कारवार (कर्नाटक) येथील पंचशिल्पकार पू. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) संतपदी विराजमान होण्याच्या सोहळ्याचे सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि त्यांना मिळालेले ईश्वरी ज्ञान

कारवार (कर्नाटक) येथील पंचशिल्पकार पू. नंदा आचारी (गुरुजी) यांनी ११.१२.२०२२ या दिवशी देहत्याग केला. ते ३.११.२०२२ या दिवशी संतपदी विराजमान झाले होते. सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी ते संतपदी विराजमान होण्याच्या सोहळ्याचे केलेले सूक्ष्म परीक्षण आणि त्यांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांच्या संदर्भात श्री. निषाद यांना मिळालेले ईश्वरी ज्ञान यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

पू.  नंदा आचारी

१. पू. नंदा आचारी (गुरुजी) यांनी संतपद प्राप्त करण्याच्या सोहळ्याचे केलेले सूक्ष्म परीक्षण आणि त्यातून लक्षात आलेली त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

श्री. निषाद देशमुख

१ अ. सन्मान सोहळा चालू होताच वायूमंडलात मंगलता आणि विष्णुतत्त्व यांची स्पंदने जाणवणे : ‘पू. आचारी यांचे संतपद घोषित करण्याचा सोहळा चालू होताच मला वातावरणात मंगलतेची (भाव + आनंद यांची) स्पंदने ७० टक्के आणि विष्णुतत्त्वाची स्पंदने ५० टक्के एवढ्या प्रमाणात जाणवू लागली.

१ अ १. पू. आचारी यांची तपसाधना पूर्ण झाल्याने कार्यक्रमातून भाव आणि आनंद यांची, म्हणजे मंगलतेची स्पंदने प्रक्षेपित होणे : सर्वसाधारणतः उपासक स्वतःच्या आनंदासाठी साधना करत असतो. ज्या वेळी ‘केवळ मला आनंद मिळावा’, अशा सकाम उद्देशाने उपासकाची साधना चालू असते, त्या वेळी ती शक्ती आणि भाव यांच्या स्तरावर असते. अनेक तप (एक तप, म्हणजे बारा वर्षे) उलटल्यानंतर भक्ताची साधना ‘स्व’ आनंदासाठी न होता निष्कामतेकडे वळते. त्या वेळी ‘साधनेतून काही मिळावे’, अशी अपेक्षा न रहाता ‘साधना करणे’, ही त्या साधकाची वृत्ती बनते. यातून त्याची साधना ही ‘तपसाधना’ होते. यालाच ‘तपस्येला पूर्तता येणे’, असे म्हणतात.

पू. नंदा आचारी (गुरुजी) वयाच्या १४ व्या वर्षापासून मूर्तीकलेच्या माध्यमातून साधना करत असून आता त्यांची साधना निष्काम भावात स्थिर झाली आहे. तपसाधना पूर्ण झाल्यावर उपासकातून कृतज्ञताभाव आणि आनंद यांचे प्रक्षेपण होणे चालू होते. यामुळे पू. आचारी यांच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमातून भाव आणि आनंद यांची, म्हणजेच मंगलतेची स्पंदने प्रक्षेपित होत होती.

१ अ २. मूर्तीकला भगवान श्रीविष्णूशी संबंधित असल्याने कार्यक्रमात विष्णुतत्त्व कार्यरत होणे : धर्मशास्त्रात सांगितले आहे, ‘नृत्य आणि संगीत यांची उत्पत्ती भगवान शिवापासून, तर मूर्तीकला आणि नृत्यकला यांची उत्पत्ती भगवान श्रीविष्णूपासून झाली आहे.’ मूर्तीकलेच्या माध्यमातून पू. आचारी यांनी भगवान श्रीविष्णूचीच उपासना केली आहे. यामुळे वायूमंडलात विष्णुतत्त्व जाणवत होते.

१ आ. पू. आचारी यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर त्यांच्याभोवती पिवळ्या रंगाची मोठी प्रभावळ दिसणे : पू. आचारी यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर मला त्यांच्याभोवती पिवळ्या रंगाची पुष्कळ मोठी प्रभावळ दिसली. अन्य संतांच्या भोवती असलेल्या प्रभावळीच्या तुलनेत ही प्रभावळ तिपटीहून अधिक होती.

१ आ १. पू. आचारी यांची मूर्तीकलेच्या माध्यमातून तपसाधना (तपस्या) घडत असल्याने त्यांच्याभोवती अन्य संतांच्या तुलनेत मोठी प्रभावळ दिसणे : परिपूर्ण, भावपूर्ण आणि फलनिष्पत्तीयुक्त साधना, म्हणजे तप होय. तपस्येच्या स्थूल कृतीच्या माध्यमातून जिवाचा देह, मन आणि बुद्धी यांचा त्याग होत असतो, तर सूक्ष्मातून मनोलय अन् बुद्धीलय होत असतो. यामुळे तपसाधनेला अत्यंत महत्त्व आहे. पू. आचारी यांची मूर्ती घडवण्याची साधना अशाच प्रकारची असल्याने, म्हणजेच मूर्तीकलेच्या माध्यमातून ते तपसाधनाच करत असल्यामुळे त्यांच्याभोवती इतर संतांच्या तुलनेत तिपटीपेक्षा मोठी प्रभावळ निर्माण झाली आहे.

१ इ. पू. आचारी यांची मुलाखत चालू असतांना ते शून्यावस्थेत असल्याचे जाणवणे आणि त्यांच्या चेहर्‍याकडे बघितल्यावर ध्यान लागणे : सनातनच्या साधिका सौ. विद्या विनायक शानभाग कन्नड भाषेत पू. आचारी यांची मुलाखत घेत होत्या. त्या वेळी मला व्यासपिठावर बसलेल्या पू. आचारी यांच्या चेहर्‍यावर काही हावभाव जाणवत नव्हते. ‘जणू ते शून्यावस्थेत आहेत’, असे मला वाटत होते. सौ. शानभाग विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी काही क्षणांसाठी ते शून्यावस्था सोडून सगुणात आले. त्या वेळी त्यांच्या चेहर्‍याकडे बघितल्यावर माझे ध्यान लागत होते.

