‘अनेकदा ‘पुष्कळ पाणी प्या’, असा किंवा पाणी पिण्याच्या वेळांविषयीचे समादेश (सल्ले) सर्वत्र दिले जातात आणि काही अवस्थांमध्ये ते आवश्यकही असते; मात्र सरसकट सर्वांच्या आरोग्यास हे हितकारक न ठरता, त्याचे दुष्परिणामच अधिक होतांना दिसून येतात. पुष्कळदा असे हे अपप्रचार सरसकट आयुर्वेदाच्या नावाखाली केले जातात; परंतु खरे तर ते योग्य नसते. अशा सर्व मतमतांतरांमध्ये नेमकेपणाने ‘आयुर्वेदानुसार किती प्रमाणात पाणी प्यावे ?’, हा प्रश्न साहजिकच येतो.
आयुर्वेदानुसार ‘स्वतःच्या प्रकृतीला मानवेल, असे तहान लागेल तेव्हा आणि तहान भागेल तेवढेच आवश्यक पाणी ऋतूनुसार प्यावे.’ यामध्येे ‘किती पाणी प्यायल्यानंतर किती वेळा लघवीला जावे लागते ? लघवीचे प्रमाण किती असते ? लघवी करतांना जळजळ होते का ?’, या शारीरिक बारकाव्यांचा अभ्यास करून पाणी प्यावे.
१. तारतम्य समजून घेऊन पाणी प्यायला हवे !
पाणी पिण्याचे प्रमाण ऋतूनुसार असावे, म्हणजे नेमके कसे ? हाही प्रश्न येतो. उन्हाळ्यात शरिराला आवश्यक पाण्याचे प्रमाण हे पावसाळा किंवा हिवाळा यांपेक्षा निश्चितच अधिक असणार आहे. पाणी पिण्याचे प्रमाण हे कामाच्या स्वरूपावर, तसेच तेथील वातावरणावरही अवलंबून असते. जो शेतकरी दिवसभर उन्हामध्ये शारीरिक कष्टाची कामे करतो, त्याच्या शरिराची पाण्याची आवश्यकता निश्चितच अधिक असणार आहे. त्याच्या उलट जो अभियंता दिवसभर वातानुकूल यंत्र (ए.सी.) असलेल्या कार्यालयात बसून काम करतो, त्याची पाण्याची आवश्यकता अत्यल्प असेल. त्यामुळे सरसकट सर्वांना एक नियम लागू करण्यापेक्षा हे सर्व तारतम्य समजून घेऊन पाणी प्यायला हवे.
२. सकाळी उठल्यावर का, कसे आणि किती पाणी प्यावे ?
सकाळी उठल्यावर अर्धा कप पाण्यामध्ये आल्याचा लहान तुकडा घालून ते उकळून कडकडीत पाणी प्यावे. याने घसा शुद्ध आणि मोकळा होतो. भूक लागून पचनक्रियेस साहाय्य होते. याच्या व्यतीरिक्त उगाच अमूक पेले अथवा लिटर असे ठरवून पाणी पिऊ नये; कारण रिकाम्या पोटी प्यायलेले अनावश्यक पाणी भूक मंदावून अनेक पित्त विकारांचे जनक बनते.
३. आहार (न्याहारी अथवा जेेवण करतांना) घेतांना किती आणि कोणते पाणी प्यावे ?
अ. आहार घेतांना साधारण एक पेला पाणी घेऊन बसावे.
आ. आहारच्या मध्ये मध्ये थोडे-थोडे पाणी प्यावे.
इ. थंडीच्या दिवसांत पाणी जरा कोमट करून प्यायल्यास अधिक हितकर ठरते.’
४. दिवसभरात साधारण किती पाणी प्यावे ?
आहार घेतांना आणि त्या व्यतिरिक्त दिवसभरात थोडे-थोडे पाणी प्यायलास त्याचे एकूण प्रमाण साधारण दीड लिटर होते, जे सर्वसामान्य व्यक्तीसाठी पुरेसे ठरते. याचे कारण म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीच्या आहारामध्ये द्रव स्वरूपातील पदार्थ म्हणजे रसभाजी, आमटी, वरण, ताक, अधून-मधून सरबत, दूध आणि चहा इत्यादी असतात. कोणताही द्रव पदार्थ म्हटला की, त्यामध्ये पाण्याचा अंश हा आलाच ! त्यामुळे त्याला विसरून चालणार नाही; म्हणूनच आपल्या पाण्याच्या प्रमाणाच्या गणितामध्ये द्रव पदार्थांच्या प्रमाणाचीही गणती व्हायला हवी.
