‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र…हिंदु राष्ट्र…’या घोषणेने बांदा शहर दुमदुमले !

हिंदु जनजागृती समिती आयोजित वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

बांदा शहरातून निघालेली भव्य वाहनफेरी

बांदा (जि. सिंधुदुर्ग), ५ जानेवारी (वार्ता.) – ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भगवा ध्वज लावलेल्या दुचाकींवरील पारंपरिक पोषाख परिधान केलेले धर्माभिमानी यांच्या वाहनफेरीने बांदा शहर दुमदुमले. ‘८ जानेवारी या दिवशी येथे आयोजित केलेल्या जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेला सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहा’, असे आवाहन या वाहनफेरीद्वारे समस्त हिंदू बांधवांना करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सभेच्या प्रचारासाठी वाहनफेरी काढण्यात आली होती.

वाहनफेरीच्या प्रारंभी श्री देव बांदेश्वर मंदिराजवळ धर्माभिमानी श्री. नीलेश सावंत यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. पुरोहित श्री. प्रसाद हर्डीकर यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर धर्माभिमानी श्री. जयवंत देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवल्यानंतर फेरी मार्गस्थ झाली. श्री बांदेश्वर मंदिरापासून जुनी व्यायामशाळा, उभा बाजार, मोर्येवाडा, डॉ. दिलीप सावंत दवाखाना, श्री विठ्ठल मंदिर, नट्ट वाचनालय, गडगेवाडी मार्गे कट्टा कॉर्नर येथे आल्यावर फेरीची सांगता करण्यात आली. या फेरीत बांदा आणि परिसरातील धर्मप्रेमी दुचाकीस्वार सहभागी झाले होते.

सभेच्या सांगतेच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत मणेरीकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती सभांच्या माध्यमातून धर्मप्रसाराचे कार्य करत आहे. संपूर्ण जिल्ह्यात या सभेचा प्रसार झाला असून हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. होर्डिंग, भित्तीपत्रके, हस्तपत्रके, सामाजिक माध्यमे आदी विविध माध्यमांतून सभेचा प्रचार करण्यात आला आहे. या सभेत लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर, मंदिर सरकारीकरण आदी हिंदूंवरील विविध संकटे, हिंदु राष्ट्राची आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. समस्त हिंदू बांधवांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.’’

बांदा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करताना श्री. सुदान केसरकर
वाहनफेरीत सहभागी होण्यासाठी धर्माभिमानी सज्ज !

या फेरीला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम, सद्गुरु स्वाती खाड्ये यांची वंदनीय उपस्थिती लाभली.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सभेचे निमंत्रण

कट्टा कॉर्नर येथे फेरीची सांगता झाली. त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे गोवा येथून  सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत होते. त्या वेळी त्यांनी कट्टा कॉर्नर येथे वाहन थांबवून समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि सभेला शुभेच्छा दिल्या.

हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी या वेळी मंत्री राणे यांना सभेचे निमंत्रण दिले.


श्री भूमिका देवी मंदिरात गार्‍हाणे घालताना सद्गुरु स्वाती खाडये आणि इतर

श्री बांदेश्वरदेव आणि श्री भूमिकादेवी यांच्या चरणी गार्‍हाणे

फेरीच्या प्रारंभी श्री बांदेश्वरदेवाच्या चरणी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांच्या वंदनीय उपस्थितीत, तर श्री भूमिकादेवीच्या मंदिरात सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा अन् गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांच्या उपस्थितीत श्रीफळ अर्पण करून सभेच्या यशस्वीतेसाठी गार्‍हाणे घालण्यात आले.

क्षणचित्रे

१. फेरीत धर्मध्वजाचे ४ ठिकाणी पूजन करण्यात आले.
२. बांदा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला येथील धर्माभिमानी श्री. सुदान केसरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.