नागालँड आणि त्रिपुरा राज्यांत पुन्हा भाजप अन् मित्रपक्ष सत्तेत येणार !

  • मतदानोत्तर चाचण्यांचा निष्कर्ष

  • मेघालयात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत !

भाजप समर्थकांचा जल्लोष
(प्रतिकात्मक चित्र)

नवी देहली – ईशान्येकडील राज्यांत विधानसभेसाठी नुकतेच मतदान झाले. याचे मतदानोत्तर चाचण्यांचे (‘एक्झिट पोल’चे) निकाल समोर आले असून भाजप आणि त्याचे मित्रपक्ष नागालँड अन् त्रिपुरा या राज्यांमध्ये पुन्हा सत्तेत येण्याची चिन्ह आहेत. मेघालयामध्ये मात्र त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘इंडिया टुडे’, ‘टाइम्स नाऊ’ आणि ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिन्यांनी मतदानोत्तर चाचणी केली होती. या तिन्ही चाचण्यांमध्ये ‘नागालँड आणि त्रिपुरा राज्यांत भाजप अन् त्याचे मित्रपक्ष यांना घवघवीत यश मिळेल’, असे नमूद करण्यात आले आहे.

१. ‘नागालँडमध्ये भाजप आणि त्याचा सहयोगी ‘नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष’ सहजपणे बहुमत प्राप्त करील, अशी चिन्हे आहेत, तर विरोधी पक्ष ‘नागा पीपल्स फ्रंट’ फार चांगली कामगिरी करू शकणार नाही’, असे चाचण्यांद्वारे दिसून आले आहे. त्रिपुरामध्येही भाजप आणि त्याचा सहयोगी पक्ष ‘पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा’ यांना बहुमत मिळण्याची शक्यता आहे.

२. मेघालयात सत्ताधारी ‘नॅशनल पीपल्स पार्टी’ हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर येईल; मात्र त्याला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, असेही मतदानोत्तर चाचण्यांमध्ये दिसून आले आहे.