‘केरळ दौर्यामध्ये आध्यात्मिकदृष्टीने चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या साधकांना तेथील सरकार आणि स्थानिक लोक यांची हिंदु धर्माविषयी लक्षात आलेली दयनीय स्थिती येथे दिली आहे.
केरळचे साम्यवादी सरकार हिंदूंसाठी अतिशय अमूल्य आणि चैतन्याचे स्रोत असलेल्या मंदिरांसह अन्य पुरातन वास्तूंचे जतन अन् संरक्षण करण्याऐवजी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. हे देशभरातील हिंदूंच्या लक्षात न येणे, हे लज्जास्पद आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे ! |
१. केरळच्या पर्यटन खात्याने जगद्गुरु आद्यशंकराचार्य यांची माहिती पर्यटकांना आणि इतर ठिकाणच्या भाविकांना कळण्याविषयी कोणतीही उपाययोजना केलेली न दिसणे
‘केरळमधील आध्यात्मिकदृष्टीने आपल्याला प्रथम लक्षात येणारी गोष्ट म्हणजे जगद्गुरु आद्यशंकराचार्य ! शंकराचार्यांचा जन्म आणि बालपण केरळमध्ये गेले. त्यामुळे आम्ही या स्थानांचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. या भागात पर्यटक आणि भाविक यांचे प्रमाण पुष्कळ अल्प होते. याचे कारण म्हणजे केरळच्या पर्यटन खात्याने (केरळ टुरिझमने) या स्थानाला दिलेला दर्जा आणि प्रसिद्धीमध्ये शंकराचार्यांच्या स्थानांचे महत्त्व याबद्दल प्रबोधन करण्यामध्ये केरळच्या पर्यटनविषयक खात्याचे दुर्लक्ष दिसून येते.
२. आध्यात्मिक इतिहास असणार्या स्थानांपेक्षा समुद्रकिनारी भागात पर्यटकांची गर्दी असणे
हिंदु धर्मात श्रेष्ठ मानल्या जाणार्या ४ वेदांचे पुनरुत्थान जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांनी केले. शासनाने हे महत्त्व लोकांना समजून देण्यामध्ये पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. कालडी येथे आद्य शंकराचार्यांचा इतिहास सांगणारा एक स्तूप (स्मारक) बनवला आहे. तो बघण्यासाठी केवळ आम्हीच होतो. इतर पर्यटकांची तिथे गर्दी न होता केरळमधील समुद्रकिनारी भागातच पर्यटकांची गर्दी दिसून आली.
३. शिल्पकलेचा अप्रतिम असा इतिहास दाखवणार्या कलाकृती भग्नावस्थेत असणे
तिरुवट्टार येथील श्री आदिकेशवर पेरूमल मंदिर (या मंदिराचे सरकारीकरण झालेले आहे.) येथे गेलो होतो. त्या मंदिरामध्ये लाकडापासून सुंदर आणि अप्रतिम कोरीव काम केलेल्या मूर्ती विराजमान आहेत; पण या मंदिराची पुष्कळ वर्षांपासून व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे या मूर्तींचे तुकडे झिजून पडले आहेत. काही तुकडे मंदिराच्या कोपर्यात टाकलेले होते. ‘सुंदर कोरीवकाम केलेल्या शिल्पकलेचा अप्रतिम असा इतिहास दाखवणार्या त्या कलाकृतींना जपणे’, हे आपले कर्तव्य आहे’, याचे भान शासनामध्ये दिसले नाही. मूर्तींच्या संरक्षणासाठी काहीच उपाययोजना केलेली नव्हती.
४. सरकारीकरण केलेल्या मंदिरातील अर्पणपेटीतून मिळणार्या पैशांतून मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याचे दायित्त्व तेथील शासनाचे असणे
पितळ्याचे अर्पण आलेले मोठ-मोठे दिवेसुद्धा अव्यवस्थितपणे आणि दुर्लक्षित स्थितीत एका कोपर्यात टाकलेले होते. या ‘सगळ्या महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंना शासनाने जपून ठेवणे’, अपेक्षित आहे. केवळ सरकारीकरण झालेल्या मंदिरात येणार्या अर्पणाचे पैसे गोळा करणे नव्हे, तर ‘मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्या पैशाचा पूर्णतः वापर करणे’, हे सरकारचे दायित्व आहे, याचे भान सरकारला नाही’, असे मला (वाल्मिकला) आतून वाटत होते.
