कर्नाटक सुर्ला नाल्याचे पाणी कळसा नाल्यात वळवण्याच्या सिद्धतेत !

म्हादई जलवाटप तंटा

म्हादई नदीचा एक भाग असलेल्या सुर्ला नाला

पणजी, ११ जानेवारी (वार्ता.) – म्हादई पाणीतंटा लवादाने म्हादई नदीचा एक भाग असलेल्या सुर्ला नाल्याचे पाणी वळवण्यास कर्नाटकला संमती दिलेली नसली, तरी कर्नाटकने सुधारित ‘सविस्तर प्रकल्प अहवाला’त सुर्ला नाल्याचे पाणी कळसा नाल्यात वळवण्याचा समावेश करण्याची सिद्धता दर्शवली आहे. सुर्ला नाल्याचे पाणी ‘बारा जणांचा धबधबा’ येथून गोव्यात वहाते. म्हादई अभयारण्यातील वन्यजीव आणि वनसंपदा यांच्यासाठी हा जलस्रोत महत्त्वाचा असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. पर्यावरणप्रेमींनुसार कर्नाटकने कळसा नाल्याचे पाणी अनैसर्गिकपणे मलप्रभेत वळवण्याचे काम यापूर्वीच चालू केले आहे.

म्हादईप्रश्नी विरोधक गंभीर नसल्याने त्यांचा शिष्टमंडळात सहभाग नाही ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

म्हादई प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावली, तेव्हा विरोधक या बैठकीला अनुपस्थित राहिले. यावरून त्यांना या विषयात स्वारस्य नसल्याचे आणि ते याप्रश्नी गंभीर नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच विरोधी आमदाराचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठीच्या शिष्टमंडळात सहभाग केला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

 (सौजन्य : Goa Entertainment)

कर्नाटकने प्रकल्पाला संमती मिळावी, यासाठी धरणाचीउंची घटवली आणि प्रकल्पासाठीचे वनक्षेत्र घटवले कर्नाटकने म्हादईवर कळसा आणि भंडुरा प्रकल्प उभारून म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळवण्यासाठी सुधारित ‘सविस्तर प्रकल्प अहवाल’ (डी.पी.आर्.) केंद्रीय जल आयोगाला सुपुर्द केला आहे. या सुधारित अहवालाला केंद्रीय जल आयोगाने संमती दिली आहे. विशेष म्हणजे कर्नाटकने या प्रकल्पाला संमती मिळावी आणि प्रकल्प उभारणीसाठी वन आणि इतर कायदे लागू होऊ नयेत, यासाठी धरणाची उंची घटवली आहे आणि प्रकल्प उभारणीसाठी लागणार्‍या वनक्षेत्राची भूमीही अल्प केली आहे. याविषयी गोवा सरकार आणि ‘म्हादई बचाव अभियान’ यांच्यासमवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा झाली आहे.

_____________________________________________________________________________
‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा
_____________________________________________________