‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या माध्यमांतून गेल्या अनेक वर्षांपासून समाजप्रबोधन केले जात आहे. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतून ‘राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणारे आघात, संतांचे मार्गदर्शन, साधकांना आलेल्या अनुभूती, सूक्ष्म ज्ञान’ यांसंबंधी विविध लेखांच्या माध्यमातून समाजातील व्यक्तींना दिशा दिली जाते अन् त्यांना साधनाप्रवण केले जाते. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ४ आवृत्त्या, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ मराठी आणि कन्नड, पाक्षिक ‘सनातन प्रभात’ हिंदी आणि इंग्रजी या भाषांत प्रकाशित केले जाते. गुरुकृपेने मला जवळजवळ ७ वर्षे हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.
१० जानेवारी २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात कु. रेणुका कुलकर्णी यांना शिकायला मिळालेली सूत्रे जाणून घेतली. आज त्यांनी सेवा करतांना केलेल्या भावाच्या स्तरावरील प्रयत्नांविषयी जाणून घेऊया.
भाग २.
भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/643943.html
४. ‘हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा अंतर्मनाची प्रक्रिया होण्यासाठी आणि स्वतःत आमूलाग्र पालट करण्यासाठी मिळाली आहे’, हे लक्षात येणे
इ. केवळ आकर्षक संरचना न करता सात्त्विकतेच्या दृष्टीने स्पंदनशास्त्राचा अभ्यास करणे : अन्य वृत्तपत्रांचे संरचनाकार ‘संरचना कशी आकर्षक होईल आणि वाचकवर्ग कसा वाढेल ?’, असा विचार करतात. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये संरचना करतांना ‘सात्त्विकता’ आणि ‘सकारात्मक स्पंदने’ हे प्रमुख निकष असतात. ‘हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या प्रत्येक अंकात अधिकाधिक सात्त्विक स्पंदने कशी येतील ?’, हा अभ्यास परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी करायला शिकवला. त्यांना पाक्षिक दाखवल्यावर त्यांनी ‘पाक्षिक हातात घेऊन कशी स्पंदने जाणवतात ?’, हे अभ्यासायला सांगितले होते. त्यामुळे प्रत्येक पानाची संरचना करतांना माझ्याकडून ‘ते सात्त्विक दिसते का ?’, अशा दृष्टीने पाहिले जाऊ लागले. नंतर रंगीत अंकात माझ्याकडून गडद रंगांऐवजी फिकट रंग वापरले जाऊ लागले. सण आणि उत्सव यांनुसार देवतांची स्पंदने आकृष्ट करणारी रचना केली जाऊ लागली, उदा. ‘दत्तजयंती’ विशेषांक असेल, तर दत्ताच्या संदर्भातील घटक, उदा. जपमाळ, त्रिशूळ इत्यादी चित्रे घेऊन आणि पिवळा रंग देऊन रचना केली जात असे. ‘अक्षरे अल्प जागेत (कॉम्प्रेस) न लिहिता सुटसुटीत लिहिल्याने सकारात्मक स्पंदने निर्माण होतात’, हे मला शिकायला मिळाले. यातून मला सात्त्विकतेची गोडी लागली.’
५. हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा करतांना आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली उपाययोजना !
५ अ. हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा करतांना सूक्ष्मातून आक्रमण होणे : ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या संबंधित सेवा करणे’, ही समष्टी सेवा आहे. ही सेवा करतांना ‘माझ्यावर अनिष्ट शक्तींची सूक्ष्मातून आक्रमणे होत आहेत’, असे मला जाणवायचे. मला आध्यात्मिक त्रासामुळे ‘ही सेवा करू नये’, असे वाटायचे.
५ आ. सहसाधकांकडून अपेक्षा होणे : माझ्याकडून या सेवेचे योग्य नियोजन न झाल्याने सेवेत चुका होत असत. मला सहसाधकांकडून अपेक्षाही असायच्या. त्या संदर्भात उत्तरदायी साधिकांनी (सुश्री (कु.) युवराज्ञी शिंदे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि कु. वर्षा जबडे यांनी) वेळोवेळी मला माझ्यातील स्वभावदोषांची जाणीवही करून दिली.