५. हिंदु राष्ट्रातील मंदिरांचे दाियत्व सांभाळण्यासाठी देवाने सद्यःस्थिती दाखवल्याचे जाणवणे
‘पुढे येणार्या हिंदु राष्ट्रामध्ये आपल्याला अशा मंदिरांचे संरक्षण करणे, मंदिरांचा इतिहास आणि त्याचे महत्त्व समाजाला पटवून आपल्या मंदिरांविषयी श्रद्धा वाढवणे’, या सर्वांचे दायित्व आपल्यावर असणार आहे. यासाठीच देव मला मंदिरांची दयनीय स्थिती दाखवत आहे’, असे मला वाटले.
६. चार वेद आणि चौसष्ट कला यांचे प्रतीक असणार्या पारंपरिक नौका
आरनमुळा येथे श्रीकृष्णाचे ऐतिहासिक पार्थसारथी मंदिर आहे. हे मंदिर पंपा नदीच्या किनारी आहे. नदीच्या किनारी भागात पारंपरिक नौका (बोटी) बनवल्या जातात. त्या नौकांची रचनासुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असून त्या चार वेद आणि चौसष्ट कला यांचे प्रतीक आहे. त्या नौकेमध्ये चौसष्ट व्यक्तींनी बसून ती चालवायची असते. एका भागात चार वेदांचे प्रतीक; म्हणून चार व्यक्ती बसवतात.
७. वैशिष्ट्यपूर्ण अशा पारंपरिक नौका दुर्लक्षित स्थितीत असून नौकांविषयीची शासन आणि स्थानिक लोकांची उदासीनता
अशा शास्त्रीय पद्धतीने बनवलेल्या नौका प्रवाशांना पहाण्याच्या दृष्टीने ठेवलेल्या नव्हत्या. त्या ज्या किनारी भागात ठेवल्या होत्या, तिथेपर्यंत जाण्यासाठी रस्तासुद्धा नव्हता. त्या नौका पहाण्यासाठी जाण्याचा मार्ग तेथील स्थानिक लोकांना विचारून जावे लागले. त्या नौकांवर पुष्कळ धूळ होती. त्या दुर्लक्षित अवस्थेत पडून होत्या. नौकांची माहिती सांगणारा फलकही तिथे नव्हता. त्या गावातील लोकांना विचारल्यानंतर त्याचे महत्त्व आमच्या लक्षात आले.
तेथील मंदिरांचा इितहास आताच्या पिढीला सांगण्याची तळमळ शासन आणि तेथील स्थानिक लोक यांना नसल्याचे आमच्या लक्षात आले. या कारणामुळे अशा कितीतरी ऐतिहासिक आणि सांप्रदायिक कला लुप्त झाल्या आहेत. आपल्याला त्याचे महत्त्व न कळल्याने आपण त्या गोष्टी गमावल्या आहेत, याची आम्हाला खंत वाटली.
८. काही मंदिरांमध्ये देवतांची नावे स्थानिक भाषेत लिहिली असल्यामुळे ती बाहेरगावच्या प्रवाशांच्या लक्षात न येणे
केरळमध्ये काही मंदिरांत देवतांची नावे मल्याळम् भाषेमध्ये लिहिलेली असतात. त्याच्या व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये त्या देवतांची नावे नसल्याने आपल्याला ती नावे लक्षात येत नाहीत. सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये किंवा इतर मंदिरांमध्येही पर्यटकांना कळण्याच्या दृष्टीने फलक लावण्याची व्यवस्था केलेली दिसून आली नाही.
९. काही पुरातन मंदिरांमध्ये धार्मिक पोशाख परिधान करून देवतेच्या दर्शनाला जाण्यासाठी घातलेल्या काही नियमांचे तेथील प्रशासनाकडूनच गांभीर्याने पालन केले जात नसणे
केरळमधील थिरूवनंतपूरम् येथील अनंत पद्मनाभ मंदिर आणि काही पुरातन मंदिरांमध्ये धार्मिक पोशाख परिधान करून देवतेच्या दर्शनाला जाण्यासाठी काही नियम घातले आहेत; मात्र भक्त आणि पर्यटक यांच्याकडून त्याचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे लक्षात आले. येथे पुरुषांनी शर्ट आणि बनियान काढून दर्शनासाठी जाण्याचा नियम असतांनाही दर्शनार्थींकडून याचे पालन होत नसले, तरीही मंदिरातील व्यवस्थापनाकडून त्यांना थांबवले जात नाही. मुलींनी साडी नेसून मंदिरात प्रवेश करायचा आहे; पण काही मुलींनी ‘पॅन्ट-टी शर्ट’ असा पाश्चात्त्य पोशाख परिधान केला असेल, तर ‘पॅन्ट’वर त्यांनी ओढणी घेतली, तरीही मंदिराच्या आत जाण्याची अनुमती मिळते.
