मागण्या मान्य न केल्यास अत्यावश्यक सेवा बंद करण्याची ‘मार्ड’ची चेतावणी !

संभाजीनगर येथील निवासी आधुनिक वैद्याच्या संपाचा दुसरा दिवस !

घाटी रुग्णालय येथे आंदोलन करतांना निवासी आधुनिक वैद्य

संभाजीनगर – येथील घाटी रुग्णालयातील काही निवासी आधुनिक वैद्य २ जानेवारीपासून संपावर गेले आहेत. पहिल्या दिवशी ४९६ पैकी २४८ आधुनिक वैद्य कामावर उपस्थित होते. त्यांनी बाह्यरुग्ण विभागात १ सहस्र १०० रुग्ण पडताळले, तसेच शस्त्रक्रियाही केल्या, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर यांनी सांगितले. ‘आमच्या मागण्या मान्य न केल्यास अत्यावश्यक सेवा बंद करण्यात येतील’, अशी चेतावणी ‘मार्ड’चे अध्यक्ष अमोल चिंधे यांनी दिली आहे. दुसर्‍या दिवशीही आधुनिक वैद्यांनी संप चालूच ठेवला आहे. त्यामुळे अपघात आणि अचानक उद्भवणार्‍या आजारांतील रुग्णांचे हाल होत आहेत. (सरकार वैद्यांच्या मागण्यांकडे लक्ष कधी देणार ? आता संपामुळे होणार्‍या रुग्णांच्या त्रासाचे दायित्व कुणावर ? – संपादक)

राज्यातील निवासी आधुनिक वैद्यांनी सहयोगी प्राध्यापक आणि साहाय्यक प्राध्यापक यांच्या रिक्त जागा भरणे, विद्यावेतन आणि इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे. घाटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग यांमधील निवासी आधुनिक वैद्यांनी सेवा देणे बंद केले आहे; मात्र पहिल्या दिवशी संपाचा परिणाम जाणवला नाही. ‘मार्ड’ने दुपारी निदर्शने केली. अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी संपकर्‍यांसमवेत चर्चा केली. त्यांनी दिवसभर रुग्णालयात फिरून रुग्णसेवेची माहिती घेतली. वरिष्ठ आधुनिक वैद्यांची नियुक्ती बाह्यरुग्ण विभागामध्ये केली होती. त्यामुळे रुग्णसेवा सुरळीत होती, असा दावा कल्याणकर यांनी केला आहे.


मुंबईतही २ सहस्र आधुनिक वैद्य संपावर !

मुंबईतील २ सहस्र आधुनिक वैद्यांसह राज्यभरातील ६ सहस्र आधुनिक वैद्य आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असून शस्त्रक्रियांवरही परिणाम झाला आहे. राज्यातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.


सोलापूर येथे विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांचा संप !

संपात सहभागी निवासी डॉक्टर

सोलापूर – संपामध्ये सोलापूर येथील २०० हून अधिक आधुनिक वैद्य सहभागी झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळता निवासी डॉक्टरांचा संप चालू आहे. या संपाविषयी राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास ३ जानेवारीपासून अत्यावश्यक सेवाही बंद करणार असल्याची चेतावणी देण्यात आली आहे.