राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून नागेशी (गोवा) येथे अखिल भारतीय स्तरावरची ‘समन्वय बैठक’

संघाचे प.पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे ७ जानेवारीपर्यंत गोव्यात वास्तव्य असणार

फोंडा, ४ जानेवारी (वार्ता.) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे संघाच्या राष्ट्रीय स्तरावरील बैठकांसाठी २ जानेवारी या दिवशी गोव्यात नागेशी, फोंडा येथे आगमन झाले आहे आणि त्यांचे ७ जानेवारीपर्यंत गोव्यात वास्तव्य असणार आहे. ५ आणि ६ जानेवारी या दिवशी नागेशी, फोंडा येथे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची संघाचे काही प्रमुख अखिल भारतीय पदाधिकारी आणि निवडक संघ प्रेरित विविध संघटनांचे पदाधिकारी यांची अखिल भारतीय स्तरावरची ‘समन्वय बैठक’ होणार आहे.

पणजी येथे ७ जानेवारी या दिवशी एकत्रीकरण (महासांघिक) कार्यक्रम

यानंतर प.पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत ७ जानेवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता पणजी येथील बांदोडकर फुटबॉल मैदानात गोव्यातील संघ स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यात सक्रीय असलेले निमंत्रित यांच्यासाठी एकत्रीकरण (महासांघिक) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प.पू. सरसंघचालक मोहनजी भागवत उपस्थित संघस्वयंसेवक आणि निमंत्रित प्रबुद्ध लोकांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी ‘ऑनलाईन’ नोंदणी प्रक्रिया चालू झाली आहे.

पणजी येथील कार्यक्रमात विशेष प्रदर्शन

या कार्यक्रमाच्या ठिकाणी एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये गोव्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास, देशभरातील राष्ट्रभक्तांनी गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात दिलेले योगदान यांविषयी माहिती मिळणार आहे. या व्यतिरिक्त त्या ठिकाणी राष्ट्रीय विचारांच्या पुस्तकांचा कक्ष असेल. यामध्ये संघाचे कार्य आणि समृद्ध राष्ट्र जीवनावरील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे साहित्य असेल, तसेच गोसेवा आणि गो-उत्पादने यांचीही केंद्रे असणार आहेत. महासांघिक कार्यक्रमात स्वयंसेवकांचे व्यायाम, योग प्रात्यक्षिके आणि सांघिक गीत होणार आहे. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्णबधिरांना प.पू. सरसंघचालकांचे बौद्धिक ‘खुणांच्या भाषेत’ ऐकण्याची विशेष सोय करण्यात आली आहे.