौर्णिमेला घडली.’

(साभार : साप्ताहिक ‘जय हनुमान ’, २२.२.२०२०)

होलिकेची पूजा करतांना म्हणायचा मंत्र

अस्माभिर्भयसन्त्रस्तैः कृता त्वं होलिके यतः ।
अतस्त्वां पूजयिष्यामो भूते भूतिप्रदा भव ।।

– स्मृतिकौस्तुभ

अर्थ : हे होलिके (वाळलेली लाकडे आणि गोवर्‍या रचून पेटवलेला अग्नी), आम्ही भयग्रस्त झालो होतो; म्हणून आम्ही तुझी रचना केली. यामुळे आता आम्ही तुझी पूजा करतो. हे होळीच्या विभूती ! तू आम्हाला वैभव देणारी हो.

होलिकेच्या विभूतीला वंदन करतांना म्हणायचा मंत्र

वन्दितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शङ्करेण च ।
अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ।।

– ‘स्मृतिकौस्तुभ’

अर्थ : हे विभूती देवी ! तुला ब्रह्मा, विष्णु आणि महेश हेही वंदन करतात. त्यामुळे, तू आमचे रक्षण कर. आम्हाला वैभव देणारी हो.