त्यामुळे दिवसभरातील पाण्याचे प्रमाण ठरवतांना आपण घेत असणार्या या द्रव स्वरूपातील पदार्थांच्या प्रमाणाचाही अवश्य विचार करावा आणि तो सोडून वर उल्लेख केल्याप्रमाणे केवळ पाण्याचे प्रमाण हे साधारण दीड लिटर असावे. ऋतू आणि व्यक्तीची प्रकृती यांनुसार या प्रमाणामध्ये पालट होऊ शकतो. दिवसभर उन्हात शारिरीक कष्टाचे काम करणारे किंवा खेळाडू यांच्यासाठी हे प्रमाण नव्हे.
५. पाणी वा कोणताही द्रव पदार्थ अधिक प्यायल्यास त्याचा परिणाम काय होतो ?
काही लोक सकाळी उठल्यावर उपाशी पोटी किंवा रात्री झोपतांना पुष्कळ प्रमाणात पाणी, दूध किंवा तत्सम द्रव पदार्थ पितात. जे लोक प्रतिदिन कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नाहीत, त्यांच्या शरिराला एवढ्या अधिक प्रमाणात द्रवांशाची किंबहुना पाण्याची आवश्यकता नसते.
अतिरिक्त होणारा हा द्रव पदार्थ शरिरास पुढीलप्रमाणे अनेक प्रकारे त्रासदायक ठरतो. घसा सूजणे, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, शरिराला सूज येणे, शरीर जड होणे, दिवसा आणि रात्रीही अधिक वेळा लघवीसाठी जावे लागणेे, यामुळे रात्री झोप पूर्ण न होणे, परिणामी दुसरा दिवस उत्साहपूर्ण न जाणे इत्यादी. अशा प्रकारे अतिरिक्त पाणी प्यायल्याने अनेक कफ, श्वसन आणि त्वचा यांच्याशी संबंधित विकार संभावतात; म्हणून अतिरिक्त पाणी पिणे टाळा आणि त्यामुळे शरिरावर येणार्या अनाठायी ताणापासून मुक्त रहा ! प्रत्येकाने स्वतःच्या मर्यादित तहानेनुसार आवश्यक तेवढेच योग्य मात्रेमध्ये पाणी प्यावे.’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (१९.१२.२०२२)
(संपर्कासाठी ई-मेल आयडी : [email protected])
सर्दी, खोकला किंवा कफाचे अन्य विकार होऊ नयेत यासाठी काय करावे ?
‘अनेक लोकांना सर्दी, खोकला असे कफाचे विकार झाल्यास ते लवकर बरे न होता दीर्घकाळापर्यंत टिकून रहातात. विशेषतः हिवाळ्यामध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येते. यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या करण्यासह, तसेच अनेक उपचारही घेतले जातात; परंतु त्याचा एवढा लाभ होत नाही. या सर्वांमध्ये लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर रोग प्रतिकारकक्षमता न्यून असेल आणि पाणी पिण्याचे प्रमाण अधिक असेल, तर अशा व्यक्तीला सर्दी, खोकला इत्यादी केवळ कफाचे विकारच काय, तर इतर रोगसुद्धा हिवाळ्यातच नव्हे, तर कधीही होऊ शकतात.
वरील त्रास वारंवार होण्यामागे सध्याच्या जीवनशैलीमधील दिनचर्येतील एक महत्त्वपूर्ण कृती कारण ठरू शकते आणि बहुधा त्यात अनेकांकडून गांभीर्याने पालट केले जात नाही. ही कृती म्हणजे रात्री उशिरा जेवणे ! सायंकाळचे जेवण शक्य तेवढे लवकर घ्यावे. पाणी पिणे, ही कृतीसुद्धा सायंकाळी सूर्यास्तापूर्वीच करावी. सूर्यास्तानंतर पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ (दूध, ताक, दही), तसेच घनाहार (जड पदार्थ थोडक्यात जेवण) घेऊ नये. अशा प्रकारेे रात्र होईपर्यंत न थांबता जो आहार घ्यायचा आहे तो जर सायंकाळीच घेतला, तर अनेक त्रासांपासून सुटका होऊ शकते. हा जीवनावश्यक पालट स्वतः करा आणि स्वास्थ्य अनुभवा !’