ब्राझिलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी राजधानी ब्राझिलियामधील संसद, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती भवन येथे घुसून तोडफोड केली. मागील आठवड्यात लुईझ इनासिओ लुला डी सिल्वा यांनी ब्राझिलच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर बोल्सोनारो यांचे समर्थक चिडले आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये ब्राझिलच्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली. त्यात लुला यांना ५०.९, तर बोल्सोनारो यांना ४९.१ टक्के मते मिळाली. टक्केवारीच्या भाषेत बोलायचे झाल्यास संपूर्ण ब्राझिल सरळसरळ २ विचारसरणींमध्ये विभागला गेल्याचे चित्र दिसत आहे. लुला यांचे पारडे जड असले, तरी बोल्सोनारो यांनाही देशात तेवढेच समर्थन आहे. लुला यांनी निवडणूक जिंकल्यावर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी लुला यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘निवडणूक पारदर्शक झाली नाही’, असा आरोप केला. ब्राझिलियामध्ये संसदेवरील आक्रमणाची तुलना अमेरिकेतील ‘द कॅपिटोल’ म्हणजे तेथील संसद भवनावर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या आक्रमणाशी केली जात आहे. बोल्सोनारो हे ‘ब्राझिलचे डोनाल्ड ट्रम्प’ म्हणून ओळखले जातात. बोल्सोनारो यांनी मात्र या हिंसेचा विरोध करून ‘मी नाही त्यातला’, असा आव आणला आहे. असे असले, तरी या हिंसाचारामागे कुणाचा हात आहे ?’, हे न समजायला जनता दूधखुळी नाही. या हिंसाचाराकडे ‘लोकशाहीवरील आक्रमण’ म्हणून पाहिले जात आहे. लोकशाहीत समाज हा केंद्रबिंदू असतो. समाज जितका संयत, सुसंस्कृत आणि विवेकी असतो, त्या देशातील लोकशाही तितकीच सुदृढ अन् सुसंपन्न असते. विरोध करतांना सामाजिक भान विसरलेला समाज लोकशाहीसाठी घातक आहे.
बोल्सोनारो यांचा अहंकार !
बोल्सोनारो हे राष्ट्रपतीपदी असतांना त्यांनी देशात एकाधिकारशाही राबवली. ब्राझिलने बराच काळ सैन्याची हुकूमशाही अनुभवली असल्याने तेथील जनतेला हुकूमशाहीचा तिटकारा आहे. असे असतांना बोल्सोनारो यांनी मात्र बर्याचदा हुकूमशाहीचे समर्थन केले. यामुळे देशातील लोकशाही समर्थक जनता त्यांच्यापासून दूर गेली. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर अॅमेझॉनच्या जंगलतोडीला पाठिंबा दर्शवला. त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली. यामुळे जगभरातील पर्यावरणप्रेमींनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. कोरोना महामारीच्या काळात महामारी आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी काहीही उपाययोजना राबवल्या नाहीत. ते स्वतः कोरोनाबाधित असतांना त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते पत्रकारांमध्ये मिसळल्यामुळे पत्रकारांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्या या दायित्वशून्य वर्तनामुळे त्यांच्यावर टीका झाली. देशात कोरोनामुळे झालेल्या ७ लाख लोकांच्या मृत्यूंना बोल्सोनारो यांना उत्तरदायी धरले जाते. त्यांच्या काळात गरिबी वाढून आर्थिक प्रगतीचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला. असे असतांना देशातील अर्धी जनता त्यांना समर्थन देते, याला काय म्हणायचे ?
लुला यांनी यापूर्वी वर्ष २००३ ते वर्ष २०१० या कालावधीत राष्ट्रपतीपद भूषवले होते. ‘त्यांनी पुन्हा देशाची सूत्रे हाती घेतल्याने देशात सुबत्ता येईल’, अशी आशा जनता करत आहे. लुला यांनी त्यांच्या कार्यकाळात देशाची आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे २० लाख जनता दारिद्य्ररेषा ओलांडू शकली. त्यांची भूमिकाही पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे अॅमेझॉनची होणारी बेसुमार जंगलतोड थांबण्याची शक्यता आहे. त्यांना एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात वर्ष २०१८ मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर साधारण ५८० दिवस त्यांनी कारावास भोगला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केल्यामुळे त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि त्यांचा विजय झाला. असे असले, तरी त्यांची ‘भ्रष्टाचारी’ अशी प्रतिमा पुसण्यासाठी त्यांना पुष्कळ कष्ट घ्यावे लागतील.
लोकशाहीचा उत्कर्ष जनतेच्या हाती !
‘हुकूमशाहीचे पुरस्कर्ते; मात्र लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले बोल्सोनारो देशात लोकशाही मूल्ये कशी जोपासणार ?’, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘आम्हाला संबंधित नेता देशाचा प्रमुख म्हणून नको’, असे सांगत ज्या देशाच्या लोकांची संसदेवर आक्रमण करण्याइतपत मजल जाते, त्या देशात लोकशाही रुजली आहे’, असे कसे म्हणता येईल ? ब्राझिलमध्ये जे झाले, तेच काही वर्षांपूर्वी अमेरिकेत झाले. अमेरिका तर स्वतःला लोकशाहीची पाईक असल्याप्रमाणे मिरवते; मात्र तेथील घटना पहाता ‘या देशात लोकशाही समृद्ध न होता तिचे अवमूल्यन होत आहे’, असेच म्हणावे लागेल.
ब्राझिल हा कृषीसंपन्न देश. आधुनिक शेतीसाठी तो ओळखला जातो. तो कॉफी आणि साखर उत्पादनांसाठी जगात अग्रेसर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक सुबत्ता असतांना हा देश पिछाडीवर कसा ? हा प्रश्न केवळ ब्राझिलपुरता मर्यादित नाही, तर ‘जगात असे अनेक देश साधनसंपन्न असतांनाही त्यांची म्हणावी तेवढी आर्थिक प्रगती का झाली नाही ?’, याचा विचार व्हायला हवा. याला तेथील व्यवस्था कारणीभूत कि समाज ? नेता हा समाजातून आलेला असतो. त्यामुळे समाज जितका समृद्ध, विवेकवादी आणि तत्त्वनिष्ठ असेल, तितका त्याने निवडून दिलेला नेता हा सक्षम असतो. या घटनेतून ब्राझिलमधील सामाजिक प्रवाहांचा विचार व्हायला हवा. केवळ लोकशाहीची आग्रही मागणी केली; म्हणजे समाजात सुसंपन्नता येते, असे नाही. समाजाचा मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तर उंचावण्यासाठी व्यवस्थेपासून समाजधुरिणांपर्यंत सर्वांनी झटावे लागते. असा समाज अनेक आघात सहन करून स्थिर राहून पुढे तो जगाचे दिशादर्शन करतो. ब्राझिलमधील हिंसाचारावरून ‘सामाजिक भान’, ‘लोकशाहीवरील आघात’ यांवर चर्चा करणार्यांनी सामाजिक सुसंपन्नतेसाठी उपाययोजना काढल्यास जगाचे भले होईल !
मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुसंपन्न समाज जगाला दिशादर्शन करण्यास सक्षम ! |