श्री गुरु हेच मोक्षरूपी जगद्गुरु भगवंताचे सगुण साकार रूप आहेत !
संभाजीनगर येथील अधिवक्ता चारुदत्त जोशी (वय ३९ वर्षे) यांचे २८.४.२०२१ या दिवशी ‘कोरोना’मुळे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी केलेले साधनेविषयीचे लिखाण पुढे दिले आहे.
१. सर्वसाधारण मनुष्याची वृत्ती बहिर्मुख असणे आणि श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागल्यावर मनुष्य अंतर्मुख होऊ लागणे, म्हणजेच त्याच्यावर गुरुकृपा होणे
‘सर्वसाधारण मनुष्य सतत इतरांचे मूल्यमापन करत असतो किंबहुना मनुष्याच्या मनाला तशी सवयच असते. ही सर्व प्रक्रिया त्याच्या मनाच्या स्तरावर चालू असते, म्हणजेच त्याची वृत्ती बहिर्मुख असते. या स्थितीत त्याला त्याच्याकडून घडणार्या चुकांची जाणीव आणि गांभीर्य नसते. ईश्वरी इच्छेनुसार मनुष्याच्या आयुष्यात श्री गुरु आल्यावर तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधनेला आरंभ करतो. काही कालावधीनंतर तो इतरांचे मूल्यमापन करण्यापेक्षा स्वतःचे मूल्यमापन करायला लागतो, म्हणजेच तो अंतर्मुख होतो. हा टप्पा म्हणजेच गुरुकृपा होय किंवा गुरुकृपेचा आनंद अनुभवणे होय !
२. गुरुकृपा ही तेजस्वी सूर्यकिरणांप्रमाणे असल्यामुळे साधकाला स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव होऊन तो ते न्यून करण्याचा अन् तळमळीने साधना करण्याचा प्रयत्न करू लागणे
सागरामध्ये सतत अगणित लाटा येतात, तसेच मनात अनंत विचार अखंडपणे येत असतात. केवळ गुरुकृपेनेच मनाची एकाग्रता आणि स्थिरता साध्य होते. स्थिर मन हे शांत जलाशयाप्रमाणे असते. माध्यान्हीचे सूर्यकिरण स्वच्छ आणि शांत जलाशयावर पडल्यास जलाशयाच्या तळापर्यंतचा भाग दिसू लागतो. गुरुकृपा ही त्या तेजस्वी सूर्यकिरणांप्रमाणे असते. त्यामुळे साधकाला त्याच्या मनाची खोली समजण्यास आरंभ होतो. आपल्याच मनाचा मागोवा घेतांना त्याला अनेक गोष्टींचा उलगडा प्रथमच होत जातो. हीच गुरुकृपेची अनुभूती होय ! याच टप्प्यावर साधकाला स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव व्हायला लागते. त्यानंतर साधक अंतर्मुख होऊन सकारात्मकतेने आणि तळमळीने साधनेचे प्रयत्न करू लागतो.
३. स्वतःला ओळखण्याचा ध्यास, म्हणजे संपूर्ण अंतर्मुखता येणे आणि ही स्थिती साध्य होणे, म्हणजे पूर्ण गुरुकृपा होणे !
मनाच्या अंतर्मुखतेतून मनाला ओळखण्यास आरंभ होतो. त्यानंतर साधक स्वत:च्या मनाची खोली पडताळून पहाण्याचा प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न साधकाची उत्सुकता वाढवत नेतो. गुरुकृपेचा तेजस्वी किरण तसे करण्यासाठी आपल्याला पाठबळ देत असतो. ‘स्वतःला ओळखण्याची उत्सुकता’, हाही मानवी स्वभावच आहे. या पराकोटीच्या उत्सुकतेचे रूपांतर पुढे ध्यासात होते. आपलेच मन स्वतःला ओळखण्याचा ध्यास घेते. स्वतःला ओळखण्याचा ध्यास, म्हणजेच संपूर्ण अंतर्मुखता होय आणि ही स्थिती साध्य होणे, म्हणजेच पूर्ण गुरुकृपा होय !
४. अनेक वर्षे मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न करूनही ते साध्य न होणे, केवळ गुरुकृपेनेच तिथेपर्यंत पोचू शकणे !
मनाची खोली पडताळण्याचा आणि तळ गाठण्याचा हा ध्यास, म्हणजे साधकाच्या साधनेचा प्रवास होय. अनेक दिवस, अनेक मास अथवा अनेक वर्षे हा प्रवास अविरत चालू असूनही साधकाला मनाच्या विस्तीर्ण जलाशयाच्या तळाचा थांगपत्ता काही लागत नाही. केवळ गुरुकृपेच्या पाठबळावरच त्या तळापर्यंत पोचणे शक्य होते.