१ इ १. मनाच्या अंतर्मुख-बहिर्मुख वृत्तीमुळे पू. आचारी सतत शून्यावस्थेत असणे : ज्या वेळी निष्काम भाव आणि भक्ती हीच साधकाची शाश्वत अवस्था बनते, त्या वेळी तो भूतकाळ किंवा भविष्यकाळ यांच्या विचारांत रममाण न होता सतत वर्तमानकाळ साधणारा असतो. या स्थितीत त्याच्या मनाची अवस्था अंतर्मुख-बहिर्मुख (अंतर्मुखता ७० टक्के, तर बहिर्मुखता ३० टक्के) अशी असते. या अवस्थेत साधकाचे मन सतत अनुसंधानात असल्याने त्याचा चेहरा निर्विकार असतो. पू. आचारी अशाच अवस्थेत असल्याने त्यांच्याकडे बघितल्यावर ते शून्यावस्थेत असल्याचे जाणवते आणि त्या वेळी मन एकाग्र होणे, ध्यान लागणे इत्यादी अनुभूती येतात.

१ ई. पू. आचारी यांच्या वाणीत माधुर्य जाणवून त्यांचे बोलणे कळत नसतांनाही ‘ते ऐकत रहावे’, असे वाटणे : मुलाखत कन्नड भाषेत चालू होती आणि मला कन्नड भाषा येत नसल्याने त्यांचे बोलणे थोडेफार समजत होते. असे असूनही पू. आचारी बोलत असतांना ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे मला वाटत होते. ‘त्यांच्या वाणीत माधुर्य आहे’, असे मला जाणवले.

१ ई १. पू. आचारी यांच्यातील अल्प अहं आणि प्रीती या गुणांमुळे त्यांच्या वाणीत माधुर्य निर्माण होऊन ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटणे : ज्या वेळी एखादा वक्ता इतरांना शिकवण्याच्या दृष्टीने किंवा लोकेषणेमुळे बोलत असतो, त्या वेळी त्याचे स्वभावदोष आणि अहं जागृत असल्याने ‘त्याचे बोलणे ऐकू नये’, असे वाटते. याउलट ज्या वेळी जिवामध्ये इतरांप्रती प्रीती आणि अल्प अहं असतो, त्या वेळी ‘देवाने केलेली कृपा आणि देवाच्या कृपेने आलेल्या अनुभूती’, या भावाने तो आपले निवेदन करत असतो. अशा निवेदनात जिवाचे अस्तित्व अल्प असल्याने त्यात अध्यात्माची शिकवण दडलेली असते. त्यामुळे ‘अशा जिवांचे निवेदन ऐकत रहावे’, असे वाटते.

हीच प्रक्रिया पू. आचारी यांची मुलाखत चालू असतांनाही घडत होती. त्यांच्यात अहं अल्प असल्याने आणि ते त्यांचे अनुभव कृतज्ञताभावाने सांगत असल्यामुळे ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटत होते. त्यांच्यातील चैतन्य आणि साधकांप्रती असलेली प्रीती यांमुळे त्यांच्या वाणीत माधुर्य निर्माण झाले आहे.

१ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या संदेशातून पू. आचारी यांचे संतपद घोषित होताच सूक्ष्म नाद ऐकू येणे आणि पू. आचारी यांच्यावर पांढर्‍या किरणांचा झोत प्रक्षेपित होणे : पू. आचारी यांची मुलाखत घेतांनाच सौ. विद्या शानभाग यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले. या संदेश वाचनातून पू. आचारी यांचे संतपद घोषित करण्यात आले. सौ. विद्या शानभाग संदेश वाचू लागल्यावर मला सूक्ष्मातून नाद ऐकू येऊ लागले आणि ब्रह्मांडातून पांढर्‍या किरणांचा झोत पू. आचारी यांच्यावर प्रक्षेपित होऊ लागला. संतपद गाठण्याची घोषणा होताच सूक्ष्मातून ऐकू येणार्‍या नादात आणि सूक्ष्म प्रकाशात एकदम वाढ झाली.

१ उ १. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी पू. आचारी यांचे संतपद घोषित करून त्यांना चैतन्याच्या स्तरातून आनंदाच्या स्थितीकडे नेणे : मूर्तीकलेच्या माध्यमातून तपसाधना करून पू. आचारी शक्तीतून चैतन्याच्या टप्प्यापर्यंत आले होते. चैतन्याचा स्तर, म्हणजे सगुण-निर्गुण स्थितीत असणे. खडतर व्यष्टी साधना करून साधक अधिकाधिक सगुण-निर्गुण स्थितीपर्यंत पोचू शकतो. त्याच्या पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी गुरुकृपाच आवश्यक असते. पू. आचारी यांना सगुण-निर्गुण स्थितीच्या पुढे निर्गुण-सगुण स्थितीकडे, म्हणजे आनंदाच्या स्थितीकडे नेण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी त्यांचे संतपद घोषित केले. ही प्रक्रिया आकाशतत्त्वाच्या (संदेश वाचनाच्या) माध्यमातून घडत असल्याने सूक्ष्म नाद ऐकू आले. मूर्तीकला ही तेजतत्त्वाशी निगडित आहे. त्यामुळे गुरुतत्त्वाचे आशीर्वाद पू. आचारी यांच्यावर तेजतत्त्वाच्या माध्यमातून कार्यरत झाल्याने ही प्रक्रिया पांढर्‍या प्रकाश ज्योतीच्या माध्यमातून दिसली.

१ ऊ. पू. पृथ्वीराज हजारे यांनी पू. आचारी यांचा सन्मान केल्यावर ‘अनेक देवतांनी, तसेच त्यांचे गुरु श्री बाबा महाराज यांनी आशीर्वाद दिला’, असे सूक्ष्मातून दिसणे : संतपद गाठण्याची घोषणा झाल्यानंतर सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी हार घालून आणि श्रीफळ अन् भेटवस्तू देऊन पू. आचारी यांचा सन्मान केला. स्थुलातून हा सन्मान चालू असतांना ‘सूक्ष्मातून असंख्य देवता पू. आचारी यांना आशीर्वाद देत आहेत आणि पू. आचारी यांचे गुरु श्री बाबा महाराज डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देत आहेत’, असे दृश्य मला दिसले.

