मकरसंक्रांतीचे महत्त्व

उद्या १५ जानेवारी या दिवशी  ‘मकरसंक्रांत’ आहे. त्‍या निमित्ताने…

मकरसंक्रांत

१. तिथी

मकरसंक्रातीच्‍या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सध्‍या मकरसंक्रांतीचा दिवस १५ जानेवारी हा आहे. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्‍यासाठी क्‍वचित् प्रसंगी संक्रांतीचा दिवस एक दिवसाने पुढे ढकलला जातो. पंचांगात संक्रांतीचे रूप, वय, वस्‍त्र, जाण्‍याची दिशा इत्‍यादी माहिती दिलेली असते. ती कालमाहात्‍म्‍यानुसार तिच्‍यात होणार्‍या पालटाला अनुसरून असते.

२. इतिहास

संक्रांतीला देवता मानलेले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्‍याचा वध केला, अशी कथा आहे.

३. तीळगुळाचे महत्त्व

तिळामध्‍ये सत्त्वलहरींचे ग्रहण अन् प्रक्षेपण करण्‍याची क्षमता अधिक असल्‍यामुळे तीळगुळाचे सेवन केल्‍याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होते.

४. पर्वकाळी दानाचे महत्त्व

मकरसंक्रांत ते रथसप्‍तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्‍यकर्मे विशेष फलद्रूप होतात. ‘नवे भांडे, वस्‍त्र, अन्‍न, तीळ, तीळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी यांचे यथाशक्‍ती दान द्यावे. या दिवशी सुवासिनी दान देतात. काही पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात आणि त्‍यांना तीळगूळ देतात.’ सुवासिनी हळदी – कुंकवाचा कार्यक्रम करून जी भेट देतात, त्‍याला ‘वाण देणे’ असे म्‍हणतात.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण साजरे करण्‍याच्‍या योग्‍य पद्धती आणि शास्‍त्र’)