५. मनाचा तळ गाठल्यावर विलक्षण शांती आणि अवर्णनीय आनंद अनुभवता येणे
मनाचा तळ गाठल्यावर काय अनुभूती येते ? तिथे जाणवते, ती विलक्षण शांती आणि एक अवर्णनीय आनंद ! तिथे स्वतःचे अस्तित्वही विसरले जाते. मग मनाने कशाचा ध्यास घेतला होता ? शांती आणि आनंद यांचा ? कि आणखी कशाचा ? कदाचित् ही शांती आणि आनंद, म्हणजेच सत्–चित्-आनंद असावा; म्हणूनच त्याचे शब्दांत वर्णन करता येत नाही किंवा इतरांना ही गोष्ट समजावून सांगता येत नाही. ती केवळ स्वतःच अनुभवता येते.
६. मनाच्या तळाशी मिळालेली विलक्षण शांती आणि अवर्णनीय आनंद, म्हणजेच मोक्षरूपी भगवान श्रीकृष्णाचे तेजस्वी अन् चैतन्यदायी चरणकमल !
‘आपल्या मनाचा तळ म्हणजे नेमके काय आहे ? येथे शांती आणि आनंद यांची अनुभूती येत असेल, तर त्यांची उत्पत्ती कुठून झाली ?’ याचे चिंतन होऊ लागल्यावर साधकाला आणखी पुढची अनुभूती येते. शरणागतभावाने प्रार्थना केल्यावर साधकाच्या लक्षात येते, ‘मनाचा तळ, म्हणजेच परमपिता जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाचे तेजस्वी आणि चैतन्यदायी चरणकमल आहेत’, म्हणजेच साधकाला मनाच्या तळाशी दर्शन होते, ते मोक्षरूप भगवत्चरणांचे ! तेव्हा त्याच्या लक्षात येते, मनाने स्वतःला ओळखण्याचा घेतलेला ध्यास, हा भगवंताच्या मोक्षदायी चरणकमलांचा होता !
७. ‘भगवंताच्या मोक्षरूपी चरणकमलांचे दर्शन, म्हणजे श्री गुरूंच्या चरणकमलांचे दर्शन’, याचा साक्षात्कार होऊन साधक गुरुचरणी पूर्ण लीन होऊन मोक्षापर्यंत जाऊ शकणे
साधकाला या चरणकमलांचे झालेले दर्शन हे पहिल्यांदा झाले नसून दुसर्यांदा झाले आहे. त्या क्षणी साधकाला सर्वांत मोठा साक्षात्कार होतो, ‘हे मोक्षरूपी भगवंताचे चरणदर्शन, म्हणजेच आपल्या श्री गुरूंचे चरणदर्शन होय !’ हे दर्शन आपण साधनाप्रवासाच्या आरंभी घेतले होते; परंतु त्याचा अर्थ आपल्याला आता समजला. श्री गुरु हे निर्गुण आणि निराकार भगवंताचे सगुण अन् साकार रूप आहेत.
त्यानंतर साधक शरणागतभावाने गुरुचरणी लीन होऊन स्वतःला पूर्ण विसरून जातो. हा तोच क्षण, जेव्हा प्रगती करत असलेला साधक ‘खरा शिष्य’ म्हणून नव्याने जन्माला येतो. अशा प्रकारे आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती झालेला हा शिष्य गुरुकृपेच्या बळावर पुढे ‘संत’, ‘सद्गुरु’ आणि पुढे ‘मोक्ष’ येथपर्यंतचा प्रवास करतो !’
– अधिवक्ता चारुदत्त जोशी, संभाजीनगर (एप्रिल २०२०) (मृत्यूपूर्वी केलेले लिखाण)
(क्रमश:)
परात्पर गुरु डॉक्टर आणि सनातनचे संत यांच्यामध्ये असलेली एकरूपता !परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकाला साधनेविषयीचे त्याचे विचार लिहून देण्यास सांगणे आणि नंतर लगेचच पू. सुधाकर चपळगावकर यांनी साधकाला सुंदर लेखणी (पेन) भेट म्हणून देणे ‘काही वर्षांपूर्वी आम्हाला सहकुटुंब श्री क्षेत्र रामनाथी येथे जाण्याचा योग आला. त्या वेळी आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. सत्संगात त्यांनी मला ‘तुमचे विचार लिहून द्या’, असे सांगितले. तेव्हा माझी भावजागृती होऊन पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. नंतर मी संभाजीनगरला परत आल्यावर सनातनचे ९७ वे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी अनपेक्षितपणे मला एक सुंदर लेखणी (पेन) भेट म्हणून दिली. त्यांच्याकडून भेटस्वरूपात एखादी वस्तू मिळण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. त्या क्षणी मला असे जाणवले, ‘प.पू. गुरुदेवांनी मला माझे विचार लिहून देण्यास सांगितले आणि त्याचे मूर्त स्वरूप म्हणजे पू. चपळगावकरकाकांनी भेट म्हणून लेखणी दिली !’ या प्रसंगावरून मला परात्पर गुरु डॉक्टर आणि सनातनचे संत यांची एकरूपता अनुभवता येऊन ‘गुरुतत्त्व कसे एकच असते ?’ याची अनुभूती आली. यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’ – अधिवक्ता चारुदत्त जोशी, संभाजीनगर (एप्रिल २०२०) (मृत्यूपूर्वी केलेले लिखाण) |