अंतर्मन घडवणारी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा !

कु. रेणुका कुलकर्णी

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतून ‘राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍यावर होणारे आघात, संतांचे मार्गदर्शन, साधकांना आलेल्‍या अनुभूती, सूक्ष्म ज्ञान’ यांसंबंधी विविध लेखांच्‍या माध्‍यमातून समाजातील व्‍यक्‍तींना दिशा दिली जाते अन् त्‍यांना साधनाप्रवण केले जाते. गुरुकृपेने मला जवळजवळ ७ वर्षे हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करण्‍याचे सौभाग्‍य प्राप्‍त झाले.

११ जानेवारी २०२३ या दिवशी कु. रेणुका कुलकर्णी यांनी सेवा करतांना केलेले भावाच्‍या स्‍तरावरील प्रयत्न पाहिले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/644168.html

६. सेवा करतांना सहसाधकांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

६ अ. स्‍थिर वृत्तीच्‍या आणि साधकांना आध्‍यात्मिक स्‍तरावर दृष्‍टीकोन देणार्‍या सुश्री (कु.) युवराज्ञी शिंदे (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के)!

सुश्री (कु.) युवराज्ञी शिंदे

‘स्‍थिरता’ हा युवराज्ञीताईचा सर्वांत मोठा गुण आहे. तातडीच्‍या सेवा आल्‍यासही ती स्‍थिर असते. पाक्षिकाच्‍या संबंधित सेवा करणार्‍या साधकांमध्‍ये काही मतभेद असल्‍यास आणि त्‍यामुळे त्‍यांच्‍या मनाची स्‍थिती ठीक नसल्‍यास, सेवा कितीही तातडीची असो, ताई आम्‍हाला सेवा थांबवायला सांगत असे. ती आमचे विचार जाणून घेऊन ‘आमचे कुठे चुकले ?’, हे परखडपणे सांगायची. ती आम्‍हाला ‘प्रसंगात काय करायला हवे’, असे सांगून नंतरच सेवा पुन्‍हा आरंभ करायला सांगायची. ती आम्‍हाला सांगत असे, ‘कलुषित मनाने सेवा केली, तर सेवा देवापर्यंत पोचणार नाही. देवाला निर्मळ मनच अपेक्षित आहे.’

६ आ. नम्र आणि शिकण्‍याची तळमळ असलेल्‍या कु. वर्षा जबडे !

कु. वर्षा जबडे

वर्षाताईमध्‍ये जिज्ञासा आणि शिकण्‍याची तळमळ आहे. तातडीच्‍या सेवांमुळे आणि माझ्‍यातील ‘अपेक्षा करणे’ या स्‍वभावदोषामुळे अनेक वेळा माझे लक्ष सेवेतून विचलित व्‍हायचे आणि माझ्‍याकडून मोठ्या आवाजात बोलले जायचे; मात्र वर्षाताई माझ्‍याशी कायम नम्रतेनेच बोलली आहे. त्‍या वेळी ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या संगीत विषयाच्‍या प्रयोगांना जायची माझी इच्‍छा असायची. त्‍या वेळी वर्षाताई माझी आवड ओळखून मला सेवेचे पुढील नियोजन सांगत असे आणि संगीताच्‍या प्रयोगांना जायची अनुमती देत असे. वर्षाताईला त्‍या काळात पाठदुखी, पायदुखी, प्राणशक्‍ती अल्‍प असणे, अशा अनेक शारीरिक अडचणी होत्‍या. असे असतांनाही तिने पाक्षिकाच्‍या संदर्भातील सेवा प्रतिदिन अनेक घंटे केली आहे. वर्षाताईमध्‍ये संवाद साधण्‍याचे कौशल्‍य चांगले आहे. तिच्‍याकडून मला ‘समन्‍वय कसा करायचा ?’, हे शिकता आले. तिच्‍यातील प्रेमभावामुळे तिने प्रसारातील अनेक साधकांशी सलोख्‍याचे संबंध ठेवले आहेत.

६ इ. प्रेमळ आणि हिंदी भाषेवर प्रभुत्‍व असणार्‍या सौ. अरुणा सिंह !

आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. अरुणा सिंह

सौ. अरुणा सिंह यांच्‍यामध्‍ये पुष्‍कळ प्रेमभाव आहे. त्‍यांनी पाक्षिकातील वृत्तांच्‍या संकलनाची सेवा अथकपणे केली आहे. त्‍यांचे हिंदी भाषेवर प्रभुत्‍व असून मी त्‍यांच्‍याकडून अनेक नवीन शब्‍द शिकले.

६ ई. सेवेतील बारकावे शिकवणार्‍या सौ. दीपश्री !

सौ. दीपश्री यांच्‍याकडून मी पाक्षिकाची संरचना करायला शिकले. त्‍यांनी मला सेवेतील अनेक बारकावे शिकवले आणि मला ते वेळोवेळी लिहून ठेवायला सांगितले. त्‍या मला सांगायच्‍या, ‘आपण सेवेतील प्रत्‍येक गोष्‍ट लिहून ठेवल्‍याने सेवा प्रथमच शिकणार्‍या साधकाला सोपे जाते.’’

६ उ. आधार देणार्‍या कु. गीतांजली काणे

कु. गीतांजली काणे

मला गीतांजलीताईचा पाक्षिकाच्‍या संदर्भात सेवा करतांना आधार वाटायचा. त्‍या काळात ती पाक्षिकाच्‍या संदर्भात प्रत्‍यक्ष सेवा करत नव्‍हती; परंतु पाक्षिक छपाईला पाठवतांना ती ‘काही साहाय्‍य हवे का ?’, असे आवर्जून विचारायची. तिच्‍यातील निर्मळतेमुळे मी निःसंकोचपणे अनेक वेळा तिच्‍याशी मनमोकळेपणे बोलत असे. पाक्षिकाच्‍या संदर्भातील सेवा करतांना माझ्‍या हालचाली जलद होत असत. मी भरभर वाचत असेे. त्‍यामुळे माझ्‍याकडून निष्‍काळजीपणाच्‍या चुका होत असत. ताईकडून मी योग्‍य गतीने कृती करायला शिकले. माझ्‍याकडे अन्‍य लहान-मोठ्या सेवांचे दायित्‍व होते. तेव्‍हा मला सेवा करतांना ताण येत असे. ताईने मला ‘सेवा आणखी सोप्‍या पद्धतीने कशी करू शकतो ?’, हे शिकवले.

७. कृतज्ञता आणि प्रार्थना

शब्‍दसुमन है पिरोये, ‘अक्षरब्रह्म’ की आराधना में ।
दिन-रैन जागकर हार बनाया । संकलित कर शब्‍दों का ।
संरचना हो सात्त्विक और अर्पित हो श्रीगुरु चरणों में ।
सेवा की मिली उपलब्‍धि, कृतज्ञता है जीवन में ॥

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव, तुमच्‍या कृपेने मला हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा करण्‍याची संधी मिळाली. त्‍याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्‍याकडून या सेवेत झालेल्‍या चुकांविषयी मी आपल्‍या चरणी क्षमाप्रार्थी आहे. ‘भगवंता, माझ्‍या सेवेतील सर्व अडथळे दूर होऊन मी करत असलेली प्रत्‍येक सेवा तुझ्‍या चरणी अर्पण होऊ दे’, अशी तुझ्‍या चरणी प्रार्थना !’

– कु. रेणुका कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१२.२०२२) (समाप्‍त)