१ ऊ १. संतपद घोषित झाल्यामुळे पू. आचारी यांची व्यष्टीसह समष्टी साधनेतून व्यापक समष्टी संतपदाकडे वाटचाल चालू झाल्याने अनेक देवता आणि त्यांचे गुरु यांनी आशीर्वाद देणे : संतपद घोषित होण्यापूर्वी पू. आचारी यांची व्यष्टीसह समष्टी साधना अधिक प्रमाणात होत होती. संतपद घोषित झाल्यामुळे त्यांची व्यष्टीसह समष्टी साधनेतून व्यापक समष्टीकडे वाटचाल चालू झाली आहे. व्यष्टीसह समष्टी साधना, म्हणजे ‘शिष्यत्व’ ! यामध्ये शिष्य गुरुपदावर असूनही तो गुरूंनी शिकवलेली साधना इतरांना शिकवतो. याउलट व्यापक समष्टी साधना, म्हणजे समष्टी गुरु होणे. यात जीव समष्टी गुरु होऊन प्रकृती आणि काळ यांनुसार समष्टीसाठी आवश्यक ती शिकवण देतो.

आतापर्यंत पू. आचारी यांनी व्यष्टीसह समष्टी साधना म्हणून अनेक देवतांच्या भावपूर्ण आणि समष्टीला उपयुक्त अशा सात्त्विक मूर्तींची निर्मिती केली आहे. यामुळे त्या देवतांनी प्रसन्न होऊन समष्टी साधनेसाठी त्यांना आशीर्वाद दिला. आता पू. आचारी समष्टी गुरु होऊन ‘आध्यात्मिक अनुभूती देऊ शकतील’, अशा मूर्ती घडवणार्‍या शिष्यांची निर्मिती करणार आहेत. पू. आचारी स्वतः गुरु झाले असल्याने त्यांचे गुरु श्री बाबा महाराज यांनीही त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.

१ ए. पू. आचारी यांचे संतपद घोषित होतांना ‘महाविष्णु, शेषशायी श्रीविष्णु आणि चतुर्भुज श्रीविष्णु’, अशी भगवान विष्णूची अनेक रूपे दिसणे अन् पूर्ण वायूमंडल वैकुंठ झाल्याचे जाणवणे : पू. आचारी संतपदावर विराजमान होण्याचा सोहळा चालू असतांना मला भगवान विष्णूचे ‘महाविष्णु’ (निर्गुणाशी आणि गुरुतत्त्वाशी निगडित रूप), ‘शेषशायी श्रीविष्णु’ (निर्गुण-सगुण रूप) आणि ‘चतुर्भुज श्रीविष्णु’ (भगवान विष्णूचे समष्टी रूप) अशी अनेक रूपे दिसली. या वेळी पूर्ण वायूमंडल जणू वैकुंठ झाल्याप्रमाणे जाणवत होते.

१ ए १. पू. आचारी अंतरंग विष्णुभक्त असल्याने भूवैकुंठातील श्रीमन्ननारायण यांच्या शुभाशीर्वादाने त्यांचे संतपद घोषित होणे : चित्रकला आणि मूर्तीकला या भगवान विष्णूच्या माध्यमातून प्रगट झालेल्या कला आहेत. यामुळे या कलांच्या उपासकांमध्ये विष्णुतत्त्व असते. असे उपासक भगवान श्रीविष्णूशी एकरूप होऊन मुक्ती प्राप्त करतात. मूर्तीकलेच्या माध्यमातून साधना केल्यामुळे पू. आचारी अंतरंगी विष्णुभक्त झाले आहेत.

१ ए १ अ. ‘भूवैकुंठ’म्हणजे रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम आणि महर्षि ज्यांना ‘श्रीमन्ननारायण’, असे म्हणतात, ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : पू. आचारी यांच्या पुढच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी विष्णुतत्त्वच आवश्यक होते. यामुळे ‘महर्षि ‘भूवैकुंठ’ म्हणून ज्याचा गौरव करतात, अशा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात या अंतरंग विष्णुभक्ताचा सोहळा होणे आणि महर्षि ज्यांना ‘श्रीमन्ननारायण’, असे म्हणतात, अशा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या संदेशातून, म्हणजे शुभाशीर्वादाने त्यांचे संतपद घोषित करणे’, ही ईश्वरेच्छाच होती.

१. पू. आचारी यांना विष्णुतत्त्वच गुरुस्वरूप होऊन मार्गदर्शन करत असल्याने निर्गुणाशी आणि गुरुतत्त्वाशी निगडित महाविष्णुरूप दिसले.

२. संतपद घोषित झाल्यामुळे पू. आचारी यांची निर्गुण-सगुण स्थिती निर्माण झाल्याने त्याचे प्रतीक म्हणून मला शेषशायी श्रीविष्णूचे दर्शन झाले.

३. यापुढे पू. आचारी ‘समष्टी संत’ म्हणून कार्य करणार असल्याने भगवान श्रीविष्णूचे समष्टी रूप म्हणजे चतुर्भुज श्रीविष्णूचे दर्शन झाले.

४. याच प्रकारे वातावरणातील विष्णुतत्त्वात वाढ झाल्याने पूर्ण वायूमंडल वैकुंठ झाल्याचे जाणवले.

१ ऐ. पू. आचारी यांचे संतपद घोषित झाल्यावर विशुद्ध चक्रापर्यंत जागृत असलेली त्यांची कुंडलिनी आज्ञाचक्रापर्यंत जागृत होणे : पू. आचारी यांचे संतपद घोषित होण्यापूर्वी त्यांची कुंडलिनी विशुद्ध चक्रापर्यंत जागृत होती. संतपद घोषित होण्याच्या सोहळ्यातून त्यांची कुंडलिनी आज्ञाचक्रापर्यंत जागृत झाली.

१ ऐ १. मूर्तीकलेच्या तपसाधनेमुळे पू. आचारी आकाशतत्त्वाशी निगडित निर्गुण स्तरावर असणे आणि संतपद घोषित झाल्यामुळे त्यांची निर्गुण तत्त्वाकडे वाटचाल होणे : मूर्तीकलेची साधना तेजतत्त्वाशी निगडित आहे. तेजतत्त्वाचे अधिकाधिक निर्गुण-सगुण या स्तरापर्यंत प्रगटीकरण होते, त्यातून पूर्ण निर्गुणत्वाकडे जाता येत नाही. गुरुतत्त्वाकडून होत असलेल्या अंतःस्थ मार्गदर्शनामुळे पू. आचारी मूर्तीकलेच्या साधनेच्या माध्यमातून आकाशतत्त्वाशी निगडित निर्गुण स्थितीपर्यंत पोचले होते. योगमार्गानुसार आकाशतत्त्वाचे स्थान विशुद्धचक्र असते. यामुळे संतपद घोषित होण्यापूर्वी पू. आचारी यांची कुंडलिनी विशुद्ध चक्रापर्यंत जागृत झाल्याचे दिसत होते. ‘संत’ म्हणून पातळी घोषित होण्याच्या माध्यमातून पू. आचारी यांच्यावर गुरुकृपा होऊन त्यांची आकाशतत्त्वाच्या पलीकडील निर्गुण तत्त्वाकडे वाटचाल चालू झाली. यामुळे संतपद घोषित झाल्यानंतर त्यांची कुंडलिनी आज्ञाचक्रापर्यंत जागृत झाल्याचे दिसत होते.

१ ओ. संतपद घोषित झाल्यावर पू. आचारी यांना ‘स्वतः स्वर्गलोकात आहे’, असे जाणवणे : संतपद घोषित होण्याच्या सोहळ्यानंतर मनोगत व्यक्त करतांना पू. आचारी यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले आणि त्यांनी सांगितले, ‘‘मला असे वाटत आहे की, मी स्वर्गलोकातच आहे.’’

१ ओ १. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी पू. आचारी यांचे संतपद घोषित केल्यामुळे त्यांच्या आनंदावस्थेत वाढ होणे : संतपद घोषित होण्यापूर्वी पू. आचारी यांच्यातील आनंदाचे प्रमाण १५ टक्के होते. संतपद घोषित झाल्यानंतर या प्रमाणात वाढ होऊन ते २५ टक्के झाले. आनंदावस्थेत झालेल्या वृद्धीमुळे पू. आचारी त्यांची शून्यावस्था सोडून शिष्यावस्था आणि आनंदावस्था अनुभवू शकले. या दोन्ही अवस्थांच्या मीलनामुळे त्यांच्या डोळ्यांतून अनुक्रमे भक्ती आणि आनंद यांनी युक्त असे अश्रू आले अन् त्यांना ‘आपण स्वर्गानंद भोगत आहोत’, अशी जाणीव निर्माण झाली. यातून संतपद घोषित होण्याचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते.

१ औ. सोहळ्यात त्रेतायुगाचे वायूमंडल निर्माण होणे : पू. आचारी यांच्या संतपद घोषित होण्याच्या सोहळ्यात पूर्णवेळ मला त्रेतायुगाचे वायूमंडल, म्हणजे त्रेतायुगात असणार्‍या सात्त्विकतेने युक्त वायूमंडल अनुभवायला येत होते.

१ औ १. पू. आचारी यांची साधनायात्रा त्रेतायुगातील जिवांप्रमाणे प्रथम व्यष्टी आणि मग समष्टी या क्रमाने झाल्याने सूक्ष्मातून त्रेतायुगाचे वायूमंडल निर्माण होणे : त्रेतायुगात जिवांची साधना प्रथम व्यष्टी आणि मग समष्टी अशा प्रकारची होती. त्यामुळे जीव आयुष्यभर व्यष्टी साधना करायचे आणि अवतारी कार्याची वेळ आली की, त्या कार्यात सहभागी होऊन समष्टी साधना करायचे. पू. आचारी यांची साधनायात्राही अशाच प्रकारे, म्हणजे प्रथम व्यष्टी आणि मग समष्टी या प्रकारे होत आहे. संतपद घोषित झाल्यानंतर ते ईश्वरेच्छेने व्यापक समष्टी साधना करणार असल्याने या सोहळ्यात त्रेतायुगाचे वायूमंडल पूर्णवेळ अनुभवायला येत होते.’

२. कारवार (कर्नाटक) येथील पंचशिल्पकार पू. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) यांच्या साधनायात्रेच्या संदर्भात ईश्वराने दिलेले ज्ञान !

२ अ. गुरुकृपेने साधनेसाठी जन्म घेणारा जीव : पू. आचारी यांची जन्मतः आध्यात्मिक पातळी ५५ टक्क्यांहून अधिक होती. पूर्वजन्मीच्या साधनेमुळे ते शिष्याच्या स्तरावर होते. त्यामुळे त्यांच्यावर लौकिक मायेचा परिणाम न होता त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी मूर्तीकला शिकण्याच्या माध्यमातून साधना करणे चालू केले.

२ आ. पू. आचारी यांनी वयाच्या १४ व्या वर्षापासून मूर्तीकला शिकण्यास चालू करणे आणि त्यांच्या अंतःस्थ साधनेमुळे त्यांचे गुरु स्वतःहून त्यांच्या जीवनात येणे : जन्मतः प्रत्येक जिवाला ‘त्याने कोणत्या मार्गाने साधना केली, तर त्याची आध्यात्मिक प्रगती होणार’, याची जाणीव असते. मायेतील आवरणामुळे अधिकांश जणांमध्ये ही जाणीव सुप्त असते, तर साधनेमुळे अत्यल्प जणांमध्ये ही जाणीव कार्यरत रहाते. पू. आचारी आपल्या जीवनाच्या ध्येयाचे स्मरण असणारे आहेत. ‘कलेच्या माध्यमातून आध्यात्मिक उन्नती होणार’, याची जाणीव असल्याने वयाच्या १४ व्या वर्षापासून त्यांनी मूर्तीकला शिकणे चालू केले. यातून त्यांची अंतःस्थ साधना चालू असल्याने अध्यात्मात अपेक्षित अशा प्रकारे ते स्वतः गुरूंकडे गेले नाहीत किंवा त्यांनी मनाने गुरु केले नाहीत. पू. आचारी यांची अंतःस्थ साधना आणि तळमळ यांवर प्रसन्न होऊन त्यांना स्थुलातील अन् सूक्ष्मातील मार्गदर्शन करण्यास सक्षम असे दत्तस्वरूप गुरु श्री बाबा महाराज स्वतःहून त्यांच्या जीवनात आले. यातून पू. आचारी यांची अंतःस्थ तळमळ आणि शिष्यवृत्ती लक्षात येते.

