म्हापसा, १६ जानेवारी (वार्ता.) – कळगुंट पंचायत क्षेत्रामध्ये सर्व अवैध आणि अनैतिक कृत्ये रोखण्यासाठी पंचायत क्षेत्रात ज्या उपाहारगृहांमध्ये अवैधरित्या डान्स बार चालू आहेत, त्यांना देण्यात आलेली अनुज्ञप्ती रहित करण्याचा निर्णय ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला. डान्स बारची अनुज्ञप्ती रहित करून ते बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरपंच जोझफ सिक्वेरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ग्रामसभेत उपस्थित अनेक ग्रामस्थांनी डान्स बारच्या विरोधात संताप व्यक्त केला. डान्स बारमुळे गावाचे नाव अपकीर्त होत आहे, असे बर्याच जणांचे म्हणणे होते.
(सौजन्य : Goa Entertainment)
याविषयी सरपंच सिक्वेरा म्हणाले, ‘‘याविरुद्ध कारवाईची पहिली पायरी म्हणजे या बारना दिलेली अनुज्ञप्ती मागे घेतली जाईल. ग्रामस्थांना नको असलेले कोणतेही काम पंचायत करू देणार नाही. पंचायत डान्स बारसाठी कोणतीही अनुज्ञप्ती देत नाही; परंतु मालमत्ता असलेले स्थानिक लोक उपाहारगृहासाठी अनुज्ञप्ती घेतात आणि नंतर ते भाड्याने देतात. हे प्रकरण न्यायालयात आहे. हा खटला पंचायत जिंकेल !’’
त्यानंतर कुंदन केरकर या ग्रामस्थाने डान्स बारची अनुज्ञप्ती रहित करण्याच्या ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले आणि पंचायत क्षेत्रातील उर्वरित डान्स बार बंद करण्याची विनंती केली. या ग्रामसभेत ग्रामपंचायत क्षेत्रात अवैधपणे लावलेल्या विज्ञापन फलकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच गावातील कचरा समस्येविषयी चर्चा झाल्यावर उघड्यावर कचरा टाकणार्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यास पावले उचलल्याची माहिती सिक्वेरा यांनी दिली.
संपादकीय भूमिकाडान्स बार बंद करण्याच्या अनुषंगाने कृती करणार्या कळंगुट पंचायतीचे अभिनंदन ! |