भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. दामोदर गायकवाड !

माघ शुक्ल दशमी (३१.१.२०२३) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणारे श्री. दामोदर गायकवाड यांचा ४९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यासमवेत सेवा करणारे श्री. सुदीश पुथलत यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

श्री. दामोदर गायकवाड

श्री. दामोदर गायकवाड यांना ४९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

श्री. सुदीश पुथलत

१. सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण करणे 

१ अ. एकाग्रतेने सेवा करणे : ‘श्री. दामोदर गायकवाड सेवा चांगल्या प्रकारे आणि परिणामकारक करतात. दादांचे पूर्ण लक्ष सेवेवरच केंद्रित झालेले असते. ते एखादी सेवा करतांना त्यांच्याकडे अकस्मात् दुसरी सेवा आली, तर ते ‘ती सेवाही वेळेत कशी पूर्ण करता येईल’, असा विचार करतात. त्यांचा वेळ कधीच वाया जात नाही.

१ आ. दादा सेवेचे उत्तम नियोजन करतात.

१ इ. भांडारातील साहित्याच्या नोंदी योग्य पद्धतीने केल्यामुळे साधकांच्या मागणीनुसार त्यांना प्लास्टिक उपलब्ध करून देता येणे : आश्रमात पावसाचे पाणी आत येऊ नये, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ‘प्लास्टिक’ (फ्लेक्स) वापरले जाते. दादांनी भांडारातील सर्व प्रकारच्या ‘प्लास्टिक’च्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यांनी विविध आकारांतील ‘प्लास्टिक’ योग्य प्रकारे ठेवले आहे. साधकांनी विविध आकारांच्या ‘प्लास्टक’ची आयत्या वेळी मागणी केल्यासही दादा त्यांना त्वरित ‘प्लास्टिक’ उपलब्ध करून देतात.

१ ई. सेवेतील अडचणींविषयी गार्‍हाणे न करणे : दादांकडे अनेक सेवांचे दायित्व आहे. त्यांना सेवांचे दायित्व निभावतांना अडचणी आल्या, तरीही ते अडचणींवर सहजतेने मात करतात. त्यांच्याकडून ‘सेवेतील अडचणींमुळे ती सेवा अडून राहिली किंवा त्यांनी गार्‍हाणे केले’, असे कधी होत नाही.

१ उ. दादांचा सेवा वेळेत पूर्ण करण्यासाठी कधीच पाठपुरावा करावा लागत नाही.

२. जाणवलेला पालट

२ अ. स्वीकारण्याची वृत्ती वाढणे : पूर्वी दादांना आयत्या वेळी सेवा सांगितल्यास त्यांना पुष्कळ प्रतिक्रिया यायच्या. आता त्यांनी स्वतःमध्ये चांगले पालट केले आहेत. एकदा ते त्यांची नियोजित सेवा करत असतांना त्यांना आयत्या वेळी एक सेवा समयमर्यादेत करायला सांगितली. तेव्हा दादांनी ती सेवा त्वरित स्वीकारून समयमर्यादेत पूर्ण केली. दादांनी ती सेवा झाल्यानंतर ज्या साधकाने त्यांना ती सेवा दिली होती, त्या साधकांना शांतपणे त्यांची चूक सांगितली.

‘गुरुदेवा, दामोदरदादांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करतो.’

– श्री. सुदीश पुथलत (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.९.२०२१)