२ इ. जन्मतः असलेल्या भावामुळे पू. आचारी यांनी गुरूंकडून सूक्ष्म स्तरावरील ज्ञान, म्हणजेच अध्यात्म शिकणे : शिष्याला लाभलेल्या गुरूंचा आध्यात्मिक स्तर चांगला असतो; पण प्रत्येक शिष्याची आध्यात्मिक स्थिती चांगली असतेच, असे नाही. विशेषकरून कला शिकलेल्या अधिकांश साधक-कलाकारांचा कल स्थूल स्तरावरील कला शिकण्याकडे असतो. कलेला जोडून अंतरंगातील साधना किंवा सूक्ष्मातील भाग ते शिकत नाहीत. गुरूंना विविध लीला करून अनुभूतींद्वारे अशा शिष्यांना मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील अध्यात्माची ओळख करून द्यावी लागते. असे असूनही अगदी अत्यल्प शिष्य असे असतात, जे गुरूंकडून सूक्ष्मातील ज्ञान शिकतात. अशा उत्तम शिष्यांपैकी एक म्हणजे पू. आचारी ! ते ‘स्थुलातून सगुणातील मूर्ती कशी बनवायची ?’, हे शिकले आहेतच. त्या समवेत गुरूंच्या कृपेने ‘देवतेचे सूक्ष्म रूप कसे असते ?, कोणत्या दगडात कोणत्या देवतेची स्पंदने येतात ?’, असे सूक्ष्मातील ज्ञानही त्यांनी स्व-अनुभूती घेऊन मिळवले आहे. हे त्यांचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.

२ ई. सतत अनुभूतीतून शिकून गुरुतत्त्वाच्या इच्छेने साधना करणे : स्थुलातून गुरूंचे मार्गदर्शन मिळाले की, अनेक शिष्य साधना करतात; पण गुरु नसतांना त्यांच्या शिकवणीनुसार सतत साधनारत रहाणारा शिष्य ‘खरा शिष्य’ असतो. पू. आचारी अशाच खर्‍या शिष्यांपैकी एक आहेत. गुरूंनी केलेल्या आज्ञेप्रमाणे सूक्ष्मातील कळत असतांनाही त्यांनी इतरांना आध्यात्मिक उपाय इत्यादी न सांगता केवळ मूर्ती बनवण्याची साधना केली. त्याचबरोबर त्यांनी त्यांचे साधनेचे प्रयत्न, भाव आणि सूक्ष्मातील ज्ञान यांमध्येही वृद्धी केली. यामुळे केवळ मूर्ती बनवणे येथपर्यंत मर्यादित न रहाता ‘सूक्ष्मातून देवतांशी बोलणे, देवाज्ञेचे पालन करणे, स्वप्नात येऊन देवतांनी मार्गदर्शन करणे’ इत्यादी उच्च स्तराच्या अनुभूती त्यांना आल्या आणि ‘मूर्तीत देवत्व येण्यासाठी मूर्तीजवळ बसून भजन करणे’, अशा प्रकारचे अनेक उपाय त्यांना सुचले. त्यामुळे त्यांची कला केवळ सगुणातील, म्हणजे शक्ती स्तरावरची न रहाता ती सगुण-निर्गुण आणि पुढे निर्गुण-सगुण या स्तरापर्यंत पोचली.

२ उ. कलेतून काही मिळावे, अशी अपेक्षा न ठेवता कलेसाठी सतत त्याग करणारे आणि तपस्येप्रमाणे कलेची साधना करणारे पू. आचारी ! : पू. आचारी मूर्ती बनवतांना एवढे एकाग्र होतात की, त्यांना तहान-भूक, झोप इत्यादी कशाचीही जाणीव नसते. या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘कलीयुगातील अन्य कलाकार ‘कलेतून मला काय मिळणार ?’, या अपेक्षेने कलेचा अभ्यास करतात. कलेसाठी साधना म्हणून त्याग करण्याची त्यांची इच्छा नसते. यामुळे त्यांचे मन आणि देहबुद्धी सतत जागृत असते. याउलट पू. आचारी यांनी कलेतून कोणतीही अपेक्षा न ठेवता तिच्यासाठी सतत त्याग केला. कलेसाठी केलेल्या त्यागामुळे ईश्वराने त्यांना भरभरून प्रदान केले.
सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये ऋषिमुनी जेवण-झोप न घेता अनेक वर्षे ध्यान लावून चैतन्याच्या बळावर तपसाधना करायचे. त्याच प्रकारे पू. आचारीही कलेच्या माध्यमातून अनुसंधान आणि चैतन्य अनुभवत असल्याने एका तपस्वीप्रमाणे कलेची साधना करतात. अशा साधनेमुळे त्यांना चैतन्य मिळून त्यांचे देहबुद्धीचे प्रमाण अल्प होत असल्याने त्यांना भूक, तहान आणि झोप यांपैकी कशाचीही आवश्यकता भासत नाही. कलेला तपस्या समजून तिची उपासना केल्याने त्यांनी बनवलेल्या मूर्तींमध्येही भाव आणि चैतन्य निर्माण होते.

