आदर्श शिक्षापद्धत हवी !

छत्रपती शिवाजी महाराज गुन्हेगाराला शिक्षा देताना

अनेक राष्ट्रांमध्ये एक विशिष्ट प्रकारची दंडात्मक शिक्षापद्धत कार्यान्वित केल्याचे आपण बघतो. भारतामध्ये मात्र अशा प्रकारची शिक्षापद्धत अद्यापही ठरवलेली आढळून येत नाही. पूर्वीच्या काळी गुन्ह्यानुसार दंड देण्याची पद्धत होती. त्यामुळे जनसामान्य लोक पाप करण्याचे धाडस करत नव्हते. उदा. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावरून कडेलोट करणे, ज्या हाताने गुन्हा केला ते हात तोडून गुन्हेगाराचा चौरंगा करणे, अशा शिक्षा दिल्या होत्या. सध्या कोणत्याही गोष्टीमध्ये मानवतावादाचा पुळका असलेल्यांची गर्दी झाली आहे. त्यामुळे गुन्हेगाराकडे मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. हे दंडसंहितेचे सर्वांत मोठे अपयश आहे. क्रूर कृत्य करणार्‍यांच्या संदर्भात मानवतावादी भूमिका घेणे, म्हणजे गुन्हेगारी वृत्तीला पाठबळ देणेच होय. याला कुणी ‘गांधीगिरी’ म्हटले तर अयोग्य होणार नाही.

गुन्हेगारीला आळा बसावा आणि त्यांच्यामध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा, यांसाठी कठोर शिक्षेचे प्रावधान असलेले कायदे आवश्यक आहेत, तसेच त्यानुसार शिक्षेची कार्यवाही होणेही तेवढेच आवश्यक आहे. भारतामध्ये बलात्कार, हत्या आणि भ्रष्टाचार यांसारखे गुन्हे सातत्याने होत आहेत; त्यातील किती गुन्हेगारांना शिक्षा होते ? हा प्रश्नच आहे. भारतात आजवर अनेक आतंकवादी आक्रमणे झाली; पण फाशीची शिक्षा अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच आतंकवाद्यांना झाली. नुकतेच श्रद्धा वालकरचे क्रूर हत्या प्रकरण घडले; पण त्यातील गुन्हेगारालाही अद्याप शिक्षा झालेली नाही. आता तर त्याच्या गुन्ह्यावर चित्रपट काढून त्याचे उदात्तीकरण केले जाणार आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. ‘सोनी’ वाहिनीवर दाखवण्यात येणारी मालिका हे त्याचे उदाहरण आहे. ‘क्राईम डायरी’ या मालिकेमधून दिग्दर्शक समाजाला काय देऊ इच्छितो ? हेच कळेनासे झाले आहे.

गुन्हेगारांना योग्य शिक्षा मिळत नसल्याने लोकांचा न्यायव्यवस्थेवरून विश्वास अल्प होत चाललेला आहे. गुन्हेगार मोकाट, तर सामान्य जनता जीव मुठीत धरून जगत आहे. हेच दृश्य सर्वत्र बघायला मिळत आहे. हे दृश्य पालटण्यासाठी छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक !

– सौ. रमा देशमुख, नागपूर