पंचमहाभूत लोकोत्सवाचा पाचवा दिवस
कोल्हापूर, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – भारत हा ऋषि-मुनी यांची परंपरा असलेला, तसेच पंचमहाभूतांची पूजा करणारा देश आहे. आपण भौतिक विकास करतांना विदेशी संस्कृतीचे अंधानुकरण केल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. आज अचानक ढगफुटी होते, तसेच अन्य अनेक समस्या निर्माण होत आहेत. आश्रमाच्या माध्यमातून विविध कार्य करत प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी समाज आणि देश यांचे दायित्व स्वीकारले आहे. त्यामुळे प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजींनी आयोजित केलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाचे एका जनआंदोलनात रूपांतर करून सकारात्मक पालट घडवूया, असे आवाहन गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. ते पंचमहाभूत लोकोत्सवात ५ व्या दिवशी जलतत्त्व-महिला उत्सवातील पहिल्या सत्रात बोलत होते.
या प्रसंगी कर्नाटक सरकारच्या वक्फ, हज आणि धर्मादाय मंत्री सौ. शशिकला जोल्ले, स्वामी संपूर्णानंद महाराज, राजस्थान येथील कृष्ण जाखड, ‘आय.आय.टी.’ येथील प्रदीप मिश्रा, लोकभारतीचे गोपाल उपाध्याय, डॉ. हर्षा हेगडे, जलतज्ञ राजेंद्रसिंह, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
वेळीच पाण्याचा दुरुपयोग टाळा अन्यथा पृथ्वी कदापि क्षमा करणार नाही ! – डॉ. हर्षा हेगडे
प्रत्येक जीवसृष्टीचा मुख्य घटक ‘पाणी’ आहे. पाणी हे इतके महत्त्वपूर्ण आहे की, भारतात पाण्याचेही पूजन केले जाते. गंगामातेचे पूजन केले जाते. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग होऊ देऊ नका अन्यथा पृथ्वी आपल्याला कदापि क्षमा करणार नाही.
रसायने निर्माण करणार्या आस्थापनांनी आतापर्यंत पर्यावरणाचा सर्वाधिक र्हास केला ! – प्रदीप मिश्रा
सध्या संपूर्ण विश्व पर्यावरणाच्या समस्येने ग्रस्त आहे. अशा परीस्थितीत पंचमहाभूत लोकोत्सवाचे आयोजन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. रसायने निर्माण करणार्या आस्थापनांनी आतापर्यंत पर्यावरणाचा सर्वाधिक र्हास केला आहे. ‘स्त्री’मध्ये समाजाला सर्वश्रेष्ठ स्थानी नेण्याची शक्ती आहे. त्यामुळे स्त्रियांकडून मुलांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार होणे आवश्यक आहे. मानवाच्या अयोग्य जीवनप्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे, ते टाळल्यास जलस्रोतांना पुन्हा पुनर्जीवन प्राप्त होईल.
….तर वर्ष २०५० पर्यंत जलसंकट महाभयंकर रूप धारण करेल ! – गोपाल उपाध्याय, लोकभारती
नदीच्या किनारी रहाणार्या शेतकर्यांनी शेतीच्या पद्धतीत पालट करून नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न करावा. लोकभारतीच्या माध्यमातून विविध स्तरांवर जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जलप्रदूषणाच्या संदर्भात समाज वेळीच जागृत न झाल्यास वर्ष २०५० पर्यंत जलसंकट महाभयंकर रूप धारण करेल.
समाजाने पर्यावरण जपायला शिकावे ! – सौ. शशिकला जोल्ले, मंत्री, वक्फ, हज आणि धर्मादाय मंत्री, कर्नाटक
भारत देश संस्कृती, संस्कार आणि अध्यात्म यांनी भरलेला आहे. त्यामुळे आपण भारतभूमीत जन्माला आलो, हे आपले परमभाग्य आहे. लोक देशाची संस्कृती विसरत असल्याने महापूर, भूकंप, कोरोना यांसारखी संकटे येत आहेत. पंचमहाभूतांचे महत्त्व आणि त्यांचे जतन होण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केल्याविषयी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. सध्याच्या काळात समाजाने पर्यावरण जपायला शिकले पाहिजे. पाण्याच्या रक्षणासाठी वेळीच उपाययोजना काढल्या नाहीत, तर पाण्यावरून महायुद्ध होईल. वृक्षांच्या संवर्धनासाठी आम्ही निपाणी मतदारसंघात महिलांना प्रत्येकी १४ फळझाडांची रोपे दिली आणि त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यास सांगितले, तसेच त्यांना घरगुती भाजीपाला लावण्यासाठी प्रशिक्षणही दिले.
___________________________________________
१ किलो मांस सिद्ध करण्यासाठी १ सहस्र लीटर पाणी व्यय होते ! – प्रदीप मिश्रा१ किलो मांस सिद्ध करण्यासाठी १ सहस्र लीटर पाणी व्यय होते. त्यामुळे एका व्यक्तीने मांसाहार सोडल्यास १०० लोकांची तहान भागू शकते, असे प्रदीप मिश्रा म्हणाले. |