२ ऊ. मूर्तींच्या माध्यमातून दगड, सिमेंट आदी तमोगुणी घटकांतून देवत्वाचे प्रगटीकरण करणारे पू. आचारी ! : चित्रकला, संगीतकला, वाद्यकला इत्यादी कलांतून साधना करणारे स्वतःच्या सात्त्विकतेत वाढ करत करत ईश्वराकडे जातात. कलेच्या माध्यमातून साधना करणार्‍यांना सात्त्विक घटकांचा आधार असतो, उदा. बासरी, वीणा, तबला इत्यादी सात्त्विक वाद्ये, भारतीय संगीतातील सात्त्विक राग, चित्रकलेतील पांढरा कागद इत्यादी. यांमुळे संगीत, चित्रकला यांसारख्या कलेतून साधना करणार्‍यांना आध्यात्मिक त्रास किंवा वाईट शक्तींचा त्रास असेल, तर तो त्रास सात्त्विक कलेच्या उपासनेमुळे न्यून होतो; पण मूर्तीकलेच्या संदर्भात असे नाही. मूर्तीकलेत ‘तमोगुणी घटक, उदा. दगड, प्लास्टर, पॉलिस्टर, सिमेंट इत्यादींपासून सत्त्वगुणी मूर्ती निर्माण करणे’, हे एक आव्हानच असते. मूर्तीकलेत उपयोगी असणारे साहित्य आणि मूर्ती घडवण्याची प्रक्रिया ही रज-तमगुण प्रधान असते. तमोगुणी घटकांतील शक्तीचा परिणाम होऊन कलाकारांवर तुलनेत अधिक प्रमाणात काळ्या शक्तीचे आवरण निर्माण होते. यामुळे अधिकांश मूर्तीकारांच्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठेपूर्वी देवत्व तर दूरच; पण सात्त्विकताही नसते. प्राणप्रतिष्ठेच्या धार्मिक कृतीतून त्या मूर्तींमध्ये सात्त्विकता आणि देवत्व यांचे आवाहन करावे लागते.
याउलट पू. आचारी यांनी निर्माण केलेल्या मूर्तींमध्ये त्यांच्या साधनेमुळे न्यूनतम ३० टक्के एवढ्या प्रमाणात सात्त्विकता असते आणि काही मूर्तींमध्ये देवत्व, म्हणजे सात्त्विकता ५० टक्क्यांहून अधिक असते. यामुळे ‘प्राणप्रतिष्ठेपूर्वीच मूर्ती सजीव वाटते आणि विविध अनुभूतीही येतात. याचे उदाहरण म्हणजे पू. आचारी यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमासाठी बनवलेली ऋद्धिसिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाची मूर्ती !

२ ए. स्वेच्छा किंवा परेच्छा यांनुसार मूर्ती न घडवता ईश्वरेच्छेने मूर्ती घडवणार्‍या पू. आचारी यांची व्यष्टीसह समष्टी साधना होऊन व्यापक समष्टीकडे होत असलेली वाटचाल ! : वर्तमान कलीयुगातील ९० टक्के मूर्तीकार केवळ धनलाभासाठी मूर्ती निर्माण करतात. अशा मूर्तीकारांमध्ये देवतांप्रती भाव नसल्याने त्यांनी बनवलेल्या मूर्ती देवत्वहीन (देवत्व नसलेल्या) असतात. केवळ १० टक्के मूर्तीकार स्वतःची व्यष्टी साधना म्हणून मूर्ती बनवतात. या वेळेस ते ‘समष्टीला काय आवश्यक आहे ?’, याचा विचार न करता स्वतःच्या मनानुसार किंवा विचारसरणीच्या अनुसार देवतेची मूर्ती घडवतात. याउलट पू. आचारी सूक्ष्म ज्ञानातून देवतेच्या रूपाचे दर्शन घेऊन मूर्ती घडवतात. यामुळे विशिष्ट देऊळ, संप्रदाय किंवा आश्रम यांच्यासाठी देवतेच्या ज्या रूपाची आवश्यकता असते, तशा रूपाचे दर्शन पू. आचारी यांना सूक्ष्मातून होऊन ती मूर्ती घडते.

याच प्रकारे मूर्ती बनवतांना काही चुकत असल्यास गुरुतत्त्व विविध माध्यमांच्या, उदा. संतांच्या, स्वप्नांच्या माध्यमातून त्यांना त्याची जाणीव करून देते. अशा प्रकारे पू. आचारी यांनी स्वेच्छा किंवा परेच्छा यांनुसार मूर्ती न घडवता ईश्वरेच्छेने मूर्ती घडवण्यासाठी आरंभीपासून प्रयत्न केल्याने त्यांची व्यष्टीसह समष्टी साधना झाली आणि आता ते व्यापक समष्टीकडे जात आहेत. यातून त्यांनी मूर्तीकलेच्या माध्यमातून साधना करणार्‍या मूर्तीकारांच्या समोर एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.

२ ऐ. अप्रकट भावाच्या स्तरावर राहून मूर्तींची निर्मिती करणारे पू. आचारी यांची निर्गुणाकडे वाटचाल होत असणे : मूर्तीकला ही तेजतत्त्वाशी संबंधित कला आहे. तेजतत्त्व हे सगुण-निर्गुण स्तराशी संबंधित असते. यामुळे चित्र किंवा मूर्ती यांच्यात प्राणप्रतिष्ठेपूर्वी अधिकाधिक २० टक्के एवढ्या प्रमाणातच देवतातत्त्व निर्माण करू शकतो. असे असतांनाही पू. आचारी यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमासाठी बनवलेली ऋद्धिसिद्धिसहित श्री सिद्धिविनायक यांची निर्गुण-सगुण स्तराची मूर्ती सिद्ध केली. यामुळे त्या मूर्तीत २८.३ एवढ्या प्रमाणात गणपतितत्त्व आकृष्ट झाले. याचे कारण पू. आचारी केवळ प्रकट भावाच्या स्तरावर नसून अप्रकट भावाच्या स्तरावर राहून मूर्तीची निर्मिती करतात. साधनेच्या आरंभी ते प्रकट भावाच्या स्तरावर असायचे. पुढे साधनेत प्रगती होत गेल्यावर त्यांची प्रकट भावावस्था अल्प होऊन अप्रकट भावावस्थेची वृद्धी झाली. या अप्रकट भावावस्थेमुळे ते आता निर्गुणाकडे वाटचाल करत आहेत.

२ औ. साधनेत उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती केल्यामुळे ईश्वरप्राप्तीसाठी आवश्यक त्या त्या देवतेचे तत्त्व त्यांना मिळणे आणि त्यामुळे आध्यात्मिक उन्नती होणे : ईश्वरात सर्व देवतांचे तत्त्व समाविष्ट असते, उदा. देवी, श्री दत्त, श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादी. ईश्वराशी एकरूप होण्यासाठी जिवालाही सर्व देवतांचे तत्त्व ग्रहण होणे आवश्यक असते. व्यष्टी उपासक एका जन्मात एका देवतेची उपासना करून अनेक जन्म साधना करून ईश्वरप्राप्ती करतो. याउलट समष्टी उपासक ‘नामजप, यज्ञ-याग, गुणसंवर्धन, देवतांच्या चरित्रातून शिकणे’, अशा विविध माध्यमांतून एका जन्मात अनेक देवतांची उपासना करून ईश्वरप्राप्ती करतो. पू. आचारी यांनी गुरुतत्त्वाच्या मार्गदर्शनानुसार उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती केल्याने आणि अनेक देवतांच्या मूर्ती भावपूर्णरित्या घडवल्याने एका जन्मात त्यांना अनेक देवतांचे तत्त्व प्राप्त होऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती झाली आहे. अशा प्रकारे मूर्तीकलेतून ईश्वरप्राप्ती करणार्‍या कलाकारांसाठी त्यांनी एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे.

२ अं. साधनेमुळे पू. आचारी यांनी अवघ्या १५ ते २० दिवसांत अद्वितीय अशी ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाची मूर्ती बनवणे आणि याद्वारे अवतारी कार्यात समाविष्ट होऊन काळानुसार समष्टी साधना करणे : ज्या वेळी अवतार भूलोकावर जन्म घेतो, त्या वेळी त्याच्या समवेत त्याचा व्यूहही प्रगटतो. या व्यूहातील काही जण अवताराच्या समवेत निरंतर राहून व्यष्टी आणि समष्टी साधना करतात. काही जण अप्रकट राहून व्यष्टी किंवा समष्टी साधना करतात, तर काही जण वेळ येईपर्यंत व्यष्टी साधना करून स्वतःमध्ये सामर्थ्य निर्माण करतात आणि योग्य वेळी त्या सामर्थ्यामुळे समष्टी साधना करतात. याचे उदाहरण त्रेतायुगातील रामसेतू आहे. प्रभु श्रीरामाला रावणाच्या बंदीवासातून सीतामातेची सुटका करण्यासाठी लंकेला जायचे होते. यासाठी त्याला समुद्रावर सेतू बांधणे आवश्यक होते. अशा वेळी सेतू बांधण्याची कला ज्ञात असलेले जांबुवंत, नल-नील अशा जिवांनी त्या अवतारी कार्यात प्रभु श्रीरामाचे साहाय्य करून समष्टी साधना केली. हे सर्व जण नसते, तर अवतारी कार्य पूर्ण झाले नसते.

ज्या प्रकारे ‘भगवान श्रीरामाचा जन्म, श्रीराम आणि सीता यांचा विवाह, रावणाने सीतेचे अपहरण करणे, रामसेतूची निर्मिती, रावणाचा वध अन् रामराज्य स्थापना’, हे सर्व ईश्वरनियोजित होते, त्याच प्रकारे ‘वर्तमान कलीयुगात समष्टी साधनेच्या माध्यमातून होत असलेल्या धर्मसंस्थापनेच्या, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या प्रक्रियेत महर्षींनी ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाची स्थापना करायला सांगणे आणि ती मूर्ती पू. आचारी यांनी बनवणे’, हेसुद्धा ईश्वरनियोजित होते.

त्रेतायुगात साधना करणे सोपे होते; पण वर्तमान कलीयुगात व्यष्टी साधना करून स्वतःमध्ये समष्टी करण्याची क्षमता निर्माण करणे पुष्कळ अवघड आहे. पू. आचारी यांनी अशी खडतर साधना केली. यामुळे जन्मभर व्यष्टी साधना करून ते कलीयुगात घडत असलेल्या अवतारी कार्यात सहभागी होऊ शकले. यातूनच पू. आचारी यांची आध्यात्मिक क्षमता लक्षात येते. महर्षींनी ज्या तिथीला सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाची स्थापना करायला सांगितली होती, त्यासाठी अनुमाने दोन मासांचा कालावधी उपलब्ध होता. ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाची अपेक्षित मूर्ती बनवायला अन्य कलाकारांना न्यूनतम १.५ वर्षे लागली असती. अन्य कोणत्याही मूर्तीकारामध्ये दोन मास एवढ्या अल्प कालावधीत सात्त्विक मूर्ती सिद्ध करून देण्याची क्षमता नव्हती. याउलट पू. आचारी यांनी केवळ १५ ते २० दिवसांच्या कालावधीत अद्वितीय अशी मूर्ती बनवली. व्यष्टीसह समष्टी साधनेमुळे पू. आचारी यांनी आध्यात्मिक निकषांवर पाय ठेवल्याने त्यांना ही मूर्ती बनवता आली. त्यांची आध्यात्मिक क्षमता आणि साधना बघूनच ईश्वराने अवताराच्या व्युहात, म्हणजे समष्टी कार्यासाठी त्यांची निवड केली.

२ क. मूर्तीकलेच्या साधनेतून स्वतः देवस्वरूप होणे : ज्या वेळी कलेच्या माध्यमातून साधना करत उपासकाची कला परिपूर्ण (कर्म), भावपूर्ण (भक्ती), फलनिष्पत्तीयुक्त (ज्ञान) आणि अनुसंधान (ध्यान) निर्माण करणारी होते, त्या वेळी कलाकार उपासक न रहाता स्वतः देवतास्वरूप होतो. मनुष्याच्या डोळ्यांना दिसू शकणारे दोन देव, म्हणजे सूर्य आणि चंद्र. दिवसातून काही वेळ हे दोन्ही देव मनुष्याला स्थुलातून दिसत नाहीत, तरी त्यांच्या अस्तित्वाने सृष्टीत कार्य होतच असते. साधनेमुळे हीच स्थिती पू. आचारी यांनी गाठली आहे. ज्या प्रकारे सूर्य आणि चंद्र यांच्या अस्तित्वामुळे कार्य होते, त्या प्रकारे पू. आचारी यांच्या अस्तित्वातूनच कार्य होणे चालू झाले आहे. त्यांच्या या स्थितीसंदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘पू. आचारी केवळ नारायणभक्त आहेत’, असे न वाटता ‘ते स्वतः ‘नारायण’, म्हणजे देवच आहेत’, असे जाणवते.’’