मंदिर व्यवस्थापनाने ‘धार्मिक पोशाख परिधान केल्यामुळे मंदिरातील चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता भाविकांमध्ये निर्माण होते’, हे धर्मशिक्षण भाविकांना न दिल्यामुळे त्यांच्याकडूनही गांभीर्याने पालन होत नाही.
१०. ‘देवतेच्या दर्शनासाठी पैसे द्यावे लागणे’, ही लाजिरवाणी गोष्ट असणे
पुढे कन्याकुमारीला देवतेचे दर्शन घेण्यासाठी आम्ही रांगेत उभे राहिल्यावर कळले की, रांगेतून दर्शन घ्यायचे असल्यास प्रत्येकी २० रुपये द्यावे लागतात. ही पुष्कळच लाजिरवाणी गोष्ट आहे. तेथे विनामूल्य दर्शन घेण्याचासुद्धा मार्ग आहे; मात्र भाविकांच्या लक्षातसुद्धा येणार नाही, असा तो मार्ग आहे. तेथे बाहेर बसलेले लोक सर्वांना २० किंवा ५० रुपये देऊन दर्शनाला जाण्याचा मार्ग दाखवत होते. त्या ठिकाणी ‘सरकार भाविकांना फसवून पैसे वसूल करत आहेत’, असे लक्षात आले. मंदिराची स्वच्छता, सुरक्षा आणि बाहेरील सात्त्विकता तेथील लोकांनी अजिबात ठेवलेली नाही.
११. कन्याकुमारीदेवीने बाणासुर नावाच्या राक्षसासह युद्ध करून त्याचा वध केलेल्या स्थानावर केवळ एक खांब असणे
कन्याकुमारी येथील ‘पंचलिंगपूरम्’ या ठिकाणी आम्ही गेलो होतो. कन्याकुमारीदेवीने बाणासुर नावाच्या राक्षसासह युद्ध करून त्याचा वध केला, त्या ठिकाणी आम्ही गेलो. ते ठिकाणही अतिशय दुर्लक्षित आहे. तेथे केवळ एक खांब असून त्याच्या आजूबाजूला मंडप किंवा मंदिर असे काहीच नाही. त्या स्थळाकडे पाहिल्यावर काहीच लक्षात येत नाही. तेथील स्थानिकांनाही काहीच सांगता आले नाही. एका पुरोहिताने केवळ मोघम माहिती सांगितली. ते स्थळ रस्त्याच्या बाजूलाच असल्यामुळे शासन कोणत्याही कारणासाठी ते नष्टही करण्याचीही शक्यता आहे.
१२. ‘अवकाश शास्त्र आणि गणित यांचे जनक’ असणारे ‘संगमग्राम येथील माधव’ या महान गणिततज्ञांच्या स्थळाविषयीही शासनाने दुर्लक्षच केलेले असणे
वर्ष १३४० ते १४२५ या कालावधीत ‘संगमग्राम येथील माधव’ हे एक प्रसिद्ध गणिततज्ञ आणि खगोलतज्ञ होते. केरळमध्ये त्यांचे ठिकाणही आहे. त्यांना ‘केरळमधील अवकाश शास्त्र आणि गणित यांचे जनक’ मानतात. अवकाशशास्त्राचा अभ्यास करतांना ते दोन शिळांवर (मोठ्या दगडांवर) बसून आकाशाकडे बघत अभ्यास करायचे; परंतु ते ठिकाणही दुर्लक्षित केलेले आहे. तेथील अभ्यासक्रमात त्यांच्याविषयी काहीच सांगितले जात नाही.
‘गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), तुमच्या कृपेने हे सर्व शिकायला मिळाले’, त्याबद्दल तुमच्या चरणी कृतज्ञता !’
– श्री. चेतन एम्.एन्. आणि श्री. वाल्मिक भुकन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.४.२०१९)