पाकचे अफगाणिस्तानात घुसून ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’वर हवाई आक्रमण

पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने आक्रमणाचे वृत्त फेटाळले, तर अफगाणिस्तानचे मौन !  

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकने ५ जानेवारीच्या रात्री अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात हवाई आक्रमण केले. या भागात लपलेल्या ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांना ठार मारण्यासाठी हे आक्रमण करण्यात आले. या घटनेविषयी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण देतांना वृत्त फेटाळले आहे, तर तालिबान सरकारने याविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

गेल्या मासाभरात टीटीपीच्या आतंकवाद्यांनी पाकच्या विविध भागांत १० पेक्षा अधिक मोठी आक्रमणे केली होती. त्यावर पाकचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी म्हटले होते, ‘पाकिस्तानला सीमेपलीकडील आतंकवाद्यांना ठार करण्यासाठी सैन्याला अनुमती  दिली आहे.’ दुसरीकडे तालिबान सरकारचा संरक्षणमंत्री मुल्ला महंमद याकूब याने त्याच्या सैनिकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत, ‘जर पाकिस्तानी सैनिकांनी सीमा ओलांडली, तर त्यांना जिवंत परत जाऊ देऊ नये.’ त्यामुळे आता तालिबानी सैनिक पाकिस्तानी सीमेवरील चौक्यांवर आक्रमणे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.