वटवृक्षाचे आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने महत्त्व

वटवृक्षाचे आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने महत्त्व

१. ‘शरिरामध्‍ये कफ दोष वाढू न देता शरिराला स्‍थिरत्‍व देणे, त्‍वचेचे आरोग्‍य सुधारणे, रक्‍तशुद्धी करणे, हाडांना बळ देणे इत्‍यादी प्रकारे वटवृक्ष लाभदायी ठरतो.
२. काही प्रकारच्‍या त्‍वचा विकारांसाठी वडाच्‍या फळांचा उपयोग होतो.
३. वडाच्‍या पारंब्‍यांपासून ‘वटजटादी तेल’ बनवले जाते, जे केसांची वाढ होण्‍यास साहाय्‍यक ठरते.
४. अनेक औषधांची निर्मिती आणि पारद कल्‍पांची शुद्धी यांमध्‍ये वडाच्‍या अंकुरांचा उपयोग होतो.

वैद्य समीर मुकुंद परांजपे

५. वडाची पाने तोडल्‍यावर किंवा त्‍याच्‍या खोडाच्‍या सालीतून एक चिक निघतो. त्‍याचा उपयोग पुरुष किंवा स्‍त्री यांच्‍या जननेंद्रियांच्‍या विकारांसाठी उपयुक्‍त ठरतो.
६. स्‍त्रियांच्‍या अंगावरून पांढरे जाणे, मांड्या गळून जाणे, थकवा येणे आणि लक्ष न लागणे इत्‍यादी विकारांसाठी वडाच्‍या सालीच्‍या काढ्याचा उपयोग विविध पद्धतीने केला जातो.
७. जेव्‍हा स्‍त्री गर्भवती होते, तेव्‍हा गर्भाची चांगली वाढ होऊन तो स्‍थिर व्‍हावा, यासाठी वडाच्‍या कोवळ्‍या अंकुरांचा रस तिच्‍या नाकपुड्यांमध्‍ये घातला जातो.
८. वसंत ऋतूचा आरंभ झाल्‍यावर वटवृक्ष किंवा वडाच्‍या झाडाच्‍या पानांची गळती होऊन त्‍यास नवीन पालवी फुटते. हे ऋतू पालटाचे महत्त्वाचे लक्षण आहे.
९. वटवृक्षाची गणती ही महावृक्ष म्‍हणजे मोठ्या वृक्षांमध्‍ये होत असल्‍याने ते अनेकांना त्‍याची शीतल सावली देते. याची फुले आणि फळे अनेक पक्षांचे खाद्य आहे.
१०. वटवृक्ष हा केवळ महावृक्ष नव्‍हे, तर महौषध आहे. त्‍याची मुळे, खोडाची साल, चिक, अंकुर, पाने, फुले, फळे, पारंब्‍या इत्‍यादी कल्‍पतरूप्रमाणे नानाविध प्रकारे औषधांमध्‍ये उपयुक्‍त ठरते; पण निश्‍चितच योग्‍य पद्धतीने आणि वैद्यांच्‍या समादेशाने (सल्‍ल्‍याने) याचा उपयोग करावा.’

– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (२७.१२.२०२२)

(संपर्कासाठी ई-मेल : [email protected])