५ इ. पाक्षिकाच्या पानांच्या भोवती श्रीकृष्णाच्या नामाचे मंडल घालणे आणि प्रती एक घंट्याने प्रार्थना अन् स्वयंसूचना सत्र करणे : हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या अंकासंबंधी सेवा चालू करतांना आरंभी आम्ही कागदावर श्रीकृष्णाच्या नामजपाचे (ॐ नमो भगवते वासुदेवाय ।) मंडल घालून त्यात ‘हे भगवान श्रीकृष्णा, पाक्षिकाचा अमुक अंक आहे. त्याच्या संकलनात, संरचनेत आणि छपाईमध्ये येणार्या अडचणी नष्ट होऊ देत, तसेच संबंधित सेवा करणार्या साधकांची मने जुळू देत’, अशी प्रार्थना लिहीत असू. संगणकात ‘इन-डिझाईन’ या ‘सॉफ्टवेअर’मध्ये पानांची संरचना केली जाते. आम्ही या पानांच्या भोवतीही श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल घालत होतो. आम्ही प्रती १ घंट्याने सामूहिक स्वयंसूचना सत्र करत असू. त्या वेळी ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे । (अर्थ : कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते.) या उक्तीप्रमाणे संघटित प्रयत्नांमुळे आम्हाला उत्साह जाणवत असे.
५ ई. हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा करतांना केलेले भावाच्या स्तरावरील प्रयत्न : पाक्षिकाचे नियोजन करतांना आम्ही (मी आणि कु. वर्षा जबडे) ‘प्रत्येक पाक्षिक करतांना काय भाव ठेवायचा ?’, हे ठरवत असू, उदा. ‘श्रीरामनवमी’ विशेषांक असल्यास प्रभु श्रीरामचंद्राचे स्मरण करणे, त्याच्या चरणी अंक अर्पण करणे. ‘कुंभमेळा स्मरणिका’ असल्यास सकाळी सेवा करण्यापूर्वी मानस गंगास्नान करणे. मानस गंगास्नान करतांना ‘आम्ही प्रत्यक्ष प्रयाग घाटावर आहोत’, असे आम्हाला जाणवत असे. प्रत्येक पाक्षिकाच्या संदर्भात सेवा करण्याच्या निमित्ताने ‘स्वतःत कोणत्या गुणांची वृद्धी करायची ?’, हेही ठरवत असू, उदा. ‘मागच्या पाक्षिकाच्या संदर्भात सेवा करतांना अमुक समन्वय योग्य प्रकारे झाला नव्हता, तर या वेळी काळजीपूर्वक समन्वय करू. प्रत्येक पाक्षिकाचा अंक छपाईला गेल्यावर संबंधित साधकांचा सत्संग होत असे. त्या वेळी मागच्या पाक्षिकात झालेल्या चुका पुढच्या वेळी कशा प्रकारे टाळता येतील, असे ध्येय घेत असू.
५ उ. हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’संबंधीची सेवा तातडीची असल्याने काही वेळा नामजपादी उपाय पूर्ण करण्यास वेळ अपुरा पडणे; मात्र सेवा भावपूर्ण केल्यावर चैतन्य जाणवणे : नामजपादी उपाय पूर्ण केल्यावर सेवेत एकाग्रता साधता येते, तसेच साधकाने नामजपादी उपाय केल्यामुळे साधकाच्या भोवती संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे युवराज्ञीताई प्रत्येक वेळी मला नामजपादी उपाय पूर्ण करूनच पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या संबंधी सेवा करायला सांगत असे. काही वेळा मला एकाच वेळी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’ आणि प्रसारसाहित्य यांच्या संबंधी सेवा आल्याने मला नामजपादी उपाय पूर्ण करायला वेळ मिळायचा नाही. त्या वेळी मात्र युवराज्ञीताई मला ठराविक घंटेच नामजपादी उपाय करायला सांगत असे. ती मला ‘‘सेवेतून चैतन्य मिळेल’’, असे सांगायची. सेवा करतांना आम्ही स्वयंसूचना सत्रे करणे, भजने ऐकणे, असे केल्याने ‘अंतर्मनातून देवाशी अनुसंधान आहे’, असे आम्हाला जाणवत असे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची संकल्पशक्ती कार्यरत असल्याने ही सेवा करतांना आम्हाला चैतन्य जाणवत असे. पाक्षिकाच्या संबंधी सेवा पूर्ण झाल्यावर मला थकवा न जाणवता ताजेतवाने वाटत असे.
क्रमशः
– कु. रेणुका कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१२.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |