अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी ही ‘अयोध्या बुद्ध विहार’ घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

नवी देहली – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीला ‘अयोध्या बुद्ध विहार’ म्हणून घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपिठासमोर हा खटला सुनावणीसाठी आला होता. त्या वेळी खंडपिठाने, ‘न्यायालयाने वर्ष २०१९ मध्ये अयोध्या प्रकरणाविषयी निकाल दिला आहे. त्यामुळे याचिककर्त्याने ही याचिका मागे घ्यावी अन्यथा न्यायालय ती रहित करेल’, असे म्हटले आहे. विनित मौर्य नावाच्या याचिकाकर्त्याने ही याचिका प्रविष्ट केली होती. ‘श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणावरून बौद्ध कलाकृती कह्यात घेण्यात आल्या होत्या. श्रीरामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा निकाल देतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने वर्ष २०१० मध्ये दिलेल्या निकालात याविषयी नमूद केले आहे. त्यामुळे प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष (सुधारणा आणि प्रमाणीकरण) कायद्याच्या कलम ३ आणि ४ अन्वये ही भूमी राष्ट्रीय पुरातत्व स्थळ म्हणून घोषित करावे’, असा युक्तीवाद मौर्य यांनी केला होता.