राष्ट्रवादी कि ‘ब्रिगेडी’ ?

एखाद्यात हिंदुद्वेष ठासून भरला असेल, तर तो काही केल्या जात नाही. तो अधूनमधून प्रकट होतच असतो. हाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात पहायला मिळतो. या पक्षाचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत बोलतांना, ‘मी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्वराज्यरक्षक’ म्हणतो. काही जण संभाजी राजांना ‘धर्मवीर’ म्हणतात. राजे कधीही ‘धर्मवीर’ नव्हते. त्यांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही’, असे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात मोठे वादळ उठूनही अजित पवार यांनी त्याविषयी ना खेद व्यक्त केला, ना क्षमा मागितली. उलट ते स्वत:च्या मतावर अजूनही ठाम आहेत. धर्मवीर संभाजी महाराजांचे बलीदान सर्वश्रुत आहे. त्यांनी चिंचवडच्या साधू मोरया गोसावी यांना सनद दिली, सज्जनगडावर समर्थ रामदासस्वामी यांचे समाधी मंदिर बांधले, ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ लिहिला, हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या क्रूर पोर्तुगिजांची मुंडकी छाटली, तसेच क्रूरकर्मा औरंगजेब याने त्यांच्यावर ४० दिवस अत्यंत क्रूर, भीषण आणि अमानवीय अत्याचार करूनही त्यांनी हिंदु धर्म सोडला नाही. तरीही छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ म्हणण्यासाठी जीभ कचरणार्‍यांना ‘राष्ट्रवादी’ कसे म्हणावे ?

राष्ट्रवादी काँग्रेसचा हिंदुद्वेष !

अशी विधाने उगाचच केली जात नाहीत. त्याला मोठी पार्श्वभूमी असते. हिंदुद्वेष हेच एकमेव तत्त्व असणार्‍या राजकीय पक्षांकडून कधी हिंदुद्वेषी विधाने केली जातात, तर कधी कृतीच्या माध्यमातून या विषाची बिजे समाजात पेरली जात आहेत. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांतीलच एक आहे’, असे या पक्षातील नेत्यांच्या विधानांवरून दिसून येते. एप्रिल २०२२ मध्ये ईश्वरपूर (इस्लामपूर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या मेळाव्यात पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी हिंदु धर्मातील महत्त्वाचा असणारा कन्यादान विधी आणि तो करणारे पुरोहित यांच्यावर टीका करतांना ‘मम भार्या समर्पयामी’ असे हीन पातळीवरील वक्तव्य करून हिंदु धर्माचा घोर अवमान केला होता. मिटकरी यांच्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हसून दाद दिली होती. याच राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक नेते छगन भुजबळ यांनी अलीकडेच हिंदूंसाठी पूजनीय असलेल्या श्री सरस्वतीदेवीवर टीका करतांना ‘सरस्वतीदेवीने किती शाळा काढल्या ?’, ‘किती लोकांना शिकवले ?’, ‘तिचे छायाचित्र शाळेत कशाला हवे ?’, अशी हिंदुद्वेषी विधाने केली. याच पक्षाच्या नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या सौ. सुप्रिया सुळे यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये ‘सत्यनारायणाची पूजा स्वतःच्या घरी घाला, शैक्षणिक संकुलात नको’, असे विधान केले होते. एवढेच कशाला ? स्वतः शरद पवार यांनी पुणेरी पगडी घालण्यास नकार दिला होता. हे कोण कसे विसरेल ? आता अजित पवार यांनी थेट विधानसभेत ‘धर्मवीर’ संभाजी महाराजांविषयी विधान केले. ‘ही सर्व नेतेमंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहेत’, हे लक्षात घेतले पाहिजे. विशेष म्हणजे या सर्वांवर वरील विधाने केल्यानंतर झालेल्या टीकेवरून एकानेही ना क्षमा मागितली, ना खेद व्यक्त केला. म्हणूनच या सर्वांच्या विधानांना ‘ब्रिगेडी शिकवणी’चा दर्प येतो; कारण जी सूत्रे एकेकाळी ब्रिगेडी मांडत होते, तीच सूत्रे आता राष्ट्रवादीवाले त्यांच्या अधिकृत व्यासपिठावरून मांडत आहेत, किंबहुना तीच सूत्रे जणू त्यांच्या पक्षाचे धोरण बनले आहे. राष्ट्रवादीवाल्यांनी आता ‘धर्मवीर’ हा शब्द नाकारला, यातून ते कोणत्या राष्ट्राचे पुरस्कर्ते आहेत, हे दिसून येते. त्यामुळेच ‘हा पक्ष राष्ट्रवादी कि ब्रिगेडी ?’, अशी शंका येते.

शरद पवार यांची केविलवाणी सारवासारव !

अजित पवार यांनी वरील विधान केल्यानंतर याच राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांच्या भगिनी सौ. सुप्रिया सुळे यांनी तात्काळ पवार यांचे समर्थन केले. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, त्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन केल्याचे दिसून आले. इतकेच काय; पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पत्रकारांशी बोलतांना ‘जनतेला संभाजी महाराजांना जे म्हणायचे आहे, ते म्हणा’, असे सांगून स्वतःच्या पुतण्याने निर्माण केलेल्या वादावर पडदा टाकत असल्याचे भासवले. ‘शरद पवार यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचे समर्थन केले नाही, याचा अर्थ अजित पवार चुकले’, असा अपसमज बर्‍याच जणांचा झाला असेल. तथापि ज्यांना शरद पवारांचे राजकारण ठाऊक आहे, ते असा समज करून घेणार नाहीत. शरद पवार यांचे राजकारण धूर्त आहे. ‘देशात आपला पक्ष संपत चालला आहे. महाराष्ट्रातही आपल्याला सत्ताच्युत व्हावे लागले आहे. अशात महानगरपालिकेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी घोषित होतील’, असे चित्र आहे. अशात अशा विधानांचा परिणाम निदान महानगरपालिकांतील निवडणुकांवर तरी व्हायला नको, यासाठी सारवासारव करण्यासाठीच अजित पवार यांच्या मताशी असहमत असल्यासारखे भासवण्याचा हा प्रकार आहे. तसे नसते, तर शरद पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत ‘हा वाद उकरून काढायची आवश्यकता नव्हती’, अशा कानपिचक्या अजित पवार यांना दिल्या असत्या, जशा त्यांनी राहुल गांधी यांना त्यांच्या सावरकरांवरील विधानांवरून नुकत्याच दिल्या होत्या.

स्वराज्यभक्षक राष्ट्रवादी काँग्रेस !

एकूणच राष्ट्रवादीवाल्यांना आता खरा इतिहास पालटून हिंदुद्वेषी आणि खोटा ‘ब्रिगेडी’ इतिहास समाजमनावर बिंबवायचा आहे. त्यासाठीच हा सर्व खटाटोप आहे. ज्यांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो, त्यांना संभाजीराजे ‘धर्मवीर’ कसे वाटतील ? याच राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करण्यास विरोध दर्शवला होता, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्मवीर संभाजी महाराज यांना ‘धर्मवीर’ न म्हणता केवळ ‘स्वराज्यरक्षक’ असे संबोधण्यास सांगून रयतेत भेद निर्माण करण्याच्या नादात राष्ट्रवादी काँग्रेसने समाजात स्वतःची प्रतिमा मात्र ‘स्वराज्यभक्षक’ अशी करवून घेतली आहे, हे मात्र निश्चित !

सत्य इतिहास दडपणार्‍या राजकारण्यांना आता जनतेनेच खडसावणे आवश्यक !