जुन्नर (पुणे) – शिवनेरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाशेजारी ‘हायड्रोलिक लिफ्ट’ बसवण्याची शिवभक्तांची मागणी योग्य असून ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्याकडे व्यक्त केली. भीमाशंकर ते शिवनेरी मोहिमेच्या दृष्टीने नियोजन बैठकीसाठी भिडेगुरुजी १६ जानेवारी या दिवशी जुन्नरला आले होते. त्या वेळी त्यांनी मुख्याधिकार्यांची भेट घेतली. ‘हायड्रोलिक लिफ्ट’ बसवण्यास विलंब होत असल्याने शिवभक्तांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते ओंकार जोशी यांनी २७ जानेवारीपासून साखळी पद्धतीने ठिय्या आंदोलन करण्याची चेतावणी प्रशासनास दिली आहे. (प्रशासनाला अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासनाला स्वत:हून काम करावेसे का वाटत नाही ? – संपादक)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ शिल्पाला हार घालण्यासाठी शिवभक्तांनी ‘हायड्रोलिक लिफ्ट’ची मागणी केली होती. ही लिफ्ट कायमस्वरूपी नसून ती आवश्यकतेनुसार वापरण्यात येणार आहे. इतर वेळेस ही लिफ्ट भूमी पातळीवर बंदिस्त रहाणार आहे. फेब्रुवारी २०२० पासून या ‘लिफ्ट’ची मागणी केली जात आहे; मात्र पालिका प्रशासन ‘लिफ्ट’बसवण्याविषयी आग्रही दिसून येत नसल्याने ओंकार जोशी यांनी मार्च २०२२ मध्ये २ दिवसांचे उपोषणही केले होते. जोपर्यंत प्रशासन प्रत्यक्ष कामाला आरंभ करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.