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आचारी यांचे संतपद घोषित केल्यामुळे त्यांना झालेले सूक्ष्मस्तरीय लाभ

३ अ. पू. आचारी समष्टी गुरु झाल्यामुळे त्यांची कला त्यांच्यापर्यंत मर्यादित न रहाता ती पात्र शिष्यांपर्यंत पोचणे शक्य ! : कलेच्या माध्यमातून साधना करणारे अधिकतर साधक-कलाकार पूर्ण जन्म व्यष्टी साधना करतात. यामुळे कलेच्या साधनेतून त्यांनी केलेले प्रयत्न, त्यांना आलेल्या अनुभूती समष्टीला ज्ञात होत नाहीत. कलाकारांना परत जन्म घेतल्यावर नव्याने संगीत शिकावे लागते. यामुळे कलेच्या माध्यमातून त्यांनी अनुभवलेले अध्यात्म त्यांच्या समवेत लुप्त होऊन जाते. अशा प्रकारे केवळ सगुण स्तराची व्यष्टी साधना केल्यामुळे पुढच्या जन्मात अधिकांश कलाकारांना भक्तीयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आदी सात्त्विक योगमार्गांतून पुढची व्यष्टी साधना करावी लागते आणि त्यानंतर त्यांची समष्टी साधनेकडे वाटचाल होते.

अशा प्रकारे कलेच्या माध्यमातून समष्टी साधना न करणार्‍या कलाकारांचे एका जन्मात केलेल्या खडतर साधनेचे फळ नाहीसे होते. हीच प्रक्रिया पू. आचारी यांच्या कलेच्या संदर्भातही घडली असती. यामुळे ईश्वरेच्छेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे संतपद घोषित केले. पू. आचारी यांचे संतपद घोषित केल्यामुळे त्यांची समष्टी साधनेकडे म्हणजे इतरांना दैवी कला शिकवणे, याकडे वाटचाल झाली. यामुळे त्यांनी कलेच्या माध्यमातून केलेली व्यष्टी साधना व्यर्थ न होता त्याला समष्टी साधनेची जोड मिळाल्यामुळे त्यांना परत जन्म घ्यावा लागणार नाही. पू. आचारी यांचे संतपद घोषित झाल्यामुळे पुढे भविष्यात मूर्तीकलेच्या माध्यमातून साधना करणारे अनेक दैवी जीव त्यांच्याकडून सूक्ष्मातून ज्ञान ग्रहण करू शकणार आहेत. यातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आचारी यांचे संतपद घोषित करण्यामागील व्यष्टी आणि समष्टी कार्यकारणभाव लक्षात येतो.

३ आ. पू. आचारी यांची प्रवृत्तीतून निवृत्तीकडे वाटचाल होणे : मायेत राहून साधना करणार्‍या जिवांच्या समवेत सर्वांत मोठा धोका हा असतो की, आध्यात्मिक प्रगती झाल्यावरही त्याची अनुभूती न आल्यामुळे ते प्रवृत्तीत रहातात. प्रवृत्तीच्या स्थितीत राहिल्यामुळे ते अल्प प्रमाणात शिवात्मा स्थितीत आणि अधिक प्रमाणात जिवात्मा स्थितीत असतात. जिवात्मा स्थितीत राहिल्यामुळे त्यांच्या मनावर मायेतील प्रसंगांचे अधिक परिणाम होऊन त्यांची आध्यात्मिक अधोगती होण्याची शक्यता अधिक असते. हीच प्रक्रिया पू. आचारी यांच्या संदर्भातही घडू शकली असती; पण ईश्वरेच्छेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे संतपद घोषित केले. यामुळे पू. आचारी यांना स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीची अनुभूती आल्यामुळे त्यांची प्रवृत्तीतून निवृत्तीकडे वाटचाल झाली. निवृत्तीत राहिल्यामुळे, म्हणजे अधिक काळ शिवात्मा स्थितीत रािहल्यामुळे त्यांना मायेपासून अलिप्त राहून साधना करता येईल. अन्य कलाकारांसारखे परत मनुष्यजन्म न घेता त्यांना उच्च लोकांमध्ये व्यष्टी आणि समष्टी साधना करत पुढची आध्यात्मिक उन्नती करणे सहज शक्य होणार आहे.

३ इ. पू. आचारी यांच्यातील देवत्व जागृत होऊन त्यांच्या अस्तित्वातून समष्टी कार्य होणार असणे : जोपर्यंत जिवाला आध्यात्मिक अनुभूती येत नाहीत, तोपर्यंत मायेतील आवरणामुळे जिवाचे मन आणि बुद्धी यांची कार्यरतता अधिक असते. यामुळे त्या जिवाची आध्यात्मिक शक्ती पूर्णपणे प्रगट न होता काही अंशी प्रगट होते. जिवाला आध्यात्मिक अनुभूती आल्यावर जिवातील चैतन्य आणि आनंद यांमुळे मन-बुद्धी यांची कार्यरतता अल्प होऊन त्याच्यातील देवत्व जागृत होते. हीच प्रक्रिया पू. आचारी यांच्या संदर्भातही घडली. प्रत्यक्षात ते संत पातळीला असतांनाही संतत्वाची अनुभूती न आल्यामुळे त्यांच्यातील देवत्व पूर्णपणे जागृत न होता काही प्रमाणात जागृत झाले होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे संतपद घोषित केल्यामुळे त्याचे मन आणि बुद्धी यांची कार्यरतता न्यून होऊन देवत्व जागृत झाले. अशा प्रकारे देवत्वाच्या जागृतीमुळे त्यांच्या अस्तित्वाने पूर्वीच्या तुलनेत अधिक प्रमाणात समष्टी कार्य होणार आहे.

४. कृतज्ञता : ईश्वराने बनवलेल्या भूलोकरूपी या बागेत योगमार्गरूपी विविध झाडे (भक्तीयोग, कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग इत्यादी) आहेत. या झाडांवर फळांच्या रूपात साधना करणारे जीव अर्धविकसित किंवा विकसित स्वरूपात असतात. काळानुसार ‘ज्या फळाचा (साधकाचा) विकास होतो, ते बागेच्या मालकाकडे, म्हणजेच गुरुचरणांशी अर्पण व्हावे’, यासाठी माळी सतत प्रयत्नरत रहातो. त्या माळ्याप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेही विविध साधनामार्गांनी साधना करणार्‍या जिवांचे किंवा संतांचे चरित्र समाजाला सांगून समष्टीला गुरुचरणांकडे नेतात. आध्यात्मिक कलारूपी झाडावर बहरलेले पू. आचारीरूपी फळ आणि त्या फळाचे महत्त्व ओळखून समष्टीला त्या फळातील आनंदाची, म्हणजेच संतांच्या चैतन्याशी ओळख करून देणार्‍या माळीरूपी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०२२, संध्याकाळी